वैश्‍विक ऊर्जा (Energy That Makes Your Home Happy)

वैश्‍विक ऊर्जा (Energy That Makes Your Home Happy)

मनुष्य पाण्याशिवाय सात दिवस जगू शकतो,
अन्नाशिवाय पंधरा दिवसांपेक्षा अधिक काळ जगू शकतो;
परंतु वैश्‍विक ऊर्जेशिवाय मनुष्य क्षणभरही जगू शकत नाही.

फेंगशुई हे सुमारे 3000 वर्षांपूर्वीचं अत्यंत प्राचीन शास्त्र आहे. याचा शब्दशः अर्थ ‘वारा आणि पाणी’ असा असून, आपल्या घराच्या बाबतीत हे शास्त्र अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतं.
फेंगशुई शास्त्र आपणास घरातील नैसर्गिक पर्यावरण, तसंच घराच्या आजूबाजूचा परिसर समजून घेण्यास मदत करतं. यासोबत पर्यावरणामुळे काही त्रुटी किंवा उणिवा निर्माण झाल्या असतील, तर त्या दूर करण्याचे साधे-सोपे उपाय हे शास्त्र आपणांस सांगतं. या सोपेपणातच फेंगशुई शास्त्राचं सौंदर्य आहे. उदाहरणार्थ- जर तुम्हाला अमुक एका भागात फिश टँक ठेवायला सांगितला असेल आणि काही कारणाने तुम्हाला तसं करणं शक्य नसेल तर, त्या ठिकाणी पाण्यामधील माशाचं चित्र लावून तुम्ही तोच परिणाम मिळवू शकता, असं हे शास्त्र सांगतं.
आपल्या जीवनात कधी ना कधी असं घडतं की, आपण एखाद्या मित्र किंवा मैत्रिणीच्या घरी पूर्ण दिवस वेळ घालवण्याकरिता जातो आणि तिथे गेल्यानंतर मात्र अस्वस्थ होऊन काही वेळातच परत येतो. नाहीतर एखाद्याच्या घरी काही वेळाकरिता जातो आणि पूर्ण दिवस घालवतो. असं का घडतं? याचं उत्तर फेंगशुई शास्त्रात आहे. त्यानुसार प्रत्येक घरामध्ये स्थिरावलेली चांगली किंवा वाईट शक्ती आपणास असं करण्यास प्रवृत्त करत असते. या शक्तीलाच ‘वैश्‍विक ऊर्जा’ असं म्हणतात.

ऊर्जा म्हणजे प्राण
मनुष्य पाण्याशिवाय सात दिवस जगू शकतो, अन्नाशिवाय पंधरा दिवसांपेक्षा अधिक काळ जगू शकतो; परंतु, वैश्‍विक ऊर्जेशिवाय मनुष्य क्षणभरही जगू शकत नाही. संस्कृतमध्ये या ऊर्जेला ‘प्राण’ असं म्हणतात. हिब्रूमध्ये ‘हाका’, चिनी भाषेत ‘ची’ आणि जपानीमध्ये ‘रेकी’ म्हणतात.
वारा आणि पाणी ही फेंगशुईची अत्यंत शक्तिशाली अशी दोन मूलतत्त्वं आहेत. आपल्या घरात, घराबाहेर किंवा कार्यालय, कार्यालयाबाहेर एक प्रकारची ‘अमूर्त’ शक्ती निर्माण करणारी ही मूलतत्त्वं आहेत. ही शक्तीक्षेत्रं समजून घेण्यास, तसंच त्यांना योग्य दिशा देऊन आपल्या घर आणि कार्यालयामध्ये सुसंवाद निर्माण करण्यासाठी फेंगशुई मदत करते. आपल्या देहातील सात चक्रांप्रमाणे, आपल्या घरातील आठही कोपर्‍यांमध्ये ही ऊर्जा सुसंवादीपणे स्थिर झाली, तर आपलं आरोग्य जे मध्यभागी असतं, ते उत्तम राहतं. त्यामुळे त्रिकोणी, गोल किंवा विषम आकार असलेली घरं किंवा कार्यालयं निवडू नये. कारण विषम आकारात ऊर्जा सर्व कोपर्‍यांत फिरत नाही.
त्रिकोण हे अग्नीचं प्रतीक आहे. ऊर्जा ही सतत कंप पावत असते. त्यामुळे ‘याँग ऊर्जा‘ अधिक प्रमाणात निर्माण होते आणि ही अग्नी ऊर्जा प्रत्यक्ष अग्नी निर्माण करू शकते. तर गोल आकारामध्ये ऊर्जेची सतत हालचाल सुरू असते. त्यामुळे ऊर्जा फारच वेगानं सक्रिय बनते आणि लोकांना अति क्रियाशील बनवते. तुमचं जेवणाचं टेबल गोलाकार असेल, तर त्या घरातील सगळे जण एकत्र जेवणास बसताना दिसत नाहीत. बसलेच तर फार काळ एकत्र घालवत नाहीत किंवा मग त्यांच्यात छोटे-मोठे वाद होत असतात.


अशा तर्‍हेने विषम आकारामुळे ज्या ज्या कोपर्‍यांमध्ये ऊर्जा पोहोचत नाही, त्या त्या ठिकाणी समस्या निर्माण होतात. प्रत्येकाला आपलं घर स्वर्गासारखं सुंदर आणि लाभणारं असावं, असं वाटतं आणि फेंगशुई त्यांस शंभर टक्के लाभ मिळवून देतं.