या दिवसात काय खावे, काय खाऊ नये (Do’s And...

या दिवसात काय खावे, काय खाऊ नये (Do’s And Don’ts Of Diet In Monsoon)


पावसाळा सोबत अनेक संसर्गजन्य रोग घेऊन येतो. या रोगांपासून दूर राहण्यासाठी आहाराकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. काय खावं, यासोबतच काय खाऊ नये, हेही माहीत करून घ्यायला हवं. त्याविषयी जाणून घेऊ-
जलधारा बरसू लागल्या की, आपसूकच घराघरांतून वाफाळलेला चहा आणि गरमागरम भजीची फमाईश सुरू होते. कडाक्याच्या उन्हानंतर या जलधारांमुळे वातावरणात थंडावा पसरलेला असतो. मग या थंड वातावरणात वेध लागतात ते गरमागरम चहा अन् भजीचे. परंतु, हा पावसाळा थंडाव्यासोबतच अनेक संसर्गजन्य रोगही घेऊन येतो, हे विसरून चालणार नाही. पावसाळ्याचा मनमुराद आनंद लुटायचा असेल, तर या रोगांपासून दूर राहायला हवं आणि या रोगांपासून दूर राहण्यासाठी आहाराकडे विशेष लक्ष द्यायला हवं. म्हणूनच पावसाळ्यात आरोग्य राखण्यासाठी काय खावं, यासोबतच काय खाऊ नये, हेही माहीत करून घ्यायला हवं. त्याविषयी जाणून घेऊ-
पालेभाज्या
अगदी शाळेत असल्यापासून आपण वाचत, ऐकत आलो आहोत की, उत्तम आरोग्यासाठी पालेभाज्यांचा आहारात समावेश करणं अत्यावश्यक आहे. तेव्हा कुणी सांगितलं की, पावसाळ्यात पालेभाज्या खाऊ नयेत, तर ‘हे काय नवीन’, असं म्हणून अनेकांच्या भुवया उंचावू शकतात. पण हे काही नवीन नाही. पावसाळ्यात पालेभाज्या खाणं टाळलेलंच बरं. कारण पावसाळ्यात या पालेभाज्यांमध्ये साचलेला मळ, घाण, चिकचिकीतपणा स्वच्छ करणं तसं कठीण असतं. शिवाय या मळामुळे पालेभाजीमध्ये जंतुसंसर्ग होण्याची सर्वाधिक शक्यता असते. म्हणूनच पावसाळ्यात पालक, कोबी, फ्लॉवर अशा भाज्या खाणं टाळा. त्याऐवजी कारली, दुधी भोपळा, पडवळ, ढेमसे या फळभाज्यांचा आहारात समावेश करा. कोणतीही भाजी खाण्यापूर्वी ती व्यवस्थित धुऊन स्वच्छ करून, चांगली शिजवलेली असतील, याची खात्री करून घ्या.

फळांचा रस, चिरलेली ताजी फळं किंवा फळांचे पदार्थ

चिरलेली ताजी फळं, ताज्या फळांचा रस किंवा ताज्या फळांपासून तयार केलेला कोणताही पदार्थ, अधिक काळ उघडा राहिला, तर तो न खाणंच योग्य ठरतं. त्यातही रस्त्यावर चिरलेली फळं विकणारे विक्रेते, ती फळं बराच काळ आधीच चिरून ठेवतात. त्यामुळे ती दूषित हवेच्या संपर्कात येण्याची शक्यता वाढते. शिवाय त्यांवर माश्या बसलेल्या असण्याचीही शक्यता असते. त्यापेक्षा घरी चिरलेली फळं, फळांचा रस किंवा फळांच्या इतर पदार्थांनाच प्राधान्य द्या. त्यातही फळं चिरली किंवा रस तयार केला की, ते लगेच ग्रहण करा. घरीही फळं चिरून बराच काळ ठेवू नका. उघडी तर मुळीच ठेवू नका. फळं चिरा आणि लगेच खा.तळलेले पदार्थ पावसाळ्यात भजी, बटाटे वडे इत्यादी खाण्याची कितीही इच्छा होत असली, तरी या मौसमात तळलेले पदार्थ टाळणंच योग्य ठरतं. याला वैज्ञानिक आधारही आहे.
पावसाळ्यातील अति दमट वातावरणात आपली पचनक्रिया मंदावते. अशा वेळी तोंडाला पाणी आणणारी भजी, बटाटा वडा, समोसा, कचोरी पोटाला मात्र त्रासदायक ठरू शकते. तळलेल्या पदार्थांमुळे पोट गच्चं होणं, खराब होणं अशा समस्या उद्भवू शकतात. खारट पदार्थांमुळेही आरोग्य बिघडू शकतं.

