एकता कपूरचा ज्योतिष शास्त्रावर आहे भयंकर विश्वा...

एकता कपूरचा ज्योतिष शास्त्रावर आहे भयंकर विश्वास (Ekta Kapoor Believes In Astrology So Much That You Will Be Stunned To Know)

टीव्ही आणि बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध निर्माती एकता कपूरचा ज्योतिषशास्त्रावर विश्वास आहे हे सर्वज्ञात आहे. पण तो विश्वास केवढा आहे हे फार कमी लोकांना माहित आहे.

एकता कपूरच्या हाताच्या बोटात जेवढ्या अंगठ्या असतात तेवढ्या अंगठ्या क्विचितच काहीजण घालतात. एकता स्वतःला अंधश्रद्धाळू म्हणत नाही. पण तिची मनगटं आणि हाताची बोटं एकताचा ज्योतिषावर खूप विश्वास असल्याची साक्ष देतात. एका मुलाखतीदरम्यान एकता म्हणाली होती की, “मला बरेचदा असे वाटते की मला आणखी बोटे असती तर, कारण मी आता प्रत्येक बोटात दोन-तीन अंगठ्या घालायला सुरुवात केली आहे. मी 14 अंगठ्या घालते. लोक माझ्याबद्दल काय विचार करतात याची मला पर्वा नाही. माझी आई पण म्हणते की माझी बोटे आता दिसेनाशी होतील.

इतर सेलिब्रिटींच्या तुलनेत एकता कपूरचा लूक पूर्णपणे वेगळा आहे. ती आपल्या हातात एक-दोन नव्हे तर अनेक धागे बांधून ठेवते. त्यात कलावा, तावीज आणि पूजेच्या अनेक धाग्यांचा समावेश असतो. मध्यंतरी एकता कपाळाला मोठा टिळा लावायची. मात्र, आता तिने टिळा लावणे बंद केले आहे.

अंगठ्यांव्यतिरिक्त एकता कपूरकडे तीन लकी नंबरही आहेत. 3, 6 आणि 9 हे तिचे तीन लकी नंबर आहेत. या तीन नंबरला ती स्वतःसाठी खूप लकी मानते. तिच्या चप्पलांचा रंग देखील ज्योतिषशास्त्रानुसार असतो.

एकता कपूरचा ज्योतिष शास्त्रावर खूप विश्वास आहे. आपले कोणतेही काम ती ज्योतिषांच्या सल्ल्याशिवाय करत नाही. ज्योतिषाच्या सांगण्यावरून तिने आपल्या अनेक मालिकांना K अक्षरावरुन सुरु होणारी नावे ठेवली आहेत. त्यात ‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’, ‘कहानी घर घर की’, ‘कुमकुम भाग्य’ आणि ‘कसौटी जिंदगी की’ सारख्या मालिकांचा समावेश आहे.

एकता कपूरने ‘बडे अच्छे लगते हैं’ ही मालिका पूर्णपणे प्रेमावर आधारित असल्यामुळे तिचे लॉन्चिंग आग्रा येथून करायचे ठरवले होते. तिथे प्रक्षेपणाची सर्व तयारी झाली होती. एकता आग्र्याला निघणार होती पण, या दिवशी प्रवास करणे तिच्यासाठी चांगले नाही असे तिच्या ज्योतिषाने तिला सांगितले. त्यामुळे एकताने आपला कार्यक्रम रद्द करुन आपल्या जागी वडील जितेंद्र यांना पाठवले.

आपल्या कोणत्याही मालिकेत मुख्य भूमिका करणाऱ्या कलाकारांची कुंडली एकता सर्वप्रथम जुळवून बघते, ज्यांच्या जन्मकुंडली व्यवस्थित जुळतात, तेच तिच्या मालिकांमध्ये मुख्य भूमिका करतात. एखादा कलाकार कितीही हुशार असला तरी त्याची कुंडली जुळली नाही तर एकता त्या कलाकाराला कास्ट करत नाही.