‘एका ओळीची कथा ऐकून चित्रपट निर्मितीचा नि...

‘एका ओळीची कथा ऐकून चित्रपट निर्मितीचा निर्णय’ – दिग्दर्शक विजय पाटकर सांगताहेत ‘वऱ्हाडी वाजंत्री’ ची जन्मकथा (Director Vijay Patkar Decided To Make Marathi Film ‘ Varhadi Vajantri’ At The Instant Of Listening One Line Story)

एखादी दोन ओळींची गोष्ट, तिच्यातील गंमत दोन अडीच तासाच्या चित्रपटनिर्मितीसाठी पुरेशी असते. अशीच एक कथा अभिनेते दिग्दर्शक विजय पाटकर यांना भावली आणि ते या कथेच्या प्रेमात पडले. या गोष्टीवर नंतर एक धम्माल स्क्रीनप्ले लिहिला गेला. या विषयी दिग्दर्शक विजय पाटकर म्हणतात, “लेखक वैभव परब यांच्याकडून मी ‘वऱ्हाडी वाजंत्री’ ची कथा ऐकताच डोळ्यासमोर अख्खा चित्रपट तरळू लागला. एकापेक्षा एक भन्नाट – अवखळ पात्रे दिसू लागली. प्रसंग, घटना, त्यांच्या हालचाली, स्वभाव असं सगळं चित्र दिसू लागलं. आणि त्यामुळे कालाकारांचं कास्टिंग आपोआप घडत गेलं.” एकापेक्षा एक धम्माल विनोदी चित्रपट करणारे प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक विजय पाटकर यांचा आगामी ‘वऱ्हाडी वाजंत्री’ हा कॅप्टन कल्पेश रविंद्र मगर यांच्या  ‘स्वराज फिल्म प्रॉडक्शन’ निर्मित चित्रपट येत्या ११ नोव्हेंबरला मऱ्हाठी प्रेक्षकांच्या दिमतीला ते घऊन येत आहेत. दिग्दर्शक विजय पाटकरांचा हा ११वा चित्रपट, योगायोगाने ११ नोव्हेंबरलाच प्रदर्शित होत आहे.

आजमितीस विजय पाटकर यांनी  ‘चष्मेबहाद्दर’,  ‘एक उनाड दिवस’,  ‘सासू नंबरी, जावई दस नंबरी’, ‘लावू का लाथ’, ‘सगळं करून भागलं’,  ‘कॅरी ऑन देशपांडे’, ‘मोहर’,  ‘रिवायत’,  ‘लाईफ इन डार्क’ अशा एकापेक्षा एक जॉनरचे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. हिंदी-मराठी चित्रपटांमधील त्यांचा मिश्किल अभिनय भारतभरातील रसिकांच्या मनात कायम कोरला गेला आहे. या अस्सल ताऱ्याच्या मिश्किल विनोदी स्वभावाचे दर्शन त्याने साकारलेल्या प्रत्येक व्यक्तीछटेत दिसून आले आहे. त्यांची हीच मुद्रा आगामी ‘वऱ्हाडी वाजंत्री’ मधील विविध कॅरेक्टर्समध्येच उमटली असून त्यांच्यातील दिग्दर्शकाने त्याचा कौशल्याने वापर केला आहे.

विनोदाचा बादशाह मकरंद अनासपुरे याच्या बहारदार बोचऱ्या संवादफेकीमुळे आणि इतर इरसाल कलावंतांमुळे ही आतषबाजी हास्याचे कारंजे फुलवते. हा चित्रपट चित्रपटगृहात पाहताना रसिकांना बिनीचे सगळे कलाकार पोट धरून हसवणार आहेत. दिग्दर्शक विजय पाटकर यांनी मकरंद अनासपुरेंच्या इरसाल सवंगड्यांसाठी निवडलेले कलाकारही अफलातून असल्याने ही कलरफुल मसाल्याची फोडणी तर्रर्र करून सर्वांना ‘वऱ्हाडी वाजंत्र्याच्या’ तालावर ठेका धरायला लावत आहे.

‘वऱ्हाडी वाजंत्री’ या चित्रपटातील प्रमुख भूमिकेत असलेल्या मकरंद अनासपुरेंसोबत ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, रीमा लागू, पंढरीनाथ कांबळी, हेमांगी कवी, विजय कदम, प्रिया बेर्डे, जयवंत वाडकर, आनंदा कारेकर, सुनील गोडबोले, पूर्णिमा अहिरे, गणेश रेवडेकर, प्रभाकर मोरे, राजेश चिटणीस, प्रशांत तपस्वी, विनीत बोंडे, शिवाजी रेडकर, जयवंत भालेकर, आशुतोष वाडेकर, शीतल कलाहपुरे, साक्षी परांजपे इत्यादी कलाकार आहेत. या चित्रपाटच्या संगीताची धुरा लीलया समर्थपणे संगीतकार अविनाश विश्वजित, शशांक पोवार यांनी पेलली असून गीतकार राजेश बामगुडे यांच्या गीतावर स्वरसाज गायक आदर्श शिंदे, आनंदी जोशी, मैथिली पानसे-जोशी, स्व. नंदू भेंडे, गणेश चंदनशिवे यांनी चढवला आहे. तर त्यावर नृत्य दिग्दर्शन उमेश जाधव, राजेश बिडवे यांनी केले आहे. निर्माते कॅप्टन कल्पेश रविंद्र मगर यांना सहनिर्माते म्हणून अतूल राजारामशेठ ओहळ यांनी साथ दिली आहे.