‘देवा तुचि गणेशु, सकलाचा प्रकाशु’ (Celebrations...

‘देवा तुचि गणेशु, सकलाचा प्रकाशु’ (Celebrations Of Ganesh Festival And It’s Importance)

धर्मशास्त्र
गौरी गणपतीचा सण म्हणजे मराठी लोकजीवनातील मराठी माणसाचे सांस्कृतिक वैभवच ठरावे. या उत्सवात संपूर्ण समाजाला एकत्रित करण्याचे सामर्थ्य आहे. कौटुंबिक, सामाजिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक ताकद एकत्र करण्याचे मोठे काम या सण आणि उत्सवामधून होते.

चतुर्थी ही गणेशाची प्रिय तिथी. शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी आणि वद्य चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात. भाद्रपदातील शुक्ल चतुर्थीला गणेश चतुर्थी म्हणतात. दर महिन्याच्या चतुर्थीचे व्रत हजारो भाविक मनोभावे करतात. चतुर्थी म्हणजे जागृती आणि सुबुद्धीची अवस्था मानली जाते. कोणत्याही शुभ कार्यात आणि सर्वप्रथम पूजनाचा सर्वमान्य अधिकार श्री गणेशाकडे जातो. घराघरांत आणि घरातील प्रत्येक देव्हाऱ्यात गणपतीचे स्थान श्रद्धापूर्वक जपले जाते. वाडा संस्कृती असो वा फ्लॅट संस्कृती असो किंवा स्वतंत्र घर असो दर्शनी दरवाजावर छोटी गणेश मूर्ती किंवा सिरॅमिक टाईल्सवर मुद्रित केलेली गणेशमूर्ती कलात्मकरीतीने बसविलेली असते.

Ganesh Festival And It's Importance

संगणक युगातसुद्धा गणेशोत्सवाचे महत्त्व कायम
संत शिरोमणी ज्ञानेश्वर माउलींनी ज्ञानेश्वरीच्या आरंभी ‘देवा तुचि गणेशु, सकलाचा प्रकाशु’ असे म्हणून गणरायाला वंदन केले आहे. सिंदुरवदन श्री गजाननाचा जयजयकार, स्मरण आणि पूजन करण्याची प्रथा, वेदोपनिषद काळापासून अखंड चालू आहे. श्री गणेश चौदा विद्या आणि चौसष्ट कलांनी मंडीत आहे. त्याच्या कृपाप्रसादाने सुबुद्धी आणि सुविधा यांचा लाभ होतो, ही भावना गणेशभक्तांनी श्रद्धापूर्वक अंतःकरणाने जपली आहे. औद्योगिकीकरणाच्या काळात किंवा संगणक यगातसुद्धा गणेशोत्सवाचे महत्त्व कायम आहे. आता तर परदेशी राहणारे भारतीय एकत्रितरीत्या मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा करतात.

महाराष्ट्रातील गौरी गणपती उत्सव घरगुती स्वरूपात तर सार्वजनिक गणपती उत्सव सार्वजनिक स्वरूपात साजरा केला जातो. कुणाच्या घरी दीड दिवस, कुणाच्या पाच दिवस, तर कुणाच्या सात, दहा दिवस गणपती बसविण्याची प्रथा आहे. गणेशमूर्तीचे आकार, मूर्तिकार बऱ्याच वेळा परंपरेचाच भाग होऊन गेलेत. पूर्वी मूर्तीचे आकार उभी, मोरावर, सिंहासनावर बसलेली आदी ठरलेले असायचे, पण आता दगडूशेठ गणपती आणि अनेक देवांच्या रूपात गणपती मिळतात. मूर्ती घरी नेताना वस्त्र पांघरून, अनवाणी पायांनी नेली जाते. औक्षण करून मूर्ती घरात घेतली जाते. तांदळावर गणपती बसविला जातो. त्यानंतर पाच दिवस दररोज सकाळी, संधकाळी सहकुटुंब, शेजारी यांच्यासह सामुदायिक आरती, काही ठिकाणी अथर्वशीर्ष पठण होते. प्रसादवाटप होते. दैनंदिन ताणतणावातून थोडी सुटका मिळत असल्याने कौटुंबिक, सामाजिक वातावरण चैतन्यमय वाटते. जीवनात काही काळ शुद्ध भावना, शांत, प्रसन्न प्रेरणादायी वातावरण यांची निर्मिती होते.

