अभिनेता धनुष आणि सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी...
अभिनेता धनुष आणि सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या यांचा १८ वर्षांनंतर घटस्फोट (Dhanush And Aishwarya Announce Divorce After 18 Years Of Marriage)

सामंथा प्रभू आणि नागा चैतन्यच्या घटस्फोटाची बातमी ताजी असतानाच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आणखी एका लोकप्रिय जोडीने घटस्फोटाची घोषणा केली आहे. अतरंगी रे चित्रपटातील अभिनेता धनुष याने सोशल मीडिया अकाऊंटवरून पत्नी ऐश्वर्यापासून विभक्त होत असल्याची घोषणा केली आहे. तब्बल १८ वर्षानंतर हे दोघेही वेगळे होत आहेत. ऐश्वर्या ही दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी आहे. धनुषने अचानक पोस्ट करून ही घोषणा केल्याने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

धनुषने ट्विटरवर एक निवेदन दिले आहे, ज्यामध्ये त्याने लिहिले आहे की – “१८ वर्षाची सोबत. मैत्री, पती-पत्नी, आई-वडील आणि एकमेकांचे शुभचिंतक बनून आम्ही एकत्र वाढलो, एकमेकांना समजून घेतलं आणि सहजीवनाचा प्रवास केला होता. आज आम्ही जीवनाच्या अशा टप्प्यावर उभे आहोत, जिथून आमचे मार्ग वेगवेगळे होत आहेत. ऐश्वर्या आणि मी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही एकमेकांपासून वेगळे होऊन स्वत:चा शोध घेऊ. कृपया आमच्या निर्णयाचा आदर करा आणि आमच्या प्रायव्हसीची कदर करून आम्हाला आमच्या निर्णयाला सामोरे जाऊ द्या.”
🙏🙏🙏🙏🙏 pic.twitter.com/hAPu2aPp4n
— Dhanush (@dhanushkraja) January 17, 2022
ऐश्वर्यानेही अशीच पोस्ट लिहिली असून दोघं विभक्त झाल्यामुळे चाहते खूपच निराश झाले आहेत. मधल्या काळात दोघांमध्ये विभक्त झाल्याच्या बातम्या येत होत्या, मात्र आता या दोघांनीही आपण वेगळे होत असल्याचे निश्चितपणे सांगितले आहे.

ऐश्वर्या ही सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी आहे. धनुष आणि ऐश्वर्याचा २००४ मध्ये विवाह झाला होता. त्यांना यात्रा आणि लिंगा नावाची दोन मुले आहेत. तर धनुष हा प्रसिद्ध निर्माते कस्तुरी राजा यांचा मुलगा आहे. मल्टिटॅलेंटेड धनुष अभिनेता तर आहेच शिवाय दिग्दर्शक, निर्माता, डान्सर, पार्श्वगायक, गीतकार आणि संवाद लेखकही आहे.
धनुष आणि ऐश्वर्याची लव्ह स्टोरी

Kadhal Kondaen या सिनेमाच्या दरम्यान धनुष आणि ऐश्वर्याची भेट झाली होती. सिनेमाच्या निर्मात्याने ऐश्वर्याची धनुष सोबत ओळख करून दिली. ऐश्वर्याने या सिनेमातील कामाबद्दल धनुषचं कौतुक केलं होतं. ऐश्वर्याने कामाचं कौतुक केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी धनुषने ऐश्वर्याला फुलांचा गुच्छ पाठवला. ऐश्वर्याला धनुषची ही भेट प्रचंड आवडली आणि त्यानंतर दोघं चांगले मित्रं बनले. दोघेही जेव्हा जेव्हा भेटायचे तेव्हा तेव्हा ते फोटोग्राफर्सच्या नजरेतून सुटत नसायचे. त्यामुळे दोघांचे फोटो वारंवार छापून यायचे. मीडियात दोघेही बातमीचा विषय बनून गेले होते. मात्र, आपल्या नातेसंबंधावर धनुषने कधीच उघडपणे भाष्य केलं नव्हतं. ऐश्वर्या आपल्या बहिणीची मैत्रीण आहे असंच ते सांगायचे. मात्र, कालांतराने दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि दोघांच्या लव्ह स्टोरीची अधिकृत माहिती समोर आली. १८ नोव्हेंबर २००४ रोजी दोघांचा शाही विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्याला अख्खी साऊथची फिल्म इंडस्ट्री हजर होती.