जुनी प्रथा नव्याने मांडून नावारूपास आलेल्या डिझ...

जुनी प्रथा नव्याने मांडून नावारूपास आलेल्या डिझायनर बहिणी (Designer Sisters Innovate Old Tradition In New Form)

‘You Are Unique, So We Are’ अशी टॅग लाईन घेऊन जुनीच प्रथा नव्याने मांडणारा अगदी नवाकोरा ‘नवप्रथा’ फॅब्रिक ब्रँड सध्या बाजारात रुजू झाला आहे. शीतल आणि शामल गांवकर या दोघी बहिणींनी त्यांच्या आर्टिस्ट काकांकडून प्रेरणा घेत हा ब्रँड प्रस्थापित केला आहे.

Designer Sisters

आपल्या या ब्रँडविषयी माहिती सांगताना शीतल गांवकर म्हणाल्या, “मी आणि माझी बहीण शामल हिला पहिल्यापासूनच वेगवेगळ्या फॅब्रिकच्या रंगसंगती व डिझाईन्स यांचे आकर्षण आहे.स्वतःचे ड्रेस स्वतः तयार करण्याची आवड अन्‌ या क्षेत्रात काहीतरी करायचे असे दोघींनाही वाटत होते. त्यातूनच मग स्वतःची डिझाईन्स स्वतः तयार करण्याची एक कल्पना डोक्यात आली.’’

Designer Sisters
Designer Sisters

“तोपर्यंत शामलचा फॅशन डिझाईनिंगचा कोर्स पूर्ण होऊन तिने एका नामंकित कंपनीसोबत काम करून या क्षेत्रातला अनुभव घेतला होता. जो आम्हाला बराच उपयोगी येणार होता. आमचे काका आर्टिस्ट आहेत. १५ वर्षांपूर्वी छोट्या टेक्सटाईल कंपन्यांमध्ये फॅब्रिक वर स्वतः हाताने नक्षीकाम करण्याचे काम ते करत होते. कुठलेही चित्रकलेचे शिक्षण न घेता, ते त्यात अतिशय माहीर आहेत. परंतु औद्योगिकरणानंतर कंपन्या बंद पडल्या व ते कायमचे गावी निघून गेले होते. मात्र, तेथेही त्यांच्यातील कलाकाराने त्यांना स्वस्थ बसू दिले नाही. गावी ते स्वतःच कलर आणून कधी कुणाला अशीच साडी नक्षीकाम करून द्यायचे. काकांची ही अपार उत्सुकता पाहून त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन मग आम्ही त्यांच्यासोबतच काम सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि डिझाईन्स बनवण्यास सुरुवात केली,” असे शीतल यांनी सांगितले.

Designer Sisters

“२०१८-१९ सालामध्ये आम्ही २००००/- ची पहिली गुंतवणूक करत फॅब्रिक उचललं. काकांनी गावी राहून आणि आम्ही मुंबईत सगळं घरातूनच सांभाळायचं ठरलं. सुरुवातीला ड्रेसवरच्या ओढण्यांचं काम सुरू केलं. पहिला स्टॉक होता होताच कोरोना आला आणि सगळं थांबलं. सगळा स्टॉक तयार होऊन घरीच ठेवावा लागल्यामुळे आम्ही चिंतेत होतो. कारण गुंतवणुकीपेक्षा अधिक बजेट झालं होतं. कुठलाही उद्योग सुरु करताना त्याच्या RND मध्ये बरीच गुंतवणूक होते.

Designer Sisters

६ महिन्यांपूर्वी परिस्थिती जरा निवळत आली असताना आम्ही परत कामाला सुरूवात केली. मार्केटींगसाठी परत गुंतवणूक केली. मग घरूनच फोटोग्राफी करून पहिला कॅटलॉग तयार केला. पण मार्केटमध्ये लाँच करण्यासाठी एका प्रभावित करणाऱ्या नावाची गरज होती. जुनीच प्रथा पण नव्याने मांडणे आणि तिला नव यंत्रणेची सोबत देणे अशा अर्थाचे नाव म्हणजे ‘नवप्रथा’; हे माझा नवरा नितीनने सुचवले. आणि ‘नवप्रथा’ या नावासोबत आम्ही मार्केटमध्ये पदार्पण केले. यू ट्यूब आणि इतर सोशल मीडियाचा वापर केला,” असे शीतल यांनी सांगितले.

नवप्रथाच्या पहिल्याच कॅटलॉगला छान रिस्पॉन्स मिळाला. बायकांनी पहिल्या स्टॉकमधील – साड्या व ओढण्यांना उत्तम दाद दिली. हाताने एवढं सुरेख नक्षीकाम कसं केलं असेल यांचं त्यांना विशेष कौतुक वाटलं.

Designer Sisters

आम्ही पोस्टामार्फत आलेल्या ऑर्डर कुरिअर करतो. आमच्या उत्पादनाबाबत लोकांच्या मनात शंका असणार नाहीत यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आधुनिक तंज्ञज्ञानामुळे कुठेतरी दिसेनासे झालेल्या जन्मजात कलाकारांना प्रकाशझोतात आणण्याचा नवप्रथाचा उद्देश आहे. आमच्या काकांप्रमाणेच इतरांच्याही चेहऱ्यावर हसू यावं यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. सध्या आम्ही दिवाळीच्या स्टॉकसाठी उत्साहाने कार्यरत आहोत, असे शीतल यांनी सांगितले आहे. शीतल मानसशास्त्र क्षेत्रातली आहे. स्वतःचे क्षेत्र सांभाळत ती आपल्यातील कलात्मकतेची आवडही जोपासते आहे. शीतल व शामल या दोन्ही बहिणींचा हा प्रवास आता सुरू झाला आहे, अन्‌ यात त्यांना बऱ्याच जणांना सोबत घेऊन पुढे जायचे आहे. तेव्हा त्यांना त्यांच्या पुढील प्रवासासाठी अनेक शुभेच्छा.