एकता कपूरला बॉलिवूडमधल्या एकाही खानसोबत काम करा...

एकता कपूरला बॉलिवूडमधल्या एकाही खानसोबत काम करायचं नाही… स्वतःच केला खुलासा (Ekta Kapoor Never Wanted To Work With Khans, Revealed Herself)

एकता कपूरने मालिका ते सिनेमा विश्वातील यशस्वी आणि प्रयोगशील निर्माती म्हणून ओळख कमावली आहे. बॉलिवूडमधील जंपिंग जॅक जितेंद्र यांची मुलगी यापलीकडे एकताने तिचं स्थान मिळवलं आहे. लवकरच तिचा गुडबाय हा सिनेमा रिलीज होणार आहे. या सिनेमाच्या ट्रेलर लाँच कार्यक्रमात एकता तिच्या मनातील अनेक गोष्टींवर बोलली. बॉलिवूडमधील खान्ससोबत जिथे सर्व निर्माते काम करण्यास उत्सुक असतात, तिथे एकता मात्र तिला त्यांच्यासोबत काम करायचं नाही, असं बोलते.

लहानपणापासून अमिताभ बच्चन हे एकताचे आदर्श आहेत. ती मनोरंजनक्षेत्रात निर्माती म्हणून आली तेव्हापासून ती अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याचं एक स्वप्न पाहत आली आहे आणि गुडबाय या सिनेमाच्या निमित्ताने एकताचं हे स्वप्नं पूर्ण होत असल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसतच आहे. एकता सांगते, पप्पांमुळे मी लहानपणापासून बिग बी यांना जवळून पाहिलं आहे. अभिषेक आणि श्वेता यांच्या वाढदिवस पार्टीला जायचे तेव्हा मी अमिताभ बच्चन यांच्याकडेच पाहत बसायचे. ही गोष्ट बिग बी यांनाही जाणवली होती आणि त्यांनी ती पापांना सांगितली होती.

खरंतर एकताच्या कामाचा बोलबाला इतका आहे की तिच्यासोबत काम करायला बिग बी सुध्दा नकार देऊ शकले नाहीत. बॉलिवूडमधील खान मंडळींनाही एकतासोबत काम करण्याची इच्छा आहे, पण बॉलिवूडमधील एकाही खानसोबत मला काम करायचं नाही असं म्हणत एकताने खान मंडळींना धक्काच दिला आहे. जिथे बॉलिवूडमध्ये खान या नावाला मागणी आहे तिथे एकता मात्र खान हे नाव माझ्या सिनेमात येणार नाही असं म्हणतेय. एकताच्या या म्हणण्यालाही खास कारण आहे आणि तेच कारण तिने गुडबाय सिनेमाच्या ट्रेलर लाँचच्या कार्यक्रमात बिग बी यांच्यासमोरच सांगितले. एकताला शाहरूख, आमिर, सलमान, सैफ या खान नाव असलेल्या कलाकारांसोबत काम करायचं नसलं तरी एकताने लाल सिंह चढ्ढाच्या बायकॉटप्रसंगी आमिर खानला सपोर्ट केलं होतं.

एकताचं असं म्हणणं आहे की, मला भविष्यात खूप वेगवेगळया विषयांवर सिनेमे बनवायचे आहेत. महत्वाचं म्हणजे ते लवकरात लवकर पडद्यावर आणण्याची माझी इच्छा आहे. जर मी खान मंडळीसोबत काम करायचं म्हटलं तर त्यांच्या तारखा घेण्यातच माझा वेळ जाईल आणि ते मला नको आहे. २०१८ साली एकताने ही गोष्ट एका मुलाखतीत सांगितली होती. ती म्हणाली होती, मान्य आहे की माझी बॉलिवूडमध्ये वट आहे. माझ्यासोबत खान मंडळींनाही काम करायचं आहे. पण याचा अर्थ असा नाही की मी खान सेलिब्रिटींना फोन करायचा आणि त्यांना शंभर कोटी क्लबमधल्या सिनेमांची ऑफर द्यायची. त्यांचे नखरे सांभाळण्यात मला वेळ घालवायचा नाही.

गुडबाय या एकताच्या नव्या सिनेमाची सध्या उत्सुकता आहे. आजपर्यंत कुटुंबांतील आत्मियता पाहिली असेल आता एकरूपता पहा अशी या सिनेमाची वनलाइन स्टोरी आहे. घरातील आईच्या निधनानंतर वडील मुलांना कसे सांभाळतात, वडील –मुलांमध्ये कसे बंध तयार होतात याची ही कथा आहे. ७ ऑक्टोबरला हा सिनेमा रिलीज होणार आहे.

एकता पद्मश्री विजेती आहे. वयाच्या अवघ्या १५ वर्षापासून तिने कामास सुरुवात केली होती आणि आज मालिका, सिनेमा, वेब सीरिज अशा सर्व माध्यमात तिच्या नावाचा बोलबाला आहे. एकताला सन २०२० मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

फोटो सौजन्य – इंस्टाग्राम