‘जर पुनर्जन्म असेल तर देवाने पुढील जन्मात मला ग...

‘जर पुनर्जन्म असेल तर देवाने पुढील जन्मात मला गायनाचे कौशल्य द्यावे…’ अशी इच्छा बाळगणारे प्रसिद्ध वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचे निधन (Doordarshan Former Marathi Newsreader Pradeep Bhide Passes Away)

दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर बरोबर साडेसात वाजता ‘नमस्कार.. आजच्या ठळक बातम्या’ असं म्हणत बातम्या ऐकवणारे जेष्ठ वृत्तनिवेदक आणि सूत्रसंचालक प्रदीप भिडे यांचे काल कर्करोगाच्या प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते. बातम्या सांगण्याची विशेष शैली आणि भारदस्त आवाज ही भिडे यांची ओळख होती.

मुंबई दूरदर्शन केंद्राची सुरुवात १९७२मध्ये झाली आणि १९७४ साली प्रदीप भिडे यांनी वृत्तनिवेदक म्हणून पहिले बातमीपत्र वाचले. पहिले बातमीपत्र जेव्हा वाचले तेव्हा सुरुवातीला मला अक्षरश: घाम फुटला होता. आपण बातम्या नीट वाचू की नाही अशीही मनात भीती वाटत होती. पण सुरुवातीच्या काही मिनिटांनतर दडपण दूर झाले आणि मी बातमीपत्र सादर केले. आता नेमक्या कोणत्या बातम्या वाचल्या ते आठवत नाही. पण पहिलेच बातमीपत्र छान आणि व्यवस्थित सादर झाले, अशी पावती मला मिळाली,” असं त्यांनी म्हटलं होतं.

विज्ञान शाखेचे पदवीधर असलेले भिडे यांनी पुण्यात रानडे इन्स्टिटय़ूटमधून पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण केला होता. रानडेमध्ये पत्रकारितेचे शिक्षण घेत असतानाच दूरदर्शन केंद्रात काम करण्याची संधी त्यांना मिळाली आणि ते दूरदर्शनवर प्रशिक्षणार्थी निर्मिती साहाय्यक म्हणून काम करू लागले. मुंबई दूरदर्शन केंद्राचे तत्कालीन संचालक शास्त्री यांनी भिडे यांचा आवाज ऐकला आणि त्यांना वृत्तनिवेदक होण्याविषयी विचारणा केली. वृत्तनिवेदक म्हणून १९७४ पासून त्यांचा आवाज आणि त्यांचा चेहरा महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या मनात कोरला गेला आहे.

प्रदीप भिडे यांचे आई आणि वडील शुभलक्ष्मी व जगन्नाथ हे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेत शिक्षक म्हणून काम करत होते. त्यामुळे भाषेचे संस्कार लहानपणापासून घरातून झाले होते. आई व वडील दोघेही संस्कृत, मराठी व हिंदी भाषेचे शिक्षक असल्याने अभ्यास, क्रमिक पाठय़ पुस्तकांबरोबरच अन्य अभ्यासेतर पुस्तकांचे वाचन होतेच. पण भगवद्गीतेचा पंधरावा अध्याय दररोज मोठय़ा आवाजात म्हटलाच पाहिजे, असा घरातील दंडक होता. ‘विष्णुसहस्रनाम’ही म्हटले जायचे. त्यामुळे शुद्ध व स्पष्ट शब्दोच्चार व्हायला आणि ‘आवाज’ घडायला त्याची त्यांना मोलाची मदत झाली.

आपल्या आवाजाच्या जोरावर त्यांनी ‘प्रदीप भिडे कम्युनिकेशन’ या नावाने ध्वनिमुद्रण स्टुडिओ, निर्मिती संस्था सुरु केली. पाच हजारांहून अधिक जाहिराती, माहितीपट, लघुपटांमधून आवाज देणाऱ्या प्रदीप भिडे यांनी ‘लोकसत्ता’ला २०१७ साली ‘पुनर्भेट’ या सदराअंतर्गत दिलेल्या मुलाखतीमध्ये पुनर्जन्माबद्दल भाष्य केलं होतं. आपल्या आवाजाच्या जादूने मराठी जनतेला ‘बातम्या’ ऐकण्याचा छंद लावणाऱ्या प्रदीप भिडे यांनी पुढील जन्माबद्दल बोलताना एक कौशल्य शिकण्यासंदर्भातील इच्छा व्यक्त केलेली.

