सुमित राघवन आणि अमेय वाघ एकमेकांना भिडले:त्यांच...

सुमित राघवन आणि अमेय वाघ एकमेकांना भिडले:त्यांच्या भांडणाचं कारण काय ? (Digital War Between Sumeet Raghwan And Ameya Wagh Goes Viral : Know What Is The Rivalry)

मराठी इंडस्ट्रीतील सध्याच्या तरुणाईच्या गळ्यातील ताईत  म्हणून ओळखला जाणारा अभिनेता अमेय वाघ वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतो. दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेपासून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या अमेयने अनेक चित्रपटांमध्ये काम केले. सध्या तो मराठी इंडस्ट्रीतील आघाडीचा अभिनेता म्हणून ओळखला जातो.

तो सोशल मीडियावर सुद्धा खूप सक्रिय असतो. एखादी पोस्ट टाकताना त्याला तो मजेशीर असे कॅप्शन देतो. त्यामुळे त्याच्या बऱ्याच पोस्ट चर्चेत येतात. पण सध्या त्याच्या काही सोशल मीडिया पोस्ट या वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आहेत. अमेयने यावेळी आपल्या पोस्टमधून थेट मराठी इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेता सुमित राघवनवर निशाणा साधला आहे. या दोघांमध्ये सध्या सोशल मीडियावर कमेंटचे शीतयुद्ध रंगले आहे.

अमेय आणि सुमित यांनी आपापल्या फेसबुक पोस्टमध्ये एकमेकांना टॅग केले आहे. अमेयने सर्वात आधी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की,  ‘जंगलात राघू ‘सुमित राघवन’ खूप असतात पण वाघ मात्र एकच असतो. याची कृपया नोंद घ्यावी’. तर सुमित राघवननेही अमेयच्या या पोस्टवर रिप्लाय देत “सर्कशीतल्या वाघाचा फार त्रागा होतोय असं वाटतंय…कसं ना फक्त आडनाव वाघ असल्याने कोणी वाघ होत नाही याचीही कृपया नोंद घ्यावी”, अशी कमेंट केली.

यानंतर अमेय वाघने “वाघ कुठलाही का असेना, शेवटी त्याच्या डरकाळीची दखल घेतलेली दिसतेय” अशी खोचक पोस्ट शेअर केली. त्यात त्याने पुन्हा सुमितला टॅग केले.

त्यावर उत्तर देताना सुमीत राघवन म्हणाला, “अमेय वाघ घाबरून ठोकलेली ही आरोळी असते, डरकाळी नव्हे…आणि जर एखाद्याच्या विव्हळण्याला आपण डरकाळी म्हणत असू तर प्रकरण गंभीर आहे.”

“प्रकरण कितीही गंभीर असलं तरी मी तेवढाच खंबीर आहे”, असे म्हणते अमेयने सुमीतला प्रत्युत्तर दिले. त्यावर सुमीत राघवन म्हणाला, “एक असतो कॉन्फिडन्स, मग असतो ओव्हर कॉन्फिडन्स आणि मग येतो अमेय वाघ…!”यावर उत्तर देताना अमेय वाघने “कोण किती पाण्यात आहे ते बघूच ना उद्या संध्याकाळी !!! सुमीत राघवन आता #लागलीपैज” असे म्हटले आहे. तर सुमीत राघवननेही त्याला प्रत्युत्तर देत “अमेय वाघ पाण्यात राहून माशाशी आणि इंडस्ट्रीमध्ये राहून माझ्याशी वैर घ्यायचं नसतं वाघोबा…बघू उद्या संध्याकाळी कोण वरचढ ठरतं…आता तर #लागलीपैज” असे म्हटले आहे.

यांचा हा वाद कशामुळे रंगला आहे हे कोणालाच कळत नाही आहे. यांचे हे कमेंट वॉर पाहून अनेकजण वेगवेगळे अंदाज बांधत आहेत. तर काहींना हा वाद म्हणजे एखाद्या चित्रपटाचे प्रमोशन वाटत आहे. अनेकांनी त्यांच्या पोस्टखाली कमेंट करत ‘नवीन सिनेमा येतोय ते सगळ्यांना कळलयं’असे लिहिले आहे.. तर काहींनी अमेयवर टीका केली आहे. एका युजरने कमेंट केली आहे की, ‘तू पण आता पर्सनल चालू झालास का? घरोघरी मातीच्या चुली’, एकाने विचारलं की, ‘हा काय Attitude?’. अमेय किंवा सुमितकडून जोपर्यंत याबाबत स्पष्टीकरण येत नाही तोपर्यंत हे प्रकरण काय हे समजणार नाही.

फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम