लसीची धास्ती घेऊ नका : संशोधनातून बाहेर आल्यात ...

लसीची धास्ती घेऊ नका : संशोधनातून बाहेर आल्यात सकारात्मक बाबी (Don’t Panic Even If You Get Corona After Vaccination)

करोना विषाणू विरोधी लस अर्थात्‌ वॅक्सिन घेतल्यानंतर काही लोकांना करोना झाल्याच्या तक्रारी झाल्या. तशी उदाहरणे आढळून आली आणि लोकांमध्ये या लसीबाबत धास्ती निर्माण झाली आहे. त्याबद्दल गैरसमज पसरविण्याचा उद्योग काही लोकांनी केला. परंतु तो अज्ञानापोटी आहे.

याचं कारण असं की, यावर काही सजग लोकांनी संशोधन केलं आणि ही भिती व्यर्थ असल्याचं त्यामधून आढळून आलं आहे. या संदर्भात त्यातून काही चांगल्या गोष्टी समोर आल्या आहेत.

एका संशोधन गटाने लस घेतल्यानंतर करोना झालेल्या १५० लोकांचा एक गट तयार केला व त्यांच्यावर बारीक नजर ठेवली. त्यातून पहिली चांगली गोष्ट अशी लक्षात आली की, हे सर्व १५० रुग्ण उपचार घेऊन बरे झाले.

  • त्यापैकी १२५ जण तर घरीच बरे झाले.
  • उरलेले फक्त २५ जण हॉस्पिटलात गेले.
  • त्यापैकी फक्त ५ जणांना ऑक्सिजन द्यावा लागला. म्हणजे १५० पैकी फक्त ५ जणांची प्रकृती गंभीर झाली होती.
  • ऑक्सिजन दिल्यानंतर हे पाचही जण बरे झाले. याचा अर्थ लस घेतल्यावर ज्या १५० लोकांना करोना झाला होता, त्यापैकी कोणीही दगावला नाही, उलट १२५ जण घरीच बरे झाले.
  • त्याहून विशेष बाब अशी उघडकीस आली की, या १५० लोकांच्या संपर्कात, त्यांच्या घरातील माणसे किंवा अन्य जे कोणी आले, त्यापैकी कोणीही संक्रमित झाले नाही. याचा अर्थ मुळातच त्यांना झालेला संसर्ग सौम्य स्वरूपाचा होता.
  • म्हणजेच लस घेतल्यानंतर देखील यदाकदाचित्‌ करोना झालाच, तर धास्ती बाळगण्याचं काहीच कारण नाही, ही सकारात्मक बाब या संशोधनातून पुढे आली आहे.

आपण हळूहळू करोनावर विजय मिळवतो आहोत, हेही या संशोधनातून सिद्ध झाले आहे. जरा संयम, धैर्य आणि साहस दाखविण्याची गरज आहे. तेव्हा पसरलेल्या अफवांवर विश्वास न ठेवता, निर्भय बनून लसीकरण करून घ्या.

धैर्य, साहस दाखविणे व निर्भय बनण्याचे एक उत्तम उदाहरण पुढे आले आहे. छत्तीसगड राज्यातील दंतेवाडा जिल्ह्याच्या डी.एस.पी. अर्थात्‌ पोलीस उप अधिक्षक शिल्पा साहू या स्वतः ५ महिन्यांच्या गर्भवती आहेत. तरी पण त्या संसर्गाची भिती न बाळगता, बंदोबस्तासाठी रस्त्यावर उतरल्या आहेत. हातात काठी घेऊन, कडक उन्हामध्ये त्या लोकांना मास्क घालण्याची, विनाकारण बाहेर न फिरण्याची शिकवण देत आहेत. एक महिला पोलीस अधिकारी निर्भयपणे आपले कर्तव्य बजावत असताना, आपण देखील स्वयंशिस्त पाळून, अंतर राखून करोना विरोधी लढण्याचे आपले कर्तव्य का बजावू नये?

तेव्हा लस घेतल्याने करोना होण्याची धास्ती बाळगू नका. मास्क घालणे, अंतर राखणे, बाहेरून आल्यावर हातावर सॅनिटायजर चोळणे व कपडे धुणे ही कामे जबाबदारीने करा आणि करोना संसर्गास दूर ठेवा.