लग्नाच्या गाठी स्वर्गात मारल्या जातात (Do You A...

लग्नाच्या गाठी स्वर्गात मारल्या जातात (Do You Accept That Marriage Is A Holy Knot? Then Read This)

सोळा संस्कारापैकी पंधरा संस्कार एकट्या व्यक्तीवर केले जातात. विवाह हा संस्कार वर आणि वधू या दोघांवर एकाच वेळी एकत्रित असा केला जातो. अशा या विवाहास पवित्र बंधन मानले आहे. विवाह हा संस्कृतीस अनुलक्षून विविध पद्धतींनी पती-पत्नीमधले जवळकीचे व लैंगिक नाते मान्य करतो.
प्रत्येकाच्या आयुष्यातील ‘विवाह’ ही अत्यंत महत्त्वाची घटना आहे. या विवाहासंबंधी आपण अनेक गोष्टी ऐकत असतो. उदाहरणार्थ – विवाह कोणत्या व्यक्तीशी होणे व केव्हा होणे या योगायोगाच्या गोष्टी आहेत. लग्नामुळे होणारा, तुमचा जोडीदार कोण हे तुमच्या जन्माबरोबरच ठरले जाते. ‘मॅरेजेस आर मेड इन हेवन’ असेही म्हटले जाते. थोडक्यात आपल्या समाजात विवाह किंवा लग्न ही महत्त्वाची घटना आहे, असे मान्य केले आहे.

एकूण मानवी इतिहास बघितला तर विवाह किंवा लग्न पद्धत ही फार जुनी नसून इ.स. पूर्व 4 ते 5 हजार वर्षे याचे अस्तित्व आहे. विवाह ही माणसाने, सामाजिक उत्क्रांतीच्या टप्प्यावर स्वतःच्या फायद्यासाठी शोधून काढलेली, स्त्री व पुरुष यांच्यातील शरीर संबंधाची एक पद्धत आहे. या विवाह पद्धतीचा प्रसार जगभरातील मानवी समाजामध्ये मान्यताप्राप्त झाला. अगदी सुरुवातीला विवाह विधी स्थानिक रुढी, परंपरा यांना अनुसरून होत असत. नंतरचा सामाजिक उत्क्रांतीचा टप्पा धर्मस्थापनेचा. जगाच्या विविध भागात विविध धर्म स्थापन झाले आणि या स्थानिक धर्माचा पगडा विवाह विधींवर झाला.
विवाह हा एक संस्कार
हिंदू धर्मातील व्यक्तींवर केले जाणारे सोळा संस्कार आपल्या परिचयाचे आहेत. गर्भधारणेपासून ते मृत्युपर्यंत, हिंदू व्यक्तीवर आई-वडील, गुरू, भटजी (ब्राह्मण) यांचेकडून, वेगवेगळ्या वयात, जे सोळा वैदिक विधी केले जातात, त्यास संस्कार म्हणतात. हे विधी किंवा संस्कार करण्यामागचा प्रमुख हेतू म्हणजे, मनुष्यामध्ये असलेल्या सद्गुणांचा विकास व्हावा व दोषांचे निराकरण व्हावे हा आहे. या सोळा संस्कारात उपनयन, विवाह व अन्तेष्टी हे तीन प्रमुख संस्कार आहेत. विवाह हा पंधरावा संस्कार आहे. सोळा संस्कारापैकी पंधरा संस्कार एकट्या व्यक्तीवर केले जातात. विवाह हा संस्कार वर आणि वधू या दोघांवर एकाच वेळी एकत्रित असा केला जातो. अशा या विवाहास पवित्र बंधन मानले आहे. विवाह पद्धतीमुळे माता-पिता व मूल असे एक कुटुंब तयार होते. या कुटुंब व्यवस्थेमुळे स्त्री आणि पुरुष या दोघांचीही मानसिक व आर्थिक व्यवस्था मजबूत होते. विवाह हा वंशवृद्धीचा कायदेशीर मार्ग मानला गेला आहे. तसेच विवाह हे पुरुष व स्त्री अशा दोन व्यक्तींमधील एक सामाजिक बंधन आहे. विवाह हा संस्कृतीस अनुलक्षून विविध पद्धतींनी पती-पत्नीमधले जवळकीचे व लैंगिक नाते मान्य करतो.

