दिलीपकुमारच्या निधनाबद्दल पंतप्रधानांपासून ते अ...

दिलीपकुमारच्या निधनाबद्दल पंतप्रधानांपासून ते अमिताभ बच्चन व बॉलिवूड कलाकारांचे शोकसंदेश (Dilip Kumar passes away: PM Modi To Amitabh Bachchan Bollywood Pay Tribute To Legendary Actor)

बॉलिवूडची आख्यायिका ठरलेल्या ट्रॅजेडी किंग दिलीपकुमारचे आज सकाळी दुःखद निधन झाले. त्याच्या निधनाचे वृत्त पसरताच बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली. आणि त्यांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली अर्पण केली. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी देखील दुखवटा व्यक्त केला आहे.

पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी म्हणतात, “दिलीपकुमारच्या निधनाने कलाजगताचं मोठं नुकसान झालं आहे. ते भरून येणं कठीण आहे. दिलीपकुमार सिनेमॅटिक लिजंड म्हणून सदैव स्मृतीत राहतील. त्यांना देवाने उत्तम अभिनयगुण बहाल केले होते. त्यामुळे अनेक पिढ्यांनी त्यांच्या अभिनयाचा आनंद घेतला. मी त्यांचे कुटुंबिय, मित्रपरिवार आणि चाहत्यांसाठी माझ्या संवेदना व्यक्त करतो.”

अमिताभ बच्चनने ट्वीट केले की,” एका इन्स्टिट्यूशनची अखेर झाली आहे. जेव्हा कधी भारतीय सिनेमाचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा ‘दिलीपकुमारच्या आधी व दिलीपकुमारच्या नंतर…’ असं लिहिलं जाईल. त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी मी प्रार्थना करतो. हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबियांना लाभू दे…मी खूप दुःखी आहे…”

“संपूर्ण जगात अनेक हिरो असतील, पण आम्हा नटांसाठी फक्त एकच हिरो होते – ते म्हणजे दिलीपकुमार. त्यांच्या जाण्याने हिंदी सिनेमाच्या एका युगाचा अंत झाला आहे… ओम शांती…” अशा शब्दात अक्षयकुमारने त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

अजय देवगण लिहितो, “या लिजंड ॲक्टरसोबत मी खूप चांगले क्षण जगलो… काही पर्सनल, काही स्टेजवर. त्यांच्या निधनाबाबत मी मानसिकरित्या तयार नव्हतो. एक इन्स्टिट्यूशन होते ते, एक टाइमलेस ॲक्टर. मी हार्टब्रोकन आहे. सायराजींच्या दुःखात मी सामील आहे.”

जॅकी श्रॉफने पण सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “दिलीपकुमार यांच्या आत्म्यास शांती लाभो व त्यांच्या परिवारास हे दुःख सहन करण्याची शक्ती लाभो, ही ईश्वराकडे प्रार्थना.”

‘अलविदा युसुफ साहब’, अशा शब्दात परेश रावलने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

याशिवाय राजकारण, कला व क्रीडा क्षेत्रातील कित्येक मान्यवरांनी व सर्वसामान्य लोकांनी आपला दुखवटा व्यक्त केला आहे.