उदरभरण नोहे… (Do’s and Don’ts...

उदरभरण नोहे… (Do’s and Don’ts after Meals)

अन्न ही मानवाची मूलभूत गरज आहे. परंतु केवळ पोट भरणे म्हणजे जेवण नाही. आरोग्यासाठी शास्त्रशुद्ध आहार आवश्यक आहे. जेवण बनविताना त्यासाठी लागणार्‍या काही गोष्टींची तयारी करावी लागते. प्रत्येक पदार्थ बनविण्याच्या पद्धती ह्या ठरलेल्या आहेत, त्याप्रमाणेच ते बनवावे लागतात नाहीतर
पदार्थ बिघडतो. त्याप्रमाणे रोजच्या जेवणापूर्वी आणि जेवल्यावर काय करावे आणि काय करू नये, याबाबत काही नियम पाळणे आवश्यक असते.

जेवल्यानंतर कराव्या अशा हितकारक गोष्टी
शतपावली – जेवणानंतर मंदगतीने अर्धा ते पाऊण तास चालणे म्हणजे शतपावली. दुपारच्या आणि रात्रीच्या दोन्ही जेवणानंतर शतपावली केल्यास फारच उत्तम. त्यामुळे अन्नपचन व्हायला मदत होते. शतपावलीमुळे शरीराच्या काही कॅलरीज खर्च होऊन वजनवाढ आटोक्यात राहते. शतपावली भरभर चालून करायची नसते. सावकाश आणि जास्तीत जास्त 10-15 मिनिटे चालावे. अगदी घरातल्या घरात तसेच ऑफिसमध्ये असणार्‍यांनी बाहेरच्या आवारात शतपावली करण्यास हरकत नाही.
गरम पाणी पिणे – वैद्यकीय सल्ल्यानुसार जेवणानंतर अर्ध्या तासाने गरम पाणी प्याल्यास अन्नपचन उत्तम होते.

मुखशुद्धी – आपल्याकडे अगदी पूर्वीपासून जेवणानंतर मुखशुद्धीसाठी पान खाण्याची पद्धत होती. त्यात विडा, सुपारी, बडीशेप, धणाडाळ, वेलची, लवंग, कलिंगड, भोपळ्याच्या बिया अशा अनेक वस्तू घेतल्या जात. आता पान खाण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. परंतु आपण बडीशेप, धणाडाळ खातो. अर्थात प्रत्येकाने आपल्या आवडीप्रमाणे खावे, यासाठी कोणताही नियम नाही.
दात घासणे – जेवल्यानंतर प्रथम व्यवस्थित चुळा भराव्यात. हात आणि तोंड धुवावे. दाताच्या फटीत गेलेले अन्न हलक्या हाताने बाहेर काढावे. ते तसेच राहिले तर मुखदुर्गंधी आणि दाताचे अनेक आजार होतात. जेवल्यानंतर अर्ध्या तासाने दात घासण्याची सवय ठेवावी.
गप्पा मारणे – जेवल्यानंतर घरातील सगळ्यांनी एकत्र बसून किंवा मित्रपरिवारांसोबत गप्पा मारल्यास शारीरिकच नव्हे तर मानसिक तणावही दूर होतो. शांत झोप लागते.
उद्याची तयारी – रात्रीच्या जेवणानंतर दुसर्‍या दिवशीचं वेळापत्रक आखून ठेवल्यास सकाळी उठून घाई होत नाही. तसेच वेळेचं नियोजनही होते.

जेवल्यानंतर आवर्जून टाळाव्या अशा गोष्टी –
धूम्रपान – सिगारेटमध्ये असंख्य विषारी आणि आरोग्याला विघातक द्रव्ये असतात. त्यामुळे तसेही धूम्रपान आरोग्याला घातकच असते. पण जेवल्यानंतर धूम्रपान केल्यास जठरातील तीव्र आम्ले जास्त प्रमाणात स्रवू लागतात. त्यामुळे छातीत जळजळण्याचा त्रास वाढू शकतो. तसेच पोटाचा अल्सर होण्याची शक्यता बळावते. अशी सवय असणार्‍या व्यक्तींना पोटाचा त्रास होण्याची
शक्यता असते.

