ठिपक्यांची रांगोळी मध्ये ज्ञानदा पुढे नवं आव्हा...

ठिपक्यांची रांगोळी मध्ये ज्ञानदा पुढे नवं आव्हान (Dnyanada Accepts New Challenge In Marathi Serial)

स्टार प्रवाह वाहिनीवर ठिपक्यांची रांगोळी ही नवी मालिका सोमवारपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेतील अपूर्वा ही मध्यवर्ती भूमिका साकारत असलेल्या अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर सोबत केलेली ही खास बातचित –

ज्ञानदा ठिपक्यांची रांगोळी या मालिकेतील तुझ्या भूमिकेविषयी काय सांगशील?

मी या मालिकेत अपूर्वा ही व्यक्तिरेखा साकारते आहे. अपूर्वा ही अतिशय लाडावलेली मुलगी आहे. मॉडर्न विचारांची आणि प्रचंड उत्साही. सुरुवातीला अपूर्वाची एनर्जी मॅच करणं मला थोडसं अवघड गेलं. आता हळूहळू मी अपूर्वामध्ये समरसून गेली आहे. याआधी अशा पद्धतीची व्यक्तिरेखा मी साकारलेली नाही. त्यामुळे अपूर्वा साकारणं माझ्यासाठी नवं आव्हान आहे.

Dnyanada, Marathi Serial, ठिपक्यांची रांगोळी

ज्ञानदा आणि अपूर्वामध्ये काही साम्य आहे का?

ज्ञानदा आणि अपूर्वामध्ये अजिबात साम्य नाही. अपूर्वाला मॉडर्न आणि टीपटॉप राहायला आवडतं. माझ्यासाठी कम्फर्ट फार महत्त्वाचा आहे. त्यामुळे मी ज्यात कम्फर्टेबल असेन असे कपडे घालणं मी पसंत करते. त्यामुळे अपूर्वा या भूमिकेच्या निमित्ताने मला एक नवं पात्र जगायला मिळत आहे.

ठिपक्यांची रांगोळी या मालिकेतून नेमकं काय सांगायचं आहे?

मालिकेचं नाव ऐकता क्षणीच मी मालिकेच्या प्रेमात पडले होते. एकत्र कुटुंबाचं महत्त्व पटवून देणारी ही मालिका आहे. ज्याप्रमाणे एक एक ठिपका जोडून सुंदर रांगोळी तयार होते. अगदी त्याचप्रमाणे प्रत्येक सदस्यामुळे कुटुंब तयार होतं. त्यामुळे ठिपक्यांची रांगोळी हे मालिकेचं नाव अतिशय समर्पक असं आहे.

Dnyanada, Marathi Serial, ठिपक्यांची रांगोळी

मालिकेतल्या तुझ्या सहकलाकारांविषयी काय सांगशील?

शरद पोंक्षे, सुप्रिया पाठारे, सारिका नवाथे, लीना भागवत, मंगेश कदम, अतुल तोडणकर, राजन ताम्हाणे, मुग्धा गोडबोले, राधिका हर्षे यांसारख्या कलाकारांसोबत मालिकेत काम करायलं मिळणं म्हणजे दुग्धशर्करा योग आहे. या सर्वांच्या सहवासात खूप नव्या गोष्टी शिकायला मिळत आहेत. या सर्वांचे सीन पाहाणं ही माझ्यासाठी पर्वणी असते. आम्हा सर्वांची खूप छान गट्टी जमली आहे. पडद्यामागची ही केमिस्ट्री पडद्यावरही दिसेल याची मला खात्री आहे.

ज्ञानदाच्या बोलण्यावरून तरी तिला या भूमिकेचे आव्हान मोठं वाटलं तरी ती सहज पेलेल असे वाटते.