खावी फळं वेळोवेळी (Eat Fruits Frequently)

खावी फळं वेळोवेळी (Eat Fruits Frequently)

आरोग्यासाठी फळं फायदेशीर असतात, हे आपण सारेच जाणतो. मात्र कोणत्या फळात कोणती पोषणतत्त्वं असतात आणि त्यांचे फायदे काय, हे अनेकांना माहीत नसतं. त्यांच्यासाठी…

मधल्या वेळेतील भुकेसाठी आपण बरेचदा डबे धुंडाळू लागतो. अशा वेळी पोटाला आधार मिळावा म्हणून मुद्दामहून खाऊच्या डब्यात काहीतरी चटरपटर भरून ठेवतो. मात्र हे फास्ट फूड कॅटेगरीतलं चटरपटर खाऊन आरोग्य बिघडवण्यापेक्षा घरात ऋतुमानानुसार ताजी फळं आणून ठेवा. ती फ्रीजमध्ये न ठेवता, कुणालाही पटकन हाताशी मिळतील अशा ठिकाणी ठेवा आणि अधेमधे भूक लागली की, डब्बे धुंडाळण्यापेक्षा या फळांचा आधार घ्या. म्हणजे, भूकही भागेल, पौष्टिक फळं खाल्ल्याचं समाधानही मिळेल आणि आरोग्यही उत्तम राहील. कसं ते घ्या जाणून-

सफरचंद
दररोज एक सफरचंद खाल्ल्यास आजारपण दूर ठेवता येतं, हे ‘एन अ‍ॅपल अ डे किप्स डॉक्टर अवे’ या म्हणीमुळे सर्वांना माहीत आहेच. सफरचंदामध्ये खनिज आणि जीवनसत्त्व मुबलक प्रमाणात असतात. पोटॅशियम, सोडियम, फॉस्फरस, लोह, कॅल्शियम आणि सल्फरही असतं. तसंच अ, ब आणि क ही जीवनसत्त्वंही असतात. सफरचंदाच्या सालीमध्ये गरापेक्षा जास्त प्रमाणात अ आणि क जीवनसत्त्व असतात.

लाभ
–    लहान मुलांची शारीरिक आणि मानसिक वाढ उत्तम होण्यास मदत होते.
–    अशक्तपणा दूर करून ऊर्जानिर्मिती करतं.
–    शरीराची ताकद आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास उपयुक्त ठरतं.
–    शरीर आणि मेंदूचा थकवा दूर होतो. नैराश्य कमी होतं.
–    आजारपणात शरीरात निर्माण झालेली विष द्रव्यं शरीराबाहेर काढून टाकण्यासाठी किंवा त्यांची तीव्रता कमी करण्यासाठी गॅलॅक्टुरॉनिक अ‍ॅसिड मदत करतं. ते सफरचंदाच्या गरामध्ये मुबलक प्रमाणात असतं.
–    सफरचंदामधील अधिक प्रमाणात असलेलं गॅलॅक्टुरॉनिक अ‍ॅसिड आणि मॅलिक अ‍ॅसिड शरीराच्या चयापचय क्रियेस उपयुक्त ठरतं. त्यामुळे शौचाच्या तक्रारी कमी होऊन पचन शक्ती सुधारते.
–    सफरचंदाच्या नियमित सेवनाने दात स्वच्छ राहतात. हिरड्या मजबूत होतात.
–    त्यातील आम्लतेमुळे डोकेदुखी, सांधेदुखी व गुडघेदुखी कमी होते.
–    पोटॅशियम आणि फॉस्फरस विपुल प्रमाणात असल्यामुळे हृदयविकाराची शक्यता कमी होते. 
–    आजारपण दूर ठेवते.
–    त्यातील क जीवनसत्त्व आणि पेक्टिनमुळे रक्तवाहिन्यांमधील चरबी कमी होते. त्यामुळे स्थूलता कमी करण्यास मदत होते.
–    सफरचंदात लोह, आर्सेनिक आणि फॉस्फरस विपुल प्रमाणात असल्यामुळे अ‍ॅनिमियात लाभ होतो.
–    उच्च रक्तदाबातही सफरचंद फायदेशीर ठरतं.
–    सफरचंद खाल्ल्यास कॅन्सरची शक्यताही कमी होते.
–    रक्तातील हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढवण्यासाठी सफरचंद मदत करतं.

