एन्टी कोविड ड्रग २ DG : शंका दूर करणारी सर्व मा...

एन्टी कोविड ड्रग २ DG : शंका दूर करणारी सर्व माहिती (DRDO’s 2-DG Anti-Covid Drug : From Doses – Side Effects To Price, Know All )

करोनाच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण देशामध्ये दहशत निर्माण केलेली आहे. या संकट काळातून लवकरात लवकर बाहेर पडण्यासाठी सर्वस्तरीय प्रयत्न केले जात आहेत. अशातच भारताच्या संरक्षण आणि विकास प्राधिकरणाच्या (डीआरडीओच्या) इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लिअर मेडिसीन अँड अलाइड सायन्सेस (INMAS) या औषध उत्पादन करणाऱ्या विभागाने डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीजसोबत मिळून २ डीजी हे एन्टी कोविड औषध विकसित केलं आहे. तर काही दिवसांपूर्वीच ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने २ डीजीच्या वापराला मान्यता दिली आहे.

हे औषध कसं काम करतं?
आपल्या शरीरातील पेशींना या विषाणुचा संसर्ग होतो तेव्हा त्या जास्त ग्लूकोजची मागणी करतात. हे औषध म्हणजे ग्लूकोजचे बदललेले रुप आहे. रुग्णाला हे २- डीजी औषध दिल्यानंतर ते पेशीमध्ये जाऊन विषाणुच्या वाढीस आळा बसेल. तसेच रुग्णाला सकाळ-संध्याकाळ या औषधाचा डोस दिल्यानंतर विषाणुचा संसर्ग पूर्णतः नष्ट होण्यास मदत मिळणार आहे. 

किती प्रभावी आहे?
२- डीजी औषधाच्या मेडिकल चाचण्या झाल्या आहेत आणि ज्या रुग्णांवर औषधांच्या चाचण्या झाल्या त्यांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा झाल्याचं दिसून आल्याचा दावा करण्यात आला आहे. इतकंच नाही तर हे औषध कोव्हिड रुग्णांची ऑक्सिजनवरील अवलंबित्व कमी करायला मदत करतं, असा दावा डीआरडीओनं केला आहे. याशिवाय, हे औषध घेणाऱ्या रुग्णांची कोव्हिड आरटीपीसीआर चाचणी इतर रुग्णांच्या तुलनेत कमी दिवसात निगेटिव्ह येत असल्याचंही संशोधकांचं म्हणणं आहे.

औषध कसे घ्यायचे? याचे स्वरुप कसे आहे?
‘२- डीजी’ औषध ५.८५ ग्रॅमच्या पाउचच्या स्वरुपात उपलब्ध करण्यात आले असून त्याचे प्रत्येक पाउच सकाळी आणि संध्याकाळी पाण्यात विरघळवून घ्यायचं आहे. कोविड रुग्ण पूर्णपणे बरा होण्यासाठी ५ ते ७ दिवस हे औषध द्यावे लागणार आहे.

या औषधाची किंमत किती आहे?
२ डीजी औषधाची किंमत अजून जाहीर केलेली नाही. परंतु, याच्या एका पाउचची किंमत ५०० ते ६०० रुपयांपर्यंत असेल असे म्हटले जात आहे. याबाबतचा निर्णय डॉ. रेड्डीज लॅबोरेटरी घेईल. असे असले तरीही आरोग्य मंत्रालयाने मात्र याची किंमत किफायतशीर असेल असे म्हटले आहे.

केव्हा उपलब्ध होणार?
काल १७ मेला लोकार्पण झालेले हे औषध लगेचच सामान्य जनतेसाठी रुग्णालयांमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. लवकरात लवकर जास्तीत जास्त रुग्णांना हे औषध उपलब्ध व्हावे यासाठी याचे उत्पादनही वेगाने वाढवले आहे. तरीही सध्या डॉक्टरांच्या सल्ल्याने केवळ आपत्कालीन परिस्थितीत हे वापरावे असे सांगितले आहे.

कोविड -१९ च्या विषाणूस आळा बसेल का?
डीआरडीओच्या संशोधकांनी गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात या औषधावर काम सुरू केले होते. त्या प्रयोगात या औषधातले रेणू कोरोनाच्या Sars-CoV-2 विषाणूला आळा घालण्यात मदत करत असल्याचे आढळून आले आहे.

औषधाचे काही दुष्परिणाम?
डीआरडीओने डॉक्टर रेड्डीज लॅबच्या सहकार्याने कोव्हिड पॉझिटिव्ह रुग्णांवर या औषधाच्या दोन टप्प्यात क्लिनिकल चाचण्या केल्या. या टप्प्यात रुग्णांसाठी हे औषध सुरक्षित असल्याचे म्हणजेच औषधामुळे कोव्हिड पॉझिटिव्ह रुग्णाला अपाय होत नसल्याचे आढळले आहे. शिवाय, त्यांच्या प्रकृतीत सुधारणाही आढळली. हे औषध अगदी ६५ वर्षांच्या रुग्णांसाठी तितकेच प्रभावी असल्याचे दिसून आले आहे. हे पाहता अजून तरी याचे काही दुष्परिणाम नाहीत असे म्हणता येईल.

लहान मुलांना हे औषध देता येईल?
खरं तर या औषधाची चाचणी १८ वर्षाँवरील रुग्णांवर केली गेली आहे. आणि त्यांना कोणत्याही प्रकारचे नुकसान झालेले आढळले नाही. तरीही लहान मुलांना हे औषध देता येईल का, यासंबंधीचा निर्णय ड्रग कंट्रोलरच घेतील.