गर्भाशयाच्या पोकळीचा आकार इंग्रजी टी अक्षरासारख...

गर्भाशयाच्या पोकळीचा आकार इंग्रजी टी अक्षरासारखा असल्यास मूल होण्यास अडथळा होतो का? (Don’t Worry, You Can Conceive A Child, Even If The Uterus Has T Shape)


माझे वय 30 वर्षे आहे. माझ्या लग्नाला 3 वर्षे झाली आहेत परंतु अजून आम्हाला मूल नाही. तपासण्यांमध्ये माझ्या गर्भाशयाचा आकार इंग्रजी टी अक्षरासारखा असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यावर शस्त्रक्रियेचा उपायही सांगितला. या विषयी सविस्तर माहिती द्याल का?

 • सोनल, मुंबई
  गर्भाशयाचा म्हणजे खरं तर गर्भाशयाच्या पोकळीचा आकार इंग्रजी टी अक्षरासारखा असणे हे जन्मजात असते. गर्भाशय घडत असताना त्यात हा दोष राहिलेला असतो. पूर्वी ‘डायइथाइल स्टिल्बेस्टेरॉल’ हे औषध गर्भपाताचा धोका असणार्‍या स्त्रियांना दिले जात होते. त्यावेळी त्या स्त्रियांच्या गर्भामध्ये जर स्त्री गर्भ असेल तर त्या स्त्री गर्भाच्या गर्भाशयात हा दोष निर्माण होत असे. तसेच कधी तरी हे औषध घेतलेले नसतानाही हा दोष जन्मजात निर्माण होऊ शकतो.
  अशा प्रकारच्या दोषामध्ये गर्भाशयाची आतली पोकळी वरून रुंद व खालच्या भागात अरुंद असते. त्यामुळे ‘हिस्टेरोसाल्पिंगोग्राफी’ ह्या तपासणीमध्ये ह्या पोकळीचा आकार इंग्रजी टी अक्षरासारखा दिसून येतो.
  ह्या दोषाचे निदान ‘हिस्टेरोसाल्पिंगोग्राफी’ या गर्भाशयाच्या क्षकिरण तपासणीमध्ये होते. या तपासणीमध्ये ‘रेडियोओपेक डाय’ गर्भाशयाच्या पोकळीत घालून एक्सरे काढतात.
  हा दोष असणार्‍या स्त्रियांना वंध्यत्व, एक्टोपिक प्रेग्नंसी, गर्भपात व मुदतपूर्व प्रसूती ह्या समस्या उद्भवू शकतात.
  शस्त्रक्रियेने ही समस्या सोडविता येते. या शस्त्रक्रियेला ‘मेट्रोप्लास्टी’ असे म्हणतात. यामध्ये गर्भाशयाच्या पोकळीला आतील बाजूने छेद देऊन ती मोठी करतात व आकार व्यवस्थित करतात.
  या शस्त्रक्रियेनंतर गर्भधारणा होऊन मुदतीनुसार प्रसूती होण्याचे प्रमाण चांगलेच वाढते.
  या शस्त्रक्रियेनंतर क्वचित काही समस्या निर्माण होऊ शकतात. उदा. रक्तस्राव, गर्भाशयाच्या पोकळीमध्ये तंतुमय पडदे निर्माण होणे तसेच गर्भधारणा झाल्यावर वार गर्भाशयाला जास्त घट्ट चिकटणे व प्रसूतीनंतर वार सुटून न येणे, गर्भाशयाचे तोंड कमकुवत बनणे व ते मुदतपूर्व उघडणे इत्यादी. या शस्त्रक्रियेनंतर होणार्‍या गर्भारपणामध्ये गर्भाशयाच्या तोंडावर सोनोग्राफीद्वारे लक्ष ठेवले जाते. ते उघडत आहे अथवा आखूड होत आहे असे वाटल्यास गर्भाशयाच्या तोंडावर टाके घालण्याची शस्त्रक्रियाही करतात. त्यामुळे मुदतपूर्व प्रसूती अथवा गर्भपाताचा धोका कमी होतो.
  तुम्ही ही शस्त्रक्रिया जरूर करून घ्या.