‘माझं काही चुकलं तर बिनदिक्कतपणे सांग’ – असं कम...

‘माझं काही चुकलं तर बिनदिक्कतपणे सांग’ – असं कमल हसन, आपल्या शरद पोंक्षेला मोठ्या मनाने बोलला होता… असं काय घडलं होतं? (Don’t Hesitate, You Can Frankly Speak On My Mistakes’ – Why Superstar Kamal Hassan Told This To Marathi Actor Sharad Ponkshe?)

‘इथून पुढे माझं काही चुकलं ना, तर बिनदिक्कतपणे मला सांग…’  ही सूचना सुपरस्टार कमल हसनने, आपले मराठी कलावंत शरद पोंक्षे यांना दिली होती. अतिशय मोठ्या मनाने कमल हसनने, आपल्यापेक्षा तुलनेने कमी लोकप्रिय असलेल्या पोंक्षे यांना ही गोष्ट सांगितली. कमल दिग्दर्शन करत असलेल्या ‘हे राम’ या हिंदी चित्रपटाच्या सेटवर हा किस्सा घडला आहे.

त्याची हकिकत शरद पोंक्षे यांनी ‘मी आणि नथुराम’ या पुस्तकात सविस्तर दिली आहे. ‘मी नथुराम गोडसे बोलतोय्‌’ या वादग्रस्त नाटकात पोंक्षे नथुराम गोडसे यांची भूमिका करत असत. महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या गोडसेंची शरद पोंक्षे यांची ही भूमिका खूप गाजली होती. या नाटकावर सरकारने बंदी घातली होती.

गांधी वधाची पार्श्वभूमी लाभलेला ‘हे राम’ हा भव्य हिंदी चित्रपट तेव्हा कमल हसन बनवत होता. त्यात गोडसे यांची भूमिका करण्यासाठी शरद पोंक्षे यांची कमलने निवड केली. अन्‌ त्यांना शूटिंगसाठी सन्मानाने उटी या थंड हवेच्या ठिकाणी बोलावले. ‘हे राम’चा सेट उटीला लावण्यात आला होता.

शूटिंगच्या पहिल्याच दिवशी गांधी हत्येचे चित्रण व्हायचे होते. नथुरामच्या वेषात शरद पोंक्षे तयार होऊन सेटवर गेले, पण तो प्रसंग दिग्दर्शक या नात्याने कमल हसनने त्यांना ज्या पद्धतीने समजावून सांगितला, ते ऐकून पोंक्षे अस्वस्थ झाले. कारण त्यांच्या मते चित्रित करण्यात येणारा, त्या ऐतिहासिक घटनेचा प्रसंग, प्रत्यक्षात तसा घडलाच नव्हता. हा सर्व तपशील शरद पोंक्षे यांनी आपल्या पुस्तकात दिला आहे.

शरद पोंक्षे यांची अस्वस्थता, त्यांच्या बरोबर काम करणाऱ्या ओम पुरी या ज्येष्ठ अभिनेत्याच्या नजरेतून सुटली नाही. त्यांनी कारण विचारताच पोंक्षे यांनी आपल्या अस्वस्थतेचं कारण सांगितलं. तेव्हा ओम पुरी, शरदना हाताशी धरून कमल हसनकडे घेऊन गेले. अन्‌ पोंक्षेंनी कमलला सांगितले की, मी नाटकात नथुराम यांची भूमिका करण्यासाठी पुष्कळ वाचन, संशोधन केले आहे. शिवाय त्यांचे बंधू गोपाळ गोडसे यांच्याशी भेटून देखील प्रत्यक्ष घटनेचा तपशील घेतला आहे… ते ऐकून कमल देखील फोनवर गोपाळ गोडसे यांच्याशी बोलला आणि त्याने त्या दिवशीचे शूटिंग रहित केले. इतकंच नव्हे तर कमलने मोठ्या मनाने, पोंक्षे यांना मिठी मारली. अन्‌ म्हणाला, ‘तू मोठ्या संकटातून मला वाचवलंस. कारण मी रचलेला प्रसंग जर असाच चित्रपटात दाखवला गेला असता, तर मोठा वाद झाला असता.’ त्यावर ‘माझं काही चुकलं तर बिनदिक्कतपणे मला सांग’ असं सांगून पोंक्षे यांच्याशी सविस्तर चर्चा करून गांधी हत्येचा प्रसंग, त्यांच्या सल्ल्यानुसार व गोपाळ गोडसे यांच्याशी चर्चा केल्याप्रमाणे चित्रित केला. अन्‌ त्या दिवसांपासून शूटिंगचे सर्व सहा-सात दिवस पोंक्षे यांची कमल हसनशी गट्टी जमली होती…