सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर यांनी सा...

सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर यांनी सांगितले फळे खाण्याचे तीन नियम (Dietitian Rujuta Diwekar Explains 3 Important Rules To Eat Fruits)

फळं खाल्ल्याने अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात, हे आपण जाणतोच. पण हे फायदे आपल्या लक्षात येत नाहीत. कारण आपण योग्य प्रकारे फळांचे सेवन करत नाही. म्हणूनच आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर फळं खाण्याची योग्य पद्धत सांगितली आहे.

निरोगी राहण्यासाठी सकस आहारामध्ये फळांचा आवर्जुन उल्लेख केला जातो. फळं खायला सगळ्यांनाच आवडतात परंतु प्रत्येकाच्या फळं खाण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात. कोणाला फळं मिक्स करून सॅलेडच्या रूपात खायला आवडतात तर काहींना त्याचा रस प्यायला आवडतं. परंतु हे फळं खाण्याचे योग्य मार्ग नव्हेत, असं सांगणारी एक पोस्ट सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर यांनी शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी फळे खाण्याचे तीन नियम सांगितले आहेत.

एका वेळी एकच फळ खावे

ऋजुता आपल्या व्हिडिओमध्ये असं सांगतात की, बरेच लोक अनेक प्रकारची फळं एकत्र मिसळून खातात जे अजिबात योग्य नाही. एका वेळी एकच फळ खावे. सध्याच्या युगात फ्रुट डाएटचा ट्रेंड जोमाने सुरू आहे, त्यामुळे एका वेळी एका प्लेटमध्ये सजवलेली भरपूर फळं दिसायला छान दिसतात पण असे केल्याने आपल्याला फळांच्या माध्यमातून पूर्ण लाभ मिळत नाही. प्रत्येक फळ हे स्वतःमध्येच एक परिपूर्ण आहार आहे. त्यास कोणत्याही दुसऱ्या पदार्थासोबत वा इतर फळांसोबत खाण्याची गरज नसते. म्हणजेच फळं दुधात मिसळून खाण्याची वा ज्यूस बनवून पिण्याची देखील आवश्यकता नसते. फळं अशीच थेट खा, असं ऋजुता सांगतात.

दिवसातील कोणकोणत्या वेळी फळं खावीत?

फळांतील सर्व पोषक तत्त्वांचे फायदे मिळवण्याकरता ती योग्य वेळी खाल्ली पाहिजेत, असं ऋजुता यांनी आपल्या दुसऱ्या नियमात सांगितले आहे. त्या सांगतात, फळांचा डाएट घेण्याची सुद्धा एक वेळ असते. आपली इच्छा झाली आणि टोपलीमधून एक फळ उचलून खाल्ले असं चालत नाही. ऋजुता म्हणतात की, फळं फक्त फर्स्ट मील, मिड मील आणि वर्कआउट नंतरच खायला हवीत. अशा प्रकारे सेवन केल्याने आपल्याला त्यांचे संपूर्ण फायदे मिळू शकतात.

फळांचा ज्यूस बनवू नका, फळे थेट चावूनच खा

फळे खाण्याच्या तिसऱ्या नियमात ऋजुता सांगतात की, फळे नीट चावून खावीत, त्यांचा रस बनवू नये. फळे चघळून खाल्ल्याने आपल्याला त्यांच्यातील सर्व आरोग्यदायी फायदे मिळू शकतात. पण तेच फळांचा ज्यूस करून प्याल्याने आपल्या शरीराला फळांच्या सर्व पोषक घटकांचा फायदा अजिबात मिळत नाही, असं त्या म्हणतात.

व्हिडिओच्या शेवटी, ऋजता असं सुचवतात की, फळं ही नेहमी त्या त्या हंगामातच खायला हवीत. विरूद्ध हंगामातील फळे फ्रिजमध्ये साठवून कोणत्याही ऋतूत अजिबात खाऊ नयेत. याशिवाय फळं काटे चमच्याच्या मदतीने नव्हे तर हातांनीच खावीत, असा सल्ला त्या देतात. आपल्याला हे देखील माहित हवे की, फळांच्या आरोग्यदायी लाभासाठी ती फक्त रिकाम्या पोटीच खावीत, जेवल्यानंतर फळे खाणं टाळावं.

डाएटिशियन ऋजता दिवेकर यांच्या या व्हिडिओला लोकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत असून प्रत्येकजण त्यांचे मनापासून आभार मानत आहेत.