‘देवों के देव महादेव’ फेम मोहित रैना आणि ...

‘देवों के देव महादेव’ फेम मोहित रैना आणि खऱ्या जीवनातील त्याची पार्वती अदिती यांची मजेशीर लवस्टोरी (‘Devon Ka Dev…Mahadev’ Mohit Raina REVEALS How He Met His Real Life Parvati Aditi, Shares His Love Story)

‘देवों के देव महादेव’ फेम अभिनेता मोहित रैनाने नवीन वर्षात म्हणजेच १ जानेवारीला त्याची गर्लफ्रेंड अदितीसोबत लग्न करून सर्वांना चकित केले. त्याने स्वतः त्याच्या इंस्टाग्रामवर फोटो शेअर करून लग्नाची बातमी दिली. आदितीसोबतच्या नात्यापासून ते लग्नापर्यंत सर्व काही इतकं गुपचूपपणे झालं होतं की त्याच्या लग्नाची बातमी सर्वांसाठी आश्चर्यापेक्षा कमी नव्हती.

मोहित रैनाने अदितीसोबत आपल्या आयुष्याचा नवा अध्याय सुरू केला असून तो खूप आनंदी आहे. पण त्याच्या लग्नाची बातमी आल्यापासून त्याचे चाहते त्याचे वैयक्तिक आयुष्य, अदिती त्याला कधी आणि कुठे भेटली, त्यांची प्रेमकहाणी कशी सुरू झाली या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. मोहित रैनाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखती दरम्यान चाहत्यांच्या या प्रश्नांची उत्तरे दिली. या संवादात त्याने त्याची प्रेमकहाणी, लग्न आणि त्याची पत्नी अदिती याविषयी सांगितले.

अदितीसोबत आपली पहिली भेट कशी झाली अन्‌ ही भेट लग्नापर्यंत कशी पोहोचली याबाबत सांगताना मोहित म्हणाला, “अदिती आणि माझी काही वर्षांपूर्वी आमच्या एका कॉमन फ्रेंड्सद्वारे भेट झाली होती. मी नेहमी एका गोष्टीवर विश्वास ठेवतो, तुम्हाला काय हवे आहे ते पाहा आणि जे दिसते ते मिळवण्याचा प्रयत्न करा. आमच्या नात्याची सुरुवात मैत्रीपासून झाली. या नात्यात मी संवाद सुरू केला. हळूहळू मी पुढे जाऊ लागलो आणि आम्ही जवळ येऊ लागलो. मग आम्ही हे नाते पुढे नेण्याचे ठरवले. हे कोविडच्या दुसऱ्या लाटेदरम्यान झाले. मग मी पुढाकार घेऊन तिच्या कुटुंबीयांना भेटून तिचा हात मागितला. दोन्ही कुटुंब भेटले आणि आमचे लग्न निश्चित झाले.”

अदितीच्या प्रेमात पडल्यानंतर मोहित म्हणाला, “ती एक सुंदर अनुभूती होती. सुंदर, निर्मळ अशा त्या भावना होत्या. लग्नाबद्दल मी म्हणेन की ते एक स्वप्न होते आणि स्वप्न सत्यात उतरले आहे.”

लग्न लपवून ठेवण्याच्या प्रश्नावर मोहित म्हणाला, “सर्वप्रथम म्हणजे हे पूर्वनियोजित नव्हते. सर्व काही अगदी अल्पावधीत घडले. आम्ही झटपट निर्णय घेतला आणि लग्न केले. दुसरे म्हणजे, मी खूप खाजगी व्यक्ती आहे. एखाद्या अभिनेत्यासाठीही असं काहीतरी असायला हवं जे फक्त त्याचंच आहे, त्याच्या हृदयाच्या जवळ आहे आणि आमचं लग्न हे वैयक्तिकरित्या माझ्या खूप जवळ होतं. त्यामुळे मला ते अतिशय खाजगी आणि लो प्रोफाइल ठेवायचं होतं. पण सोशल मीडियावर लग्नाचे फोटो पोस्ट करताच लोकांच्या प्रतिक्रिया पाहून मला आश्चर्य वाटलं. मला अशी प्रतिक्रिया अपेक्षित नव्हती. लोक माझ्यावर किती प्रेम करतात याची मला जाणीव झाली.”

मोहित रैनानं १ जानेवारी २०२२ रोजी त्याची गर्लफ्रेंड अदितीसोबत राजस्थानमध्ये लग्न केलं होतं. कोरोनामुळे या लग्नाला फक्त कुटुंब आणि जवळचे मित्र उपस्थित होते. सोशल मीडियावर लग्न करून त्याची घोषणा करून अभिनेत्याने नवीन वर्षात सर्वांना एक मोठं सरप्राईज दिलं होतं. लग्नानंतर मोहित रैनाही कामावर परतला आहे. त्याने त्याच्या आगामी ‘भौकाल २’ या मालिकेच्या शूटिंगला सुरूवात केली आहे.