संसाररुपी रथाची दोन चाके, पती- पत्नी
मानवी समाजातील विवाह पद्धत ही सर्वात प्राचीन संस्था मानली जाते. विवाह संस्थेच्या फायद्यामुळेच ही संस्था जगभर रुढ झाली आहे. वेगवेगळ्या धर्मात, पंथात विवाह करण्याच्या पद्धतीमध्ये फरक असेल, परंतु मूळ हेतू एकच. स्त्री व पुरुषाने आपापल्या धर्माप्रमाणे विवाह संस्कार करून घेणे आणि एकत्र जीवन जगणे, वंशवृद्धी करणे, सुख-दुःख समान वाटून घेणे, मुलांचे संगोपन करणे, वृद्धांची सेवा करणे. थोडक्यात नेहमी म्हटले जाते की संसाररुपी रथाला पती व पत्नी अशी दोन चाके असून, दोन्हीही सारखीच महत्त्वाची असतात.

पती-पत्नीतील मैत्रीपूर्ण सहजीवन
व्यक्तीगत दृष्टीकोनातून बघितले तर विवाह म्हणजे पती-पत्नीतील मैत्रीपूर्ण सहजीवन होय. विवाह हा पती-पत्नीला एकमेकांवर विश्वास दाखवणे, दोघांच्याही सुखासाठी झटणे, निःस्वार्थ त्याग करणे याची शिकवण देत असतो. पती व पत्नी यांच्या अनेक आकांक्षा विवाहाद्वारे आणि संततीद्वारे पूर्ण होत असतात. पती-पत्नीच्या हयाती नंतर ही संतती त्यांचे नाव व कुळाची परंपरा पुढे चालू ठेवते. माता-पित्यांना आपली संतती आपल्या संपत्तीची उत्तराधिकारी होतील व वृध्दावस्थेत आपल्याला आधार देतील, अशी खात्री असते.

गृहस्थाश्रमासाठी विवाह आवश्यक संस्कार
हिंदू धर्माप्रमाणे मानवी जीवन, ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, संन्यासाश्रम व वानप्रस्थाश्रम या चार आश्रमात विभागले गेले आहे. यातील गृहस्थाश्रमासाठी विवाह हा अत्यावश्यक संस्कार आहे. हिंदू विवाह विधीमध्ये ब्राह्मण मंत्रोच्चार करून अग्नी व नातेवाईक वर व वधुचे पती व पत्नी हे नाते जाहीर करतात. म्हणजेच विवाह लावून देतात. हिंदूच्या धार्मिक विवाह विधीमध्ये अग्नीला फार महत्त्व आहे. तसेच हिंदू विवाह कायद्याप्रमाणे विवाहात लाजाहोम, कन्यादान व सप्तपदी हे तीन विधी अत्यावश्यक मानले गेले आहेत. हे तिनही विधी अग्नीच्या साक्षीने होत असतात.

सप्तपदीमधे पती-पत्नी अग्नीच्या भोवती सात प्रदक्षिणा एकत्र मिळून घालतात. त्यावेळी ब्राह्मण मंत्रोच्चार करत असतात. सप्तपदी नंतर विवाहसंस्कार पक्का व अपरीवर्तनीय होतो. त्याला कायदेशीर व सामाजिक मान्यता प्रदान करण्यात येते. त्यानंतर वर व वधू पती-पत्नी म्हणून बंधन स्वीकारतात व ते आयुष्यभर जपतात. विवाहामुळे दोन व्यक्तीच नव्हे तर दोन कुटुंबे आणि त्यांचे नातेवाईक नव्याने जोडले जातात, म्हणून या नात्यास लग्नगाठ असे संबाधतात. म्हणून विवाह म्हणजे लग्न हे पवित्र बंधन मानले गेले आहे. त्यामुळेच आजची समाज व्यवस्था सुनियंत्रित राहिली आहे. विवाहबंधनामुळेच समाजस्वास्थ्य टिकले आहे.