केळं
बारमाही उपलब्ध असणारी केळी ऊर्जेचं उत्तम स्रोत असतात. यात पोटॅशियम, फॉलेट, सोडियम, क्लोरीन, लोह, ग्लुकोज आणि अमिनो अ‍ॅसिड असतं. केळ्यामध्ये 70 टक्के पाणी, 0.8 टक्के खनिज द्रव्यं, 0.4 टक्के तंतुमय पदार्थ, प्रथिनं आणि जीवनसत्त्वं असतात. केळ्यात कॅल्शियम, लोह, फॉस्फरसही असतं.

लाभ
–    केळं शक्तिवर्धक असल्यामुळे लहान मुलांना नियमितपणे दिल्यास लाभ होतो.
–    केळं रोग प्रतिकारशक्ती आणि स्टॅमिना वाढवतं.
–    केळं शरीरातील जीवनसत्त्व आणि खनिजांची कमतरता भरून काढतं.
–    केळ्यात अधिक प्रमाणात असलेल्या कॅल्शियममुळे हाडं आणि स्नायू मजबूत होण्यास मदत होते.
–    केळ्यातील साखर पचनास सुलभ असल्यामुळे शरीराचा थकवा त्वरित दूर होऊन, उत्साह वाढतो.
–    पचनसंस्थेचं आरोग्य उत्तम राखण्यासाठी, मलविसर्जनाची क्रिया सुलभ होण्यासाठी केळं उपयुक्त ठरतं.
–    केळ्याच्या सेवनामुळे वाढलेलं पित्त कमी होतं.
–    मलावरोध, आतड्याची जळजळ, मूळव्याध, जुलाब, संधिवात इत्यादी रोगांवर केळ्याचा आहार फायदेशीर ठरतो.
–    केळ्याच्या नियमित सेवनाने रक्तदाब आणि कॉलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात राहते.

संत्रं
संत्र्यामध्ये क, अ आणि ब जीवनसत्त्व, फॉलेट, पोटॅशियम, सोडियम, सायट्रिक अ‍ॅसिड, लोह, फॉस्फरस, मँगनिज आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं. याशिवाय संत्र्यामध्ये आर्द्रता, प्रथिनं, तंतुमय आणि पिष्टमय पदार्थही असतात. संत्र्याची सालं, पानं, फुलं आणि फळं या सर्वांमध्ये औषधी गुणधर्म असतात.

लाभ
–    संत्र्यामुळे शरीराची पचनशक्ती वाढते. त्यामुळे भूक मंदावणं, अपचन, पोटात गॅस धरणं अशा तक्रारी असल्यास संत्र्याचा रस उपयुक्त ठरतो.
–    रोग प्रतिकारशक्ती वाढवतं.
–    उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवतं.
–    संत्र्याच्या नियमित सेवनाने हृदयविकार दूर राहतात.
–    संत्रं दात आणि हिरड्यांचं आरोग्य राखण्यासाठी मदत करतं.
–    मूतखड्याच्या समस्येतही संत्रं फायदेशीर ठरतं.
–    मलावरोधात फायदेशीर ठरतं.
–    उत्साहवर्धक संत्रं थकवा दूर करतं.
–    संत्र्याच्या सेवनाने रूक्ष, काळवंडलेली त्वचा मऊ आणि मुलायम होते.
–    आतड्यांमधील कृमी नष्ट होतात.
–    अतिसार, वांती या विकारांमध्ये संत्रं उपयुक्त ठरतं.

पपई
पपई हे शरीराची ताकद वाढवणारं फळ आहे. पपईमध्ये अ, क, ई जीवनसत्त्वं आणि बीटा कॅरेटिन असतं. तसंच यात सिलिकॉन, पोटॅशियम, कॅल्शियम, तांबं, फोपलेट, फ्रक्टोस आणि फायबर भरपूर प्रमाणात आढळतं.

लाभ
–    पपई पचन क्रिया सुरळीत ठेवते.
–    मधुमेह, हृदय रोग, आतडे आणि पोटाचे विकार इत्यादींमध्ये पपई लाभदायी आहे.
–    पपई मूळव्याधीवर गुणकारी आहे.
–    मूत्रपिंडाचे विकार कमी करण्यासाठी पपई खाण्याचा सल्ला दिला जातो.
–    पपईच्या रसामुळे आम्लपित्त कमी होते.
–    जठराला आलेली सूज कमी होते.
–    पपईच्या सेवनाने अन्नाचं पचन सुलभ होते.
–    पपईने मांसाहाराच्या पचनास सुलभता प्राप्त होते.
–    त्वचा आणि डोळ्यांसाठी पपई उपयुक्त आहे.
–    पपईच्या नियमित सेवनाने हाडं मजबूत होतात.

