फिफा वर्ल्डकप इतिहासात हा मान मिळवणारी दीपिका ठ...

फिफा वर्ल्डकप इतिहासात हा मान मिळवणारी दीपिका ठरणार पहिली भारतीय अभिनेत्री (Deepika Padukone to unveil FIFA World Cup trophy in Qatar)

फिफा वर्ल्डकप इतिहासात कधी झालं नाही ते यंदा कतारमध्ये होणार आहे. फिफा वर्ल्डकपची फायनल अवघ्या काही दिवसांवर आली आहे. फिफा वर्ल्ड कपचा अंतिम सामना १८ डिसेंबरला होणार आहे. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये अंतिम सामन्यात फिफा वर्ल्डकप ट्रॉफीचे अनावरण करण्याचे भाग्य भारताची आघाडीची अभिनेत्री दीपिका पादुकोणला मिळणार आहे, अशी माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे हा मान मिळवणारी दीपिका ही भारताची पहिली अभिनेत्री ठरणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दीपिका पादुकोणनेच ती कतारला जात असल्याचे उघड केले आहे. जगातील सर्वात मोठा इव्हेंट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फिफा वर्ल्डकप ट्रॉफीचे फायनलमध्ये दीपिका पादुकोणच्या हस्ते अनावरण होणार आहे. या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार संपूर्ण फुटबॉल जगत असणार आहे.

दीपिकासाठीही फिफा वर्ल्ड कपच्या ट्रॉफीच अनावरण करणं ही सन्मानाची बाब असणार आहे. ही बातमी समोर आल्यावर दीपिकाच्या चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. दीपिकाच्या शिरपेचात हा एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.  

कतारमधील लुसेल आयकॉनिक स्टेडियममध्ये अंतिम सामना खेळवला जाणार आहे. दीपिकासोबत अभिनेत्री नोरा फतेही ही कतारमधील फिफा फॅन फेस्टमध्ये ‘लाइट द स्काय’ या वर्ल्ड कप गाण्यावर परफॉर्म करणार आहे.

दीपिकाने कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये देखील भारताच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला होता. ती या फिल्म फेस्टिव्हलमध्ये ज्युरी मेंबर म्हणून निवडली गेली होती. याचबरोबर गोल्डन रेशो ऑफ ब्युटी या संस्थेनुसार जगातील सर्वात सुंदर महिला टॉप १०च्या यादीत समाविष्ट असणारी दीपिका एकमेव महिला ठरली होती.

सध्या दीपिका अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेता जॉन अब्राहमसोबत पठाणमध्ये दिसणार आहे. यासोबतच दीपिका अमिताभ बच्चन यांच्यासोबत एका रिमेकमध्येही दिसणार आहे.