सामूहिक सहभागाची भावना
गणपतीच्या आगमनानंतर तिसऱ्या दिवशी गौरीचे आगमन होते. गौरीचा सण महिलांचा विशेषतः माहेरवाशिणींचा अमाप उत्साहाचा सण. जुन्या आठवणी उजळून निघणारे माहेरपण भारतीय संस्कृतीचा अमूल्य ठेवा म्हणावा लागेल. एरवी इतर सणावारात फारसा सहभाग नसलेला महिलावर्ग यामध्ये मोठ्या प्रमाणात एकत्र येतो. सामूहिक सहभागाची भावना वाढीस लागण्यास हे रिवाज अभ्यासण्यासारखे आहेत. रांगोळी, फुलांनी सजविलेल्या घरात गौराईचे आगमन म्हणजे साक्षात लक्ष्मी, सरस्वतीचे, धनवृद्धी, धनसंपदा, सोनं नाणं यांच्या पावलाने आगमन असे समजले जाते. भाद्रपद महिन्यात शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रावर आपापल्या कुलाचाराप्रमाणे महालक्ष्मी/गौरीची प्रतिमा वा प्रतीके बसवितात. ज्येष्ठा नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा करतात व महानैवेद्य दाखवितात. तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर महालक्ष्मीचे विसर्जन करतात.

Ganesh Festival And It's Importance

गौरींच्या मांडणीच्या विविध पद्धती
स्थळपरत्वे गौरींच्या पूजेची पद्धत आणि परंपरा बदलल्या आहेत. काही कुटुंबात गौरींचे मुखवटे असतात, तर काही कुटुंबात परंपरेनुसार पाणवठ्यावर जाऊन पाच, सात किंवा अकरा खडे आणून त्यांची पूजा करतात. काही ठिकाणी पाच मडक्यांच्या उतरंडी करून त्यावर गौरीचे मुखवटे लावून त्या उतरंडींनाच साडी चोळी नेसवतात आणि त्यांची पूजा करतात. काही घरांत धान्यांची रास म्हणजेच गहू, तांदूळ, ज्वारी, हरभरा, डाळ इत्यादींपैकी एकदोन धान्याचे ढीग करून त्यावर मुखवटे ठेवतात. बाजारात पत्र्याच्या, लोखंडी सळ्यांच्या किंवा सिमेंटचे कोथळे मिळतात. त्यावर मुखवटे ठेवतात आणि कोथळ्यांना साडी चोळी नेसवतात. सुपात धान्याची रास ठेवून त्यावर मुखवटा ठेवतात. किंवा गहू आणि तांदूळ यांनी भरलेल्या तांब्यांवर मुखवटे ठेवून पूजा करतात. तेरड्याचीही गौर असते. तेरड्याची रोपे मुळासकट आणतात. ही मुळे म्हणजेच गौरींची पावले, असा समज आहे. आधुनिक काळात गौरीपूजनाच्या व मांडणीच्या पद्धतीत व गौरीच्या रूपातही आधुनिकता दिसून येते. विविध रूपांत अनेक घरांत गौरी/महालक्ष्मी येतात. आगमनाच्या दिवशी संध्याकाळी किंवा पंचांगात शुभ वेळ बघून मुखवट्यांची आणि लक्ष्मीच्या हातांची पूजा होते. त्याच रात्री गौरी उभ्या केल्या जातात. या गौरी/महालक्ष्मी किंवा सखी-पार्वतींसह त्यांची मुलेही (एक मुलगा आणि एक मुलगी) मांडतात. कोणी धातूची लक्ष्मीची प्रतिमा करून पूजतात, कोणी मातीची बनवितात तर कोणी कागदावर देवीचे चित्र काढून त्याची पूजा करतात.