कलिंगड
कलिंगडामध्ये फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम, सोडियम, कॅल्शियम, लोह, सुक्रोज, जीवनसत्त्व ब आणि ई असतं. कलिंगडाच्या सेवनाने शरीराला थंडावा प्राप्त होतो. कलिंगडातील साखर सहज पचून रक्तामध्ये मिसळल्यामुळे ते उपयुक्त ठरतं. कलिंगड शक्तिवर्धक, पौष्टिक, दाहशामक, पित्तनाशक आहे. कलिंगडामध्ये पाणी आणि पोटॅशियमचं प्रमाण सर्वाधिक आहे.

लाभ
–    कलिंगडही ऊर्जेचा उत्तम स्रोत आहे.
–    शरीरातील जीवनसत्त्वाची कमतरता पूर्ण करतो.
–    वजन कमी करण्यास मदत करतो.
–    कलिंगड मूत्राशय आणि मूत्रपिंडासंबंधी समस्या दूर करण्यास मदत करतं.
–    ते शरीरातील पित्त कमी करतं.
–    उष्णतेच्या विकारामुळे होणार्‍या डोकेदुखीच्या त्रासात उपयुक्त ठरतं.
–    ते कर्करोग दूर ठेवण्यास मदत करतं.
–    कलिंगड मलावरोधाची तक्रार कमी करून पोट साफ करतं.
–    सौंदर्यवर्धनासाठीही कलिंगड उपयुक्त ठरतं.
–    कावीळ, टायफॉइड आणि उच्च रक्तदाब इत्यादींमध्ये उपयुक्त ठरतं.

अननस
खनिज, जीवनसत्त्व ब आणि क, पोटॅशियम, फॉलेट, सुक्रोज, कार्बोहायड्रेट, कॅल्शियम, फॉस्फरस, ब्रोमोलिन, कॅरेटिन आणि इंजाइमने परिपूर्ण असतं. अननसात ‘क’ जीवनसत्त्व हे भरपूर प्रमाणात असतं. अननसामध्ये 87 टक्के सायट्रिक आम्ल आणि 13 टक्के मॅलिक आम्ल असतं. ही दोन्ही आम्लं शरीरास पोषक असतात. ही शरीरात उष्णता आणि ऊर्जा निर्मिती करतात.

लाभ
–    रक्त शुद्ध करण्यास मदत करतं. रक्ताभिसरण वाढवतं.
–    हाड मजबूत करतं.
–    रोग प्रतिरोधक शक्ती वाढवतं.
–    पचन, सर्दी-खोकला, सूज इत्यादींमध्ये लाभदायी आहे.
–    डोळ्यांची दृष्टी वाढवतं.
–    अननसाच्या गरामधील तंतुमय पदार्थ (फायबर) शरीराची पचन क्रिया व्यवस्थित राखतात. अन्नाचं पचन सुलभ होतं.
–    प्रथिनंयुक्त आहाराचं पचन सुलभ होण्यासाठी अननस उपयुक्त ठरतं.
–    अननसामध्ये ब्रोमेलिन नावाचं एन्झाइम असतं. त्यामुळे शरीराचा दाह आणि सूज कमी होते.
– अननसामुळे उदर-पित्त व्याधी, कावीळ, पंडुरोग (अ‍ॅनिमिया) यांसारखे रोग बरे होतात.
–    पोटदुखी कमी होते.
–    अननसाच्या सेवनाने पोटातील कृमी-जंत निघून जातात.
–    पिकलेले अननस खाल्ल्यामुळे पित्त कमी होतं. उष्णतेचे विकारही कमी होतात.
–    अननस त्वचा रोगांवर अतिशय उपयुक्त ठरतं.
–    अननसाच्या नियमित सेवनामुळे हृदयाचं आरोग्य चांगले राहते.

डाळिंबं
डाळिंबामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, सोडियम, जीवनसत्त्व क, फायबर, कार्बोहायड्रेट आणि प्रथिनं भरपूर प्रमाणात असतं. डाळिंब रक्तवर्धक आहे.

लाभ
–    डाळिंबामुळे बाळंतिणीचं दूध वाढवण्यास मदत होते.
–    डाळिंबाच्या सेवनाने जुलाब, आमांश, मूळव्याध, जठर विकार बरे होतात.
–    डाळिंब त्वचा रोगांवर उपयुक्त ठरतं.
–    भूक वाढवतं.
–    डाळिंब पित्तनाशक असल्यामुळे पित्ताच्या तक्रारींवर उत्तम ठरतं.
–    डाळिंबाने वात दोष दूर होतो.
–    डाळिंब हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करतं.
–    डाळिंबाने मलप्रवृत्ती सुधारून शौचास साफ होतं.
–    आतड्यांसंबंधी समस्या दूर करून पचन क्रिया सुलभ राखतं.
–    उच्च रक्तदाब, सूज, जळजळ, संधिवात कमी करतं
–    कॅन्सरपासून बचाव करतं.
–    वृद्धावस्थेतील अल्झायमरची शक्यता कमी करतं.