झोपणे – दुपारच्या जेवणानंतर लगेच वामकुक्षी घेणे, ही आपल्या अगदी आज्या-पणज्यांपूर्वीपासून चालत आलेली रीत आहे. परंतु दुपारी किंवा रात्री जेवल्यानंतर लगेच लोटांगण घालण्याच्या अतिशय प्रिय सवयीमुळे आपल्या पचनक्रियेवर परिणाम होतो. छातीत जळजळणे, आंबट ढेकर येणे, पोटात गुबारा धरणे अशासारख्या विकारांची सुरुवात होते. तेव्हा दुपारी जेवणानंतर झोपणे टाळावे अन् रात्रीच्या जेवणानंतर किमान 2-3 तास तरी आडवे होऊ नये. यासाठी लवकर जेवून घ्यावे.
व्यायाम – जेवण झाल्या झाल्या लगेच व्यायाम करू नये. कारण जेवणानंतर आपल्या शरीरातील पचनेंद्रियांकडील रक्तपुरवठा वाढवला जातो. अन्नपचन सुरळीत होण्यासाठी याची गरज असते. मात्र यावेळी व्यायाम केल्यास पोट दुखणे, मळमळणे, उलट्या होणे असे त्रास होऊ शकतात.
चहा-कॉफी – काही व्यक्तींना जेवण झाल्यावर काहीच वेळात चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असते. जेवल्यानंतर तीन तास अन्न जठरात असते. या दरम्यान आपण ही पेये प्यायल्यास ती लगेच अन्नात मिसळली जातात. आणि या पेयांमधील कॅफीन, टॅनिन अशा घटकांमुळे अन्नातील प्रथिने, लोह अशा घटकांचे पचन होण्यास अडथळा येतो. आणि अशा व्यक्तींमध्ये लोहाची कमतरता निर्माण होऊन अ‍ॅनिमिया होण्याची शक्यता संभवते.

स्नान – जेवणानंतर स्नान केल्यास शरीरातील रक्तप्रवाह हातापायांकडे जास्त होतो आणि पचनसंस्थेकडे कमी होतो. त्यामुळे अपचन होते. याऐवजी जेवणाआधी अर्धा तास स्नान केल्यास, तेही थंड पाण्याने केल्यास छान भूक लागते. तसेच जेवल्यानंतर आंघोळ करायचीच असल्यास तासाभराने करावयास हरकत नाही.
पाणी पिणे – काही जणांना जेवताना प्रत्येक घासाघासाला पाणी पिण्याची सवय असते. त्यामुळे पाण्याच्या प्रत्येक घोटाबरोबर हवा गिळली जाते आणि जेवल्यावर पोट गच्च होणे, वायू धरणे असे त्रास होतात. तर जेवल्यानंतर पोटभर पाणी पिण्याची सवय आपल्या सर्वांनाच असते. त्यामुळेसुद्धा पचन होण्यास अडथळा येतो. तसेच जेवताना गार बर्फाचे पाणी प्यायची सवयही भुकेवर आणि पचनावर परिणाम करते.
फळं – फळं खाऊ नका असं कोणीच सांगणार नाही. कारण फळांमध्ये अधिक प्रमाणात जीवनसत्त्व असतात. परंतु ती पचवायला वेगळ्या पाचक रसांची आवश्यकता असते. तेव्हा जेवणापूर्वी फळं खाणं कधीही चांगलं असतं. जेवल्यानंतर फळं खाल्ल्यास अपचन, अ‍ॅसिडिटी आणि गॅसेस होऊ शकतात.

उत्तम आरोग्यासाठी सकस आहार घेण्याची आणि अनावश्यक पदार्थ टाळण्याची सवय लावणे जितके गरजेचे आहे तितकेच जेवल्यानंतर काय करावे आणि काय करू नये याबाबत जाणून घेऊन ते कृतीत आणणे देखील आरोग्यासाठी तितकेच हितावह आहे.