एकता कपूरची गाजलेली ‘कुसुम’ आता मरा...

एकता कपूरची गाजलेली ‘कुसुम’ आता मराठीत (Ekta Kapoors Hit Serial ‘KUSUM’ Now In Marathi)

बालाजी टेलिफिल्म्स आणि सोनी मराठी वाहिनीची ‘कुसुम’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. नुकताच त्याचा प्रोमो पाहायला मिळाला. ‘शीतली’ या व्यक्तिरेखेमुळे महाराष्ट्राच्या घराघरांत ओळखली जाणारी अभिनेत्री शिवानी बावकर या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. शिवानी या मालिकेत सासर आणि माहेर अशा दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडताना दिसणार आहे.

Ekta Kapoor, KUSUM, marathi serial

आपल्या आईवडिलांसाठी, आपल्या कुटुंबासाठी सतत तत्पर असलेली, सासर आणि माहेर अशा दोन्ही जबाबदाऱ्या लीलया पेलणारी कुसुम ही व्यक्तिरेखा आहे. सासर जोडायला माहेरची नाळ तोडायची काय गरज, असा सगळ्या मुलींच्या मनातला प्रश्न या मालिकेतून मांडण्यात येणार आहे.

आत्तापर्यंत या मालिकेचे तीन प्रोमो आले आहेत.  माहेरचं लाईट बील भरणारी, वडिलांना डॉक्टरकडे घेऊन जाणारी आणि सगळ्यांची उत्तम काळजी घेणारी कुसुम या प्रोमोमधून प्रेक्षकांना दिसली. दुनियेसाठी खपायचं आणि आई बापाला नाही जपायचं, असं कसं चालेल, असं म्हणत कुसुम सगळ्या जबाबदाऱ्या उत्तम पार पाडते.

Ekta Kapoor, KUSUM, marathi serial

२००१ साली हिंदीमध्ये ‘कुसुम’ नावाची मालिका प्रसारित होत होती. त्या मालिकेचा हा मराठी अवतार आहे. तेव्हाही ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती आणि रेकॉर्ड ब्रेकर ठरली होती. कसुम दोन दशकाच्या आधी जेव्हा आली होती तेव्हा तिने त्या काळच्या सामान्य मुलींच्या प्रश्नांना वाचा फोडली. आता जेव्हा कुसुम येतेय तेव्हा ती आताच्या काळातील मुली किंवा स्त्रियांचं प्रतिनिधित्व करताना दिसणार आहे. ज्या मुलींना आपल्या कुटुंबासाठी काही करायचं आहे त्या सगळ्यांना या मालिकेतून नक्कीच प्रेरणा मिळेल.

बालाजी टेलिफिल्न्स आणि सोनी मराठी वाहिनी यांनी मिळून ‘कुसुम’ या मालिकेतून आजच्या काळातल्या मुलींच्या मनातले प्रश्न मांडले आहेत.

“२१ वर्षानंतर ‘कुसुम’ प्रेक्षकांच्या भेटीला पुन्हा येते आहे. ‘कुसुम’ मराठीत आणण्याची संधी मला मिळाली, याचा मला आनंद आहे.  ही मालिका मजा खूप जवळची आहे. मी मराठीमध्ये याआधीही काम केले आहे, पण खूप काळानंतर मी मराठीमध्ये पुन्हा येते आहे. प्रादेशिक भाषेमध्ये आणि खासकरून मराठीमध्ये खूप एक्सप्लोर करण्यासारखे आहे. आणि सोनी मराठी वाहिनीने मला ही संधी दिली, त्यामुळे मी खूश आहे,” असे बालाजी टेलिफिल्म्सच्या एकता कपूर यांनी म्हटले आहे.