द्राक्षं
द्राक्षांमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, क जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असतं. द्राक्षं ग्लुकोजने परिपूर्ण असतात. याशिवाय, लोह, पोटॅशियम, फॉस्फरस, जीवनसत्त्व ब आणि ई, सोडियम क्लोराइड, पिष्टमय पदार्थ इत्यादीही डाळिंबात भरपूर प्रमाणात असतात.

लाभ
–    ऊर्जेचा उत्तम स्रोत आहेत.
–    रक्त शुद्ध करण्यास मदत करतं.
–    हृदयरोग आणि कॅन्सरचा धोका कमी करतात.
–    अस्थमा आणि मलावरोधाची समस्या असणार्‍या रुग्णांसाठी फायदेशीर आहे.
–    द्राक्षांचा रस नियमितपणे प्यायल्यास पचनसंस्था मजबूत होते.
–    संसर्गाचा धोका कमी होतो.
–    द्राक्षं तहान भागवतात.
–    द्राक्षांमुळे पित्त दोष कमी होतो.
–    द्राक्षांच्या सेवनाने थकवा कमी होतो.
–    नियमित द्राक्षं खाल्ल्यास शरीर संवर्धन उत्तम होतं.
–    ताप, क्षय, अशक्तपणा, पचन शक्ती मंदावणं या विकारांवर द्राक्षं उत्तम औषध आहे.
–    द्राक्षातील तंतुमय पदार्थ, सेंद्रिय आम्ल आणि शर्करा पोट साफ करण्यास मदत करतात.
–    द्राक्षं शरीरातील रक्ताचं प्रमाण वाढवण्यास मदत करतात.
–    नियमित द्राक्षांचं सेवन मलावरोध, बद्धकोष्ठता हे विकार दूर करतं.
–    द्राक्ष खाल्ल्याने डोकेदुखीचा त्रास कमी होतो.
–    दात आणि हिरड्यांच्या आजारामध्ये गुणकारी ठरतं.
–    आम्लपित्त, अपचन, ढेकर येणे या पित्त विकारांवर द्राक्ष खाल्ली असता आराम मिळतो.
–    द्राक्षामध्ये पाण्याचे प्रमाण अधिक आहे, तसेच पोटॅशियम क्षारही आहेत. त्यामुळे मूतखडा, लघवीच्या वेळी होणार्‍या वेदना-जळजळ यावर द्राक्षं उपकारक ठरतात.

मोसंबी
मोसंबीमध्ये क जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असतं. याव्यतिरिक्त त्यात जीवनसत्त्व अ आणि ब, पोटॅशियम, फॉलेट, लोह, अमिनो अ‍ॅसिड, झिंक आणि जीवनसत्त्व ब असतं. शर्करा आणि फॉस्फरसचं प्रमाण अधिक असतं.

लाभ
–    मोसंबी खाल्ल्याने रोग प्रतिकारशक्ती वाढते, त्यामुळे लहान मुलांसाठी फायदेशीर ठरते.
–    मोसंबीच्या रसाने शरीराला थंडावा प्राप्त होतो.
–    मोसंबी पाचक, हृदयास उत्तेजना देणारी, धातुवर्धक आणि रक्त सुधारक आहे.
–    उत्साहवर्धक असल्यामुळे अशक्त, आजारी, वृद्ध आणि बालकांसाठी विशेष उपयुक्त ठरते.
–    मोसंबी हृदयासाठी उपयुक्त आहे.
–    मोसंबीच्या नियमित सेवनाने पचन क्रिया उत्तम राहते.
–    कॉलेस्टेरॉलची पातळी आणि वजन कमी करण्यास मदत करते.
–    मोसंबीमुळे शरीरातील पित्त कमी होतं.
–    मोसंबी खाल्ल्याने दात स्वच्छ होतात.
–    नियमित मोसंबी खाल्ल्यास मलावरोधाची तक्रार दूर होते.
–    धमन्यांचं संरक्षण करते.
–    मूतखडा, निमोनिया, सर्दी आणि तापात लाभदायी ठरते.
–    मोसंबीच्या नियमित सेवनाने चेहरा उजळ होतो.