पुनर्जन्म असेल तर…

आवाजाच्या क्षेत्रात काम करण्याची संधी परमेश्वराने मला दिली आणि त्याला मी योग्य न्याय देऊ शकलो, याबद्दल त्यांनी या विशेष मुलाखतीमध्ये सामाधान व्यक्त केलेलं. पार्श्वगायक मोहमद रफी यांना भिडे दैवत मानायचे. याचाच संदर्भ देत मुलाखतीमध्ये, “जर पुनर्जन्म असेल तर देवाने पुढील जन्मात मला गायनाचे कौशल्य द्यावे, एवढीच त्याच्याकडे प्रार्थना आहे,” असं भिडे यांनी मुलाखतीदरम्यान सांगितलं होतं.

अत्यंत संयमी, तटस्थ वृत्तीने बातम्या सांगतानाही आवाजात चढ-उतार करणे, बातम्यांतील आशयानुसार आवाजात मार्दव-कठोरता आणणे ही त्यांची खासियत होती. अनेक महत्त्वाच्या राजकीय- सामाजिक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन भिडे यांनी केले होते. शिवसेना-भाजप युतीच्या मंत्रिमंडळाचा १९९५ मध्ये शिवाजी पार्कवर झालेला शपथविधी सोहळा, मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी अशा अनेक कार्यक्रमांमागचा आवाज हा प्रदीप भिडे यांचा होता.

बातम्या वाचताना कुठलाही आक्रस्ताळेपणा न करता, अभिनिवेश न बाळगता योग्य ते भाव आवाजातून लोकांपर्यंत पोहोचवण्याची किमया त्यांनी साधली. त्यांच्या आवाजावर लोकांनी भरभरून प्रेम केले. बातमी कशी वाचली आहे, ते वाचून काय वाटले याचा प्रतिसादही लोकांकडून लगोलग मिळायचा, असे ते सांगत असत. वृत्तनिवेदक आणि सूत्रसंचालकाकडे केवळ आवाज असून चालत नाही, त्यासाठी बुद्धिमत्ताही हवी, हजरजबाबीपणाही तुमच्या ठायी असायला हवा, असे ते ठामपणे सांगत असत.

‘ई-मर्क’ आणि ‘हिंदूस्थान लिव्हर’ या बहुराष्ट्रीय कंपन्यांत त्यांनी ‘जनसंपर्क अधिकारी’ म्हणून काही काळ नोकरीही केली. त्या कामातील साचेबद्धपणाचा कंटाळा आल्याने आणि स्वत:च्या ‘आवाजा’वर आर्थिक प्राप्ती करता येईल याचा आत्मविश्वास असल्याने त्यांनी त्या काळात नोकरी सोडण्याचे धाडस केले. प्रदीप भिडे यांनी नाटकातही काम केले होते. रत्नाकर मतकरी यांच्या दिग्दर्शनाखाली अनेक प्रायोगिक नाटके, रवी पटवर्धन, दिलीप प्रभावळकर यांच्याबरोबर त्यांनी रंगभूमीवर काम केले होते. आवाज ही त्यांची ताकद त्यांनी जपली, वाढवली. आवाजाच्या क्षेत्रात ते अमिन सयानी यांना गुरुस्थानी मानायचे. सयानी यांचा ‘बिनाका गीतमाला’ हा कार्यक्रम ते लहानपणापासून सातत्याने ऐकत आले.

दूरदर्शनच्या ‘बातम्या’ आणि आजच्या ‘वृत्तवाहिन्या’ या विषयीही त्यांनी भाष्य केलं होतं. दूरदर्शनच्या बातम्यांची आणि वृत्तनिवेदकांची स्वत:ची अशी शैली आहे. तिथे आकांडतांडव नसते. शब्दोच्चारांवर अधिक भर असतो. प्रमाण मराठी भाषा तिथे जपली जाते. शांत, संयमित अशा त्या ‘बातम्या’ असतात. त्या उलट आजच्या वृत्तवाहिन्या ‘कर्कश’ झाल्या आहेत. वृत्तवाहिन्यांवर बातम्या पाहायच्या व ऐकायच्या पण बातमीच्या मुळाशी जायचे असेल, साधक-बाधक विश्लेषण हवे असेल तर वृत्तपत्र वाचनाला आजही पर्याय नाही. चांगले वृत्तनिवेदक तयार होण्यासाठी आणि घडवण्यासाठी ‘वृत्तनिवेदक’ गुणवत्ता शोध स्पर्धा घेण्यात यावी. वृत्तनिवेदक किंवा सूत्रसंचालक यांच्या कामाला ‘मान्यता’ नाही. हे काम तुलनेत कमी दर्जाचे मानले जाते. अपवाद वगळता वृत्तनिवेदक/सूत्रसंचालकांना पुरस्कार दिले जात नाही, योग्य तो सन्मान मिळत नाही, याची खंत वाटते असे त्यांनी सांगितले होते.