पहिल्या भेटीपासून अखेरच्या प्रवासापर्यंत, मंदिर...

पहिल्या भेटीपासून अखेरच्या प्रवासापर्यंत, मंदिराने राजची सोडली नाही साथ (Defying Age-Old Tradition, Mandira Bedi performs husband Raj Kaushal’s last rites)

आपल्या पतीस अचानक आणि लहान वयात गमावणे, यासारखं दुर्दैव कोणत्याही स्त्रीच्या आयुष्यात नसावं. दिग्दर्शक- निर्माता राज यांच्या अचानक जाण्यामुळे मंदिराला मोठा धक्का बसला आहे. राज कौशल यांचे बुधवारी पहाटे साडे चार वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. कोणी काही करण्याच्या आणि डॉक्टरांना बोलावण्याच्या आधीच राज यांनी जगाचा निरोप घेतला.

राज यांच्या निधनाने मंदिरा बेदीला कोलमडून टाकले आहे. राज यांची अंत्ययात्रा आणि त्यांच्यावरील अंत्यसंस्काराचे काही फोटो आणि व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंत मंदिराला रडताना तसेच स्वतःला सांभाळताना पाहणे काळीज पिळवटून टाकणारे आहे. मात्र तरी देखील मंदिराने आपला पत्नी धर्म बजावत राजच्या पार्थिवाला खांदा दिला. हे पाहून मंदिराच्या चाहत्यांना गहिवरून आले.

जीवनाच्या प्रत्येक वळणावर, प्रत्येक प्रवासात मंदिराने आपल्या पतीची साथ दिली, आणि आता रुढी, परंपरा यांची पर्वा न करता मंदिरा आपल्या पतीच्या अंत्ययात्रेतही सामील झाली. आपल्या पतीच्या शेवटच्या प्रवासातही ती त्याच्याबरोबर राहिली, त्यामुळे सर्व चाहत्यांनी तिच्या धैर्याचं कौतुक केलं आहे.

भारतीय समाजधारणेनुसार स्त्रियांना कोणत्याही व्यक्तीच्या अंत्ययात्रेत सामील होता येत नाही, परंतु राज यांच्या अंत्ययात्रेत पार्थिवास खांदा देण्यापासून ते हातात मडके घेऊन, पतीच्या पार्थिवासोबत चालणाऱ्या मंदिराला पाहून सर्वांना अश्रू अनावर झाले. राज यांच्याशी झालेली पहिली भेट, मग लग्न आणि आता अखेरचा निरोप देतानाही मंदिराने त्यांची साथ सोडली नाही. हा क्षण खरोखरच व्याकूळ करणारा होता.

जेव्हा राज यांना मुखाग्नी देण्यात आला तेव्हा मंदिरा हात जोडून सातत्याने रडत होती आणि फक्त राज यांना पाहत होती. हा व्हिडिओ पाहताना चाहतेही भावूक झाले.

पतीच्या अंत्ययात्रेत त्यांच्या पार्थिवासोबत चालणाऱ्या मंदिराचे फोटो सोशल मीडियावर वेगाने शेअर केले जात आहेत. लोक मंदिराच्या हिमतीची दाद देत आहेत. सोबत, मंदिरा आणि त्यांच्या मुलांना या दुःखद प्रसंगातून बाहेर येण्यासाठी बळ मिळो, अशी ते प्रार्थना करत आहेत.

पती राज कौशल यांना अखेरचा निरोप देताना मंदिराला सांभाळणे कठीण गेले होते. पतीवर अंत्यसंस्कार झाल्यानंतर मंदिराचा बांध फुटला. ती स्वतःला रोखू शकली नाही. यावेळी मंदिराचे अनेक मित्रमंडळी आणि बॉलिवूडमधील कलाकार उपस्थित होते. ज्यांनी तिला धीर देऊन सावरले. २१ वर्षांच्या संसारानंतर आज मंदिरासोबत पतीच्या फक्त आठवणी राहिल्या आहेत.