उपवासाच्या काळात चुकून देखील खाऊ नका हे पदार्थ ...

उपवासाच्या काळात चुकून देखील खाऊ नका हे पदार्थ (Do Not Eat These 8 Food During Fast)

सध्या चैत्र नवरात्रौत्सव सुरू आहे. या नवरात्रीमध्ये स्त्रिया नऊ दिवस आपापल्या परंपरेनुसार देवीचा उपवास करतात. त्याप्रमाणे फलाहार वा काही उपवासाचे पदार्थ सेवन करतात. सामान्यपणे उपवासाला साधा आणि सहज पचन होईल असा हलका आहार घेतला जातो. कारण रिकाम्या पोटी तेलकट आणि मसालेदार अन्न खाल्ल्यास ते त्रासदायक ठरू शकतं. तसेच उपवासाला काही पदार्थ खाल्ल्याने आरोग्य बिघडू शकते. जाणून घेऊया हे पदार्थ कोणते आहेत, जे उपवासाला चुकूनही खाऊ नयेत.

१. रिफाइंड तेल

उपवासाच्या दिवशी साजूक तूप, घरी बनवलेले लोणी, शेंगदाण्याचे तेल वा बदाम तेलामध्ये बनवलेले पदार्थ खावेत. रिफाइंड तेल, सूर्यफूलाचे तेल, मोहरीचं तेल आणि सोयाबीन तेलामध्ये शिजवलेले अन्न खाणे टाळा. कारण जास्त तेलामध्ये शिजवलेले अन्न आरोग्यास हानिकारक असतं.

२. सामान्य मीठ

उपवासाला नेहमीच्या मीठाऐवजी सैंधव मीठाचं सेवन करा. उपवासाच्या दिवसात शरीरास सोडियमची गरज असते जी सैंधव मीठाने पूर्ण करता येते.

३. मसाले

उपवासाच्या पदार्थांत हळद, हिंग, राईचं तेल, मेथीचे दाणे, गरम मसाला आणि धणे पूड यांसारखे मसाले घालू नयेत. पदार्थ स्वादिष्ट बनवायचा असेल तर त्यात जिरं, जिरे पूड, काळी मिरीची पूड, हिरवी वेलची, लवंग, दालचिनी, ओवा, डाळिंबाची पावडर आणि जायफळ वापरता येते.

४. टोमॅटो

उपवासाच्या पदार्थात टोमॅटो घालायचे नाहीत. कारण उपवासाला आंबट पदार्थ खायचे नसतात.

५. शीत पेये

शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी विकतची शीत पेयं आणि पॅक्ड ज्यूस प्यायची नाहीत. अशा पेयांमध्ये आर्टिफिशिअल स्वीटनर आणि प्रीझर्वेटिव्हज्‌ असतात, ज्यामुळे शरीरास नुकसान होऊ शकते.

६. भात

उपवासाला भात खाल्लेला चालत नाही. भात खाण्याची इच्छा होत असेल तर वरीच्या तांदळाचा पुलाव खाऊ शकता.

७. कांदा – लसूण

सणासुदीच्या दिवसांत उपवासा दरम्यान कांदा – लसूण खाणे वर्ज असते. एवढेच नाही तर ज्यांचा उपवास नाही अशा कुटुंबातील इतर सदस्यांच्या जेवणातही त्याचा वापर करू नये.

८. इतर गोष्टी

ओट्‌स, मक्याचे दाणे, मक्याचं पीठ, डाळ, शेंग, रवा, मैदा, लापशीचा रवा आणि तांदळाच्या भाकऱ्या खाऊ नये.