गुढीपाडव्याचं पौराणिक महत्त्व (Description Of G...

गुढीपाडव्याचं पौराणिक महत्त्व (Description Of Gudhi Padwa In Mythology)

ब्रह्मदेवाने चैत्र शुद्ध प्रतिपदेला ही सृष्टी निर्माण केली, असं मानतात. सुजनांच्या रक्षणार्थ दुर्जनांचा नाश करण्यासाठी विष्णूने प्रथम अवतार याच दिवशी घेतला, अशी ही कथा आहे. गुढीपाडवा या दिवसाशी निगडीत अशा अनेक कथा प्रचलित आहेत.
अशाच एका आख्यायिकेनुसार, पूर्वी चेदी देशात वसू नावाचा राजा राज्य करत होता. त्याची प्रजा अत्यंत सुखी-समाधानी होती. पुढे त्याला वैराग्य प्राप्त झालं आणि तो तपश्‍चर्येसाठी वनात निघून गेला. त्याच्या तपसाधनेने इंद्र देव प्रसन्न झाले आणि त्यांनी वसूला वैजयंतीमाला आणि वेळूची काठी देऊन राज्यात जाऊन सुखाने राज्य करण्याची आज्ञा दिली. राजा खूष झाला. राज्यात परत येऊन त्याने त्या वेळूची पूजा केली आणि त्यावर एक छोटा कलश उपडा ठेवून आपल्या राजवाड्याच्या प्रवेशद्वाराशी लावून ठेवला. तो दिवस चैत्र शुद्ध प्रतिपदेचा होता. त्यामुळे या दिवसापासून गुढी उभारण्याची पद्धत पडली, असं म्हणतात.


तर, श्रीविष्णूने प्रभू रामचंद्राचा अवतार घेऊन रावणासह दुष्ट राक्षसांचा पराभव केला. रावणाला ठार मारले. त्यानंतर प्रभू रामचंद्रांनी चैत्र शुल्क प्रतिपदेच्या दिवशी अयोध्येत प्रवेश केला. चौदा वर्षांच्या वनवासानंतर श्रीराम याच दिवशी अयोद्धेमध्ये परतले. त्या वेळी जनतेने गुढ्या-तोरणं उभारून त्यांचं स्वागत केलं. तेव्हापासून चैत्र शुक्ल प्रतिपदेला गुढ्या-तोरणं उभारून आनंदाचा विजयोत्सव दिन साजरा होऊ लागला, असंही म्हणतात.
आणखी एका आख्यायिकेनुसार, शालिवाहन नावाच्या एका कुंभाराने मातीचं सैन्य तयार करून त्यांच्यात जीव भरला. त्याने या सैन्याच्या मदतीने शत्रूचा पाडाव केला. तो दिवस म्हणजे गुढीपाडवा. या विजयाप्रीत्यर्थ शालिवाहन नृपशक सुरू झाला, असं मानतात. कुंभाराने मातीचं सैन्य तयार केलं, ही प्रातिनिधिक कथा असावी. यामागे त्याने मातीच्या गोळ्याप्रमाणे थंड, पराक्रमहीन, दुर्बल, निर्जीव झालेल्या समाजामध्ये नवचैतन्य निर्माण केलं असावं.
अन्य एका आख्यायिकेनुसार, शालिवाहन राजाने अत्याचारी शक लोकांचा पराभव करून त्यांच्या जाचातून जनतेची सुटका केली. या विजयाप्रित्यर्थ चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून शालिवाहन शकाला प्रारंभ झाला, तो हा दिवस.