उत्तम आरोग्यासाठी व्यायाम आणि योगासने (Differen...

उत्तम आरोग्यासाठी व्यायाम आणि योगासने (Different Types Of Yogasanas For Sound Health)

उत्तम आरोग्यासाठी व्यायाम आणि योगासने
कविता नागवेकर
आरोग्य चांगले ठेवण्याकरता चौरस आहार, योग्य विश्रांती, मनःशांती, आंतर्बाहय स्वच्छता या मूलभूत गोष्टी जितक्या महत्त्वाच्या आहेत, तितकीच महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुरेसा व्यायाम.व्यायामामुळे मानवाचे आयुष्य वाढते.

दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्य राखण्यासाठी नियमित व्यायाम व योगासने करणे महत्त्वाचे आहे. तरुणांपासून ते वयोवृद्धांपर्यंत प्रत्येक व्यक्तीला व्यायामाबद्दलचा दृष्टिकोन सुधारण्याची आवश्यकता आहे. दररोज होणारी दगदग, धावपळ अशा धावत्या जगात लोकांचे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते आणि विविध प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागते. दररोज होणारी उठबस म्हणजे व्यायाम नव्हे तर व्यायाम हा योग्य नियमानुसार करावा लागतो.

प्रत्येक व्यक्तीला वाटत असते की, आपले आरोग्य चांगले राहावे आणि कोणत्याही प्रकारचे आजार होऊ नये. पण आरोग्य चांगले ठेवणे नेमके काय आणि त्यासाठी काय केले पाहिजे याची त्यांना कल्पनाही नसते. केवळ टॉनिक वजा औषधांवर अधिकरित्या खर्च करण्याने प्रकृती सुधारत नसते. तर योगासने करण्यासाठी पुरेशी जागा असणे महत्त्वाचे असते. वयाची साधारण चाळीशी ओलांडली की गुडघेदुखी, कंबरदुखी तसेच इतरही त्रास संभवतात. खरं तर चालताना अगर जिने चढताना गुडघेदुखीचा त्रास अधिक जाणवतो. अशा व्यक्तींनी उंच जागी बसून आपले पाय सरळ करणे व पुन्हा वाकविणे असा व्यायाम केल्यास पायांची दुखी काही अंशी कमी होईल. त्याचप्रमाणे नेहमी आढळणारा आजार (दोष) म्हणजे कंबरदुखी, या कंबरदुखीला अनेक कारणे असू शकतात. उदा. आपली बसण्याची चुकीची पद्धत, पाठीला कुबड काढून बसणे आणि खांदे ढिले सोडणे यामुळे कंबरेचे स्नायू कमजोर होऊ शकतात. तुम्ही कसे झोपता आणि कसे चालता यावरही तुमची पाठदुखी वाढू शकते. त्यासह स्थूलपणामुळेही कंबरेवर दबाव येतो. यासाठी नियमितपणे योगासने व व्यायामासह आरोग्यास हितकारक असा आहार घेणे ही आवश्यक आहे. शक्यतो व्यायाम संथ गतीने करावा अन्यथा चक्कर येण्याचा संभव असतो.

मुख्यतः आरोग्य चांगले ठेवण्याकरता चौरस आहार, योग्य विश्रांती, मनःशांती, आंतर्बाहय स्वच्छता या मूलभूत गोष्टी जितक्या महत्त्वाच्या आहेत, तितकीच महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुरेसा व्यायाम. शालेय जीवनापासून दंड-बैठका काढण्यापासून वेट लिफ्टिंगसारखे व्यायाम केल्यामुळे लहान वयातच मुलांना व्यायामाची आवड निर्माण होते. खरं तर शारीरिक दृष्ट्या मुलांचे आरोग्यही सुदृढ राहण्यास मदत होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे व्यायामामुळे मानवाचे आयुष्य वाढते. व्यायामाचे पुष्कळ प्रकार आहेत त्यामध्ये चालणे, फिरणे, योगासने, जिम, नाचणे, इत्यादी प्रकार असतात.

योगासनाचे प्रकार आपण पाहूयात..

1) नौकासनः या आसनाने पोट आणि कंबरेतील स्नायू मजबूत होतात

2) धनुरासनः या आसनाने कंबर आणि पोटाचे स्नायू बळकट होतात आणि संपूर्ण पाठीचा कणा लवचीक होतो.

3) मत्स्यासनः या आसनाने कंबरेतील दुखणे हलके होते तसेच खुब्यातील सांध्यातील रक्तप्रवाह सुधारतो.

4) सेतूबंधासनः या आसनाने पाठीचा खालचा भाग कंबर मजबूत होते आणि पाठ दुखी थांबते.

5) नटराजासन : या आसनाने कंबरेचा भाग तसेच मांड्या, पोटाचे स्नायू ताणले जातात आणि मजबूत होतात, तसेच कणा लवचीक होतो.

6) मार्जरासन : या आसनाने पाठीचा खालचा आणि वरचा भाग ताणला जातो आणि संपूर्ण कणा लवचीक बनतो.

अशाप्रकारे व्यायामाचे अनन्य साधारण असे महत्त्व आहे. शिवाय व्यायामामुळे मानवी शरीराला अनेक प्रकारचे फायदे होतात यामधील सर्वात महत्त्वाचे व्यायामामुळे मानवाचे आयुष्य वाढते. त्यामुळे मानवाचे शरीर अधिक बळकट बनते आणि लवचीक सुद्धा बनते. नियमित व्यायामामुळे मानवा चा मेरुदंड अधिक लवचीक होऊन आपल्या शरीरामध्ये एक वेगळीच स्फूर्ती निर्माण होते. व्यायामाचा प्रकार निवडण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. ज्यांना रक्तदाब, हृदयविकार किंवा अन्य आजारावर औषध चालू असल्यास डॉक्टारांचा सल्ला घेऊनच कोणताही व्यायाम करण्यासाठी तयार व्हावे.