शीतपेयं
थंड पेयांमुळे शरीरातील खनिजं कमी होतात. त्यामुळे शरीरात स्रवणार्‍या विविध स्रावांचं प्रमाण कमी होतं. पावसाळ्यात आधीच पचनक्रिया मंदावलेली असते, अशात असं काही होणं धोक्याचंच आहे. हे टाळण्यासाठी स्वतःसोबत एक पाणी किंवा लिंबूपाणी भरलेली बाटली बाळगा किंवा आल्याचा चहा किंवा ग्रीन-टी यासारख्या गरम पेयांना प्राधान्य द्या. यामुळे पचनक्रियाही सुरळीत राहील. या मौसमात दुग्धजन्य पदार्थांचं सेवनही बेताचंच ठेवा, कारण त्यामुळेही पचनक्रिया बिघडू शकते. त्यापेक्षा उकळलेलं-गाळलेलं पाणी किंवा लिंबूपाणी पिण्यावरच भर द्या.

मासे
पावसाळा हा माशांचा प्रजनन काळ असतो. त्यामुळे या काळात मासे खाणं टाळणंच योग्य ठरतं. त्यामुळे या काळात मांसाहाराची इच्छा तृप्त करण्यासाठी चिकन किंवा मटणाचा आस्वाद घ्या. अगदी मासेच खायचे असतील, तर ते ताजे असतील याची खात्री करून घ्या. तसंच ते शिजवतानाही विशेष काळजी घ्या. मासे व्यवस्थित शिजवा.
त्यातही रस्त्यावर विक्री होणार्‍या अशा पदार्थांपासून चार हात दूरच राहा. त्या पदार्थांच्या बाबतीत तर स्वच्छता आणि दर्जा यांचीही शाश्‍वती देता येत नाही. पाणीपुरीमधील पाणी कसं असेल, काही सांगता येत नाही. असंही या ऋतूमध्ये जंतू, कीटक भरपूर असतात, त्यात असा धोका पत्करणं शहाणपणाचं ठरणार नाही.

लक्षात ठेवा

  • हलका आहार घ्या. रस्त्यावर विक्री होणारे पदार्थ खाणं टाळा.
  • पावसामुळे व्यायामाचा आळस करू नका. नियमितपणे व्यायाम करा.
  • या मौसमात वैयक्तिक स्वच्छता अतिशय महत्त्वाची आहे. पावसाळ्यामध्ये घाण पाण्यापासून बचाव होणं तसं कठीणच असतं. तेव्हा घरी आल्यानंतर केवळ पाण्याने हातपाय धुणं पुरेसं होत नाही. पावसाळ्यात घरी परतल्यावर शक्यतो अंघोळ करणंच योग्य ठरतं. तरीही ते शक्य नसेल तर किमान हातपाय धुणं, तेही अँटी-बॅक्टेरीयल मिश्रणाने किंवा साबणाने स्वच्छ करणं महत्त्वाचं ठरतं.
  • या ऋतूमध्ये नानाविध संसर्ग होण्याची शक्यता असते. कान-डोळ्यांचा संसर्ग, ताप, सर्दी-खोकला अशा बर्‍याच आरोग्याच्या तक्रारी या मौसमात अनेकांना होत असतात. तेव्हा आरोग्याबाबतच्या कोणत्याही अगदी लहानसहान तक्रारीकडेही मुळीच दुर्लक्ष करू नका.
  • पावसाळ्यात जास्त तहान लागत नाही. मात्र म्हणून शरीराला पाण्याची गरज भासत नाही, असं नाही. म्हणूनच थोड्या थोड्या वेळाने थोडं थोडं पाणी पीत राहा. अन्यथा डिहायड्रेशनमुळे पचनक्रिया मंदावून शरीरात सुस्ती राहू शकते.