देवीच्या मंडपात सोनू सुदची मूर्ती उभारून भक्तां...
देवीच्या मंडपात सोनू सुदची मूर्ती उभारून भक्तांनी केला त्याचा सन्मान (Durga Bhakts Pay Tribute To Sonu Sood, Actor Is Honoured By Durga Puja Pandal)


करोनाच्या संकटात गेल्या वर्षी, अभिनेता सोनू सुद गरीबांच्या मदतीला धावून गेला होता. त्याने हजारो लोकांना त्यांच्या घरी पोहचवले. कित्येकांना रोजगार मिळवून दिला. अजूनही त्याच्या मदतीचा ओघ थांबलेला नाही. गरीबांच्या मुलांसाठी शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देत आहे. सोनूच्या या अभूतपूर्व समाजकार्यामुळे लोक त्याला देव मानू लागले आहेत. त्यांच्या या मान्यतेची प्रचिती यंदा कलकत्त्याच्या दुर्गा पूजेत दिसून आली आहे.

कलकत्त्याच्या केशोपूर प्रफुल्ल कानन मंडपात गेल्या वर्षी देवीच्या मूर्तीसोबत सोनू सुदची मूर्ती बसवून त्याचा सन्मान करण्यात आला आहे. दुर्गादेवीच्या भक्तांकडून सोनूचे आभारप्रदर्शन अशा पद्धतीने करण्यात आले आहे.


या संदर्भात येथील लोकांचं असं म्हणणं आहे की, आम्ही या पद्धतीने सोनू सुदचे जाहीर आभार प्रकट करत आहोत. सोनूने करोना पीडितांबरोबरच वादळग्रस्त गरीबांची मदत केली होती. त्यामुळे देवीच्या मंडपात अशाच एका पीडित गावाचा देखावा तयार करण्यात आला असून त्यामध्ये सोनू लोकांची मदत करत असल्याची मूर्ती बसविण्यात आली आहे.

कलकत्त्यातील दुर्गा भक्तांच्या या प्रेमावर सोनूने ट्वीट केले आहे. त्यात तो म्हणतो, “लोकांचे हे प्रेम पाहून मी कृतकृत्य झालो आहे. गेल्या वर्षी देखील त्यांनी मला देवीच्या मंडपात स्थान दिले होते. लोक या मंडपात जातात व सेल्फी काढून सोशल मीडियावर मला टॅग करतात. दुर्गामातेच्या आशीर्वादानेच मी हे करू शकलो, अशी तेव्हा माझी भावना होते. तिनेच मला हा मार्ग दाखविला आहे.”

सोनू सुदच्या या मदतकार्याने लोक त्याच्यावर प्रेम करू लागले आहेत. आपली दुकाने, घर यांना त्यांनी सोनूची नावे दिली आहेत.