धैर्याने काम करणारा बापमाणूस (Emotional Encount...

धैर्याने काम करणारा बापमाणूस (Emotional Encounter In The Life Of A Senior Actor)

सध्या करोनाच्या काळात घरातच राहण्याची पाळी आलेल्या प्रेक्षकांच्या मनोरंजनाचा जणू मराठी वाहिनींनी वसाच उचलला आहे. स्वतःच्या सुरक्षिततेची काळजी घेत सर्वच मालिकांमधील कलाकार तसेच इतर सहकारी कार्यक्रमांचं शूटिंग करत आहेत. सध्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असलेल्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील अनिरुद्ध म्हणजेच मिलिंद गवळींनी मालिकेतील त्यांचे बाबा म्हणजेच आप्पांसोबतचं नातं अधोरेखित करणारी एक पोस्ट नुकतीच शेअर केली आहे. यात त्यांनी सेटवरचा एक किस्सा शेअर केला आहे.
‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील प्रत्येक पात्रावर प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. या मालिकेत अनिरुद्धची भूमिका साकारणारे सुप्रसिद्ध अभिनेते मिलिंद गवळी आपल्या या पोस्टमध्ये म्हणतात, ”या मालिकेतील अनिरुद्धचा आप्पांवर खूप जीव आहेच. पण खऱ्या आयुष्यातही आप्पांची भूमिका साकारणाऱ्या किशोर महाबोले यांच्यावर माझा खूप जीव आहे. त्यांच्याविषयी प्रचंड आदर आणि खूप प्रेम आहे. त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. त्यांना साहित्याची आवड आहे. अतिशय बुद्धिमान, मेहनती आणि हसमुख आप्पांशिवाय आम्हा कोणालाच सेटवर करमत नाही. माझी आणि त्यांची ओळख ‘आई कुठे काय करते’ च्या सेटवरच झाली. पहिल्या दिवसापासूनच त्यांच्या मिश्किल स्वभावाने मन जिंकून घेतलं.”
असं सांगत असतानाच आप्पा अर्थात किशोर महाबोले यांच्याविषयीचा एक किस्सा सांगताना ते म्हणतात, ”एकदा आप्पांचा चार्जर कोणी लंपास केला. त्यामुळे त्यांना त्यांचा मोबाइल चार्ज करता आला नाही आणि त्यांच्या बायकोशी त्यांना बोलता आलं नाही म्हणून ते रागावले होते. त्या दिवशी बायकोवर त्यांचं किती प्रेम आहे हे आम्हाला कळलं.”

”कोरोनाच्या कठीण काळामध्ये आम्ही एकत्रच शूटिंग करत आहोत. येथे खूप धैर्याने आणि शांतपणे ते आम्हाला सगळ्यांना आधार देत ते त्यांचं काम चोख बजावतात. काही आठवड्यांपूर्वी त्यांच्या वडिलांचं निधन झालं. जेव्हा ही बातमी त्यांना कळली तेव्हा आमचा एक मिश्किल असा सीन सुरू होता. वडिलांच्या निधनाची बातमी ऐकून ते हादरून गेले. तरीही सीन पूर्ण करूनच ते निघाले. तो प्रसंग माझ्या डोळ्यासमोरून कधीही जाणार नाही. त्यांच्यातला बापमाणूस मी त्यादिवशी अनुभवला,” असे मिलिंदने म्हटलं आहे.