पैशांच्या घोटाळ्यावरून उद्योजक राज कुंद्रा आता ...

पैशांच्या घोटाळ्यावरून उद्योजक राज कुंद्रा आता ‘ईडी’च्या फेऱ्यात (Ed Books Raj Kundra For Money Laundering)

अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Actress Shilpa Shetty) हिचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा (Raj Kundra) पुन्हा एकदा अडचणीत आला आहे. अश्लील व्हिडिओ प्रकरणात सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने राज कुंद्रा याच्याविरोधात मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणात २०२१ मध्येच गुन्हा दाखल केला होता. त्याच्या आधारावर ईडीने याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून त्या प्रकरणातील आर्थिक व्यवहारांबाबत ईडीने तपासाला सुरुवात केली आहे.

ईडी काय करणार?

मुंबई पोलिसांनी याप्रकरणी आतापर्यंत ११ जणांना अटक केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी लॅपटॉप जप्त केले होते. त्यातील डेटामध्ये ‘हॉटशॉट’च्या १०० चित्रफीतींचा समावेश आहे. याशिवाय पोलिसांना उपलब्ध झालेल्या माहितीवरुन कुंद्रा यांचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट ही मिळाले होते. त्यात काही व्यवहारांची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार या अश्लील चित्रफीतींमार्फत एक कोटी १७ लाख रुपये कमवण्यात आल्याची माहिती मिळाली होती. या अ‍ॅप्लिकेशनचे २० लाख ग्राहक असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. ईडी आता या व्यवहारांची तपासणी करणार आहे. त्यासाठी ईडी लवकरच कुंद्राला समन्स बजावण्याची शक्यता आहे.

गुन्हे शाखेने फेब्रुवारी २०२१ मध्ये पॉर्न फिल्मचे चित्रीकरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत तपास करण्यास सुरुवात केली होती. या तपासामध्ये राज कुंद्राचे नाव सातत्याने पुढे आले. त्यामुळे पोलिसांनी त्यादृष्टीने तपास केला. या तपासात राज कुंद्रा हाच ‘मास्टरमाइंड’ असल्याचं समोर आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती.

पॉर्न फिल्मचं चित्रीकरण आणि राज कुंद्रा; नेमकं काय आहे प्रकरण?

राज कुंद्रा आणि त्याच्या ब्रिटनमध्ये राहणाऱ्या भावाने मिळून ‘केनरिन’ नावाची कंपनी स्थापन केली होती. भारतातील सायबरच्या विशेष कायद्यातून वाचण्यासाठी त्यांनी या कंपनीची नोंदणी परदेशात केली होती. या कंपनीच्या पेड अॅपद्वारे पॉर्न सिनेमे दाखवले जायचे. या पॉर्न फिल्मचे चित्रीकरण भारतामधील हॉटेल्सच्या रूममध्ये, भाड्याने घरे घेऊन केले जात. यात काम करणाऱ्या मॉडेल्सना मोठ्या सिनेमांमध्ये काम देण्याचे आमिष दाखवून या पॉर्न फिल्ममध्ये त्यांच्याकडून काम करवून घेतले जायचे. हे सर्व चित्रीकरण झाल्यानंतर तयार झालेल्या या पॉर्न फिल्म वी ट्रान्सफरद्वारे परदेशात पाठवल्या जायच्या.

राज कुंद्राने काय म्हटलं होतं?

‘माझ्या प्रॉडक्शन हाऊसने बनवलेले व्हिडिओ कामुक असू शकतात, परंतु त्यात कोणतीही शारीरिक किंवा लैंगिक क्रिया दाखवण्यात आलेली नाही. पॉर्न प्रकरणात ते व्हिडिओ मोडत नाहीत. तपास यंत्रणांनी कामुक आणि प्रौढ व्हिडिओ यांमधील फरक समजून घेणे आवश्यक आहे,’ असं म्हणत राज कुंद्राने आपली बाजू मांडली होती.

दरम्यान कुंद्रा याच्याविरुद्ध ईडीने गुन्हा दाखल केल्याबाबत कोणतीही माहिती आम्हाला प्राप्त झाली नसल्याचे त्याचे वकील प्रशांत पाटील यांनी सांगितले. पण त्यात तथ्य असेल, तर आम्ही आमच्या क्षमतेनुसार तपासाला सहकार्य करू, असेही कुंद्रा यांचे वकिल प्रशांत पाटील यांनी सांगितले आहे.