बनावट कास्टिंग एजंटच्या विरोधात एकता कपूर कायदे...

बनावट कास्टिंग एजंटच्या विरोधात एकता कपूर कायदेशीर कारवाई करणार (Ekta Kapoor To Take Legal Action Against Fake Casting Agents)

एकता कपूर आणि तिची निर्मिती कंपनी ‘बालाजी टेलिफिल्म्स लिमिटेड’ आणि ‘अल्ट डिजिटल एंटरटेनमेंट’ यांनी रविवारी अभिनयात रस असलेल्यांकडून पैशाची मागणी करणाऱ्या बनावट कास्टिंग एजंट्सच्या विरोधात निवेदन जारी केले आहे. कंपनी याप्रकरणी आवश्यक कायदेशीर पावलेही उचलत आहे. तसेच त्यांनी लोकांना कोणताही संशयास्पद कास्टिंग कॉल आल्यास त्यांच्या विरोधात तक्रार करण्याची विनंती केली आहे.

सोशल मीडियावरील त्यांच्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, “काही लोक बनावट कागदपत्रांचा वापर करून ‘बालाजी टेलिफिल्म्स लिमिटेड’ किंवा ‘ऑल्ट डिजिटल एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड’चे कास्टिंग एजंट असल्याचा बनाव आणत लोकांकडून पैसे उकळण्याचा किंवा त्यांच्याकडून इतर कोणताही फायदा करुन घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. अशा लोकांविरोधात ‘बालाजी टेलिफिल्म्स लिमिटेड’ने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

निवेदनात पुढे असे लिहिले आहे की, यापुढे असे फोन आल्यास ‘अभिनय क्षेत्रात येण्यास इच्छुक असलेल्या लोकांनी, अशा एजंटशी आपल्या जबाबदारीवर संपर्क साधावा. बालाजी टेलिफिल्म्स लिमिटेड, ऑल्ट डिजिटल एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि एकता कपूर या त्यांच्या कोणत्याही नुकसानीस जबाबदार राहणार नाहीत. बालाजी टेलिफिल्म्स लिमिटेड, ऑल्ट डिजिटल एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि एकता कपूर यांनी कधीही कोणत्याही उमेदवाराकडून पैशांची मागणी केलेली नाही आणि करणारही नाही.’ असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

तुमचीही अशी फसवणूक होत आहे असे जर तुमच्या लक्षात आले तर या निवेदनात एक हेल्पलाइन मेल आयडी देखील दिला आहे. निवेदनात पुढे लिहिले आहे की, ‘कास्टिंग संदर्भात तुम्हाला कोणताही संशयास्पद फोन आल्यास कृपया अशा एजंटच्या तपशीलांसह आमचा अधिकृत ईमेल आयडी [email protected] वर आम्हाला त्वरित सूचित करा.’