आई आणि मुलीच्या वेगळ्या प्रेमाची नवी मालिका ...

आई आणि मुलीच्या वेगळ्या प्रेमाची नवी मालिका ‘लेक माझी दुर्गा’ (‘Durga Maajhi Lek’ A New Emotional Story Of Mother And Daughter)

व्हेलन्टाईन डे म्हणजे प्रेमिकांनी एकमेकांवर प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. पण या प्रेमदिनी कलर्स मराठीने ‘लेक माझी दुर्गा’ ही मायलेकीच्या वेगळ्या प्रेमाची, त्यांच्या भावविश्वाची, हृदयस्पर्शी मालिका सादर केली आहे. ही नवी मालिका आजपासून सायंकाळी साडेसात वाजता प्रदर्शित होत आहे.

असं म्हणतात की, आयुष्याच्या पुस्तकातलं सर्वात सुंदर पान म्हणजे बालपण! बालपणातील अविभाज्य घटक असतात आई-बाबा. मात्र बालपणाच्या या भावविश्वात एकाचं जरी प्रेम मिळालं नाही तर, त्याचे व्रण मनावर आयुष्यभर राहतात. याच धाग्यावर आई आणि मुलीचं हळूवार, भावनिक नातं उलगडणारी कथा ‘लेक माझी दुर्गा’ या मालिकेत सादर करण्यात आली आहे.

अभिजीत गुरू लिखित या मालिकेत आईची भूमिका हेमांगी कवी साकार करते आहे. त्याबद्दल ती म्हणते, “दुर्गा या मुलीची आई, वैजू हे पात्र मी करते आहे. आई म्हणजे मायाळू, दयाळू, सोशिक, परिस्थितीला सांभाळून घेणारी असते. पण वैजू ही आई अगदी वेगळी आहे. ती परीस्थितीशी झुंजणारी आहे. तिच्या लेकीच्या मार्गात काही विघ्न आले तर ती दुर्गेसारखी उभी राहणारी आहे. अभिजीत गुरू यांनी ही व्यक्तीरेखा उत्तमरित्या लिहिली आहे. ती साकारणं मला आव्हान वाटत आहे.”

वडिलांच्या प्रेमापासून वंचित असलेली, पण आईचे प्रेम भरभरून मिळणारी ही लहान मुलगी, निधी गौरव रासने नावाची नवोदित कलाकार साकार करते आहे.