Ganesh Festival And It's Importance

लोकजीवनातील लोकसंस्कृती
नागपंचमीपासूनच सराव केलेल्या झिम्मा – फुगडीची रंगत अधिकृतपणे गौरी गणपतीच्या सणातच पाहावयास मिळते. लोकगीतांच्या तालावरील झिम्म्यातील गाणी म्हणजे शारीरिक हालचाल आणि मनाची प्रसन्नता यांचा सुरेख संगमच. कौटुंबिक नाती आई, वडील, बंधुराज यांच्याप्रती असणारा भावनिक ओलावा अशा गाण्यांमधून प्रकट होत असतो. माया, ममता, प्रेम प्रकट होते. सासू, सासरे, दीर, नणंदा यांचे पारंपरिक नातेसंबंध अधोरेखित करणाऱ्या गाण्यातील ओळी म्हणजे अनुभवाचे कथनच. फुगडी, चुईमुई, काटवटकाणा, घागर, सूप हाताच्या तालावर नाचविणे यामधून व्यक्तिगत कौशल्य नजरेस येते. हास्य, विनोद, थट्टामस्करी यामधून खिलाडूवृत्ती वाढीस लागते. लोकजीवनातील ही लोकसंस्कृती सामाजिक प्रगतीला प्रेरणा देते.

गेल्या वर्षी करोनाच्या महामारीमुळे लोकांना या उत्सवाचा फार काही आनंद घेता आला नाही. आणि आत्ताही परिस्थिती काही प्रमाणात शिथिल झाली असली तरीही जनमानसाने आपल्या तसेच इतरांच्याही आरोग्याची काळजी घेत या वर्षीचा उत्सवही नियमांचे पालन करून साजरा करावयचा आहे. गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सरकारकडून काही सूचना जाहीर केल्या गेल्या आहेत. त्यानुसार सर्व गणेशभक्तांना गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याची सूचना करण्यात आली आहे. यंदा १० सप्टेंबर ते १९ सप्टेंबर (अनंत चतुदर्शी) या काळात राज्यात सार्वजनिक आणि घरगुती गणेशोत्सव साजरा होत आहे. हा उत्सव निर्विघ्नपणे पार पडावा, अशी श्री गणेशाच्या चरणी विनंती आहेच, शिवाय आपणही नियमांत राहून सहकार्याची भावना ठेवणे अपेक्षित आहे. पाहूयात या सूचना काय आहेत…

गणेशोत्सवासाठीच गाईडलाईन्स

सार्वजनिक मंडळाची गणेश मूर्ती ४ फूट तर घरगुती गणपती २ फूटांचा असावा.

गणपती आणताना वा विसर्जनासाठी मिरवणूक काढता येणार नाही.

शक्यतो शाडूच्या मातीची मूर्ती स्थापन करावी आणि या मूर्तीचं घरच्या घरी वा कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात यावं.

मंडप परिसरात गर्दी होऊ देऊ नये. आरती, भजन, कीर्तन करताना गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी.

सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्यविषयक उपक्रम सार्वजनिक मंडळांनी राबवावेत.

नागरिकांची गर्दी होऊ नये यासाठी वेबसाईट, ऑनलाईन, केबल नेटवर्क, फेसबुकद्वारे दर्शनाची सोय करावी.

गणपती मंडपामध्ये निर्जंतुकीकरण आणि थर्मल स्क्रिनिंगची व्यवस्था असावी.

विसर्जनाआधीची आरती घरीच करून, मग मूर्ती थेट विसर्जनासाठी आणावी.

एकाच इमारतीतल्या अनेक घरगुती गणपतींची एकत्र विसर्जन मिरवणूक काढता येणार नाही.