कान्स चित्रपट महोत्सवाच्या समारोप दिनीही दीपिका...

कान्स चित्रपट महोत्सवाच्या समारोप दिनीही दीपिका पादुकोनच्या व्हाइट रफल्ड साडीतील रॉयल लूकने सगळ्यांना केले घायाळ (Deepika Padukone looks stunning in a ruffled white saree for her final appearance at the Cannes film festival)

जगभरातील सिनेप्रेक्षकांसाठी नेहमीच उत्सुकतेचा विषय असणारा कान्स फिल्म फेस्टिव्हल मागील काही दिवसांपासून सलग चर्चेत आहे. यंदाचे या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे हे ७५ वे वर्ष होते. १७ मे ते २८ मे दरम्यान फ्रान्स येथे हा सोहळा नेहमीच्याच शानदार पद्धतीने पार पडला आहे. जगभरातील मोठमोठ्या हस्तींची या महोत्सवात वर्णी लागली. भारतातूनही अनेक फिल्मी हस्तींनी या महोत्सवात सहभागी होऊन भारताचे नाव उज्ज्वल केलं. विशेषतः दीपिका पादुकोनच्या दररोजच्या रेड कार्पेटवरील स्टायलिश लूकने उपस्थितांची हृदयं जिंकली. ब्लॅक साडीमधील तिच्या लूकने सगळ्यांचेच लक्ष तिच्याकडे खेचले असतानाच नुकताच दीपिकाचा जो रॉयल लूक समोर आला आहे, त्याचे वर्णन काय करावे, असे झाले आहे.

या कान्स महोत्सवा दरम्यान दीपिकाचे ट्रॅडिशनल ते वेस्टर्न आणि इंडो वेस्टर्न असे अनेक ग्लॅमरस लूक समोर आले. त्यापैकी काही लूक्सनी वाहवा मिळवली तर काही लूक्सच्या बाबतीत तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. आता दीपिकाने स्वतःच्या सोशल मीडिया अकाऊंटवर कान्सच्या रेड कार्पेटवरील आपल्या शेवटच्या लूक्सचे फोटो शेअर केले आहेत, ज्यात दीपिका अतिशय सुंदर दिसत आहे.

या लेटेस्ट फोटोंमध्ये दीपिकाचा लूक राजेशाही वाटत आहे. या फोटोंत तिने व्हाइट रफल साडी परिधान केलेली आहे. सोबत ब्रालेट ब्लाउजला तिने टीमअप केलं आहे आणि यात ती अतिशय बोल्ड दिसत आहे. पांढऱ्या मोत्यांचा स्टेटमेंट नेकपीस तिच्या सौंदर्यात भर घालण्यास पुरेसा आहे. व्हाइट रंगाच्या अतिशय साध्या साडीत देखील दीपिका गॉजियस दिसत आहे.

शनिवारी पार पडलेल्या कान्स महोत्सवाच्या या सांगता समारंभामध्ये दीपिकाने आपल्या या गॉजियस लूकने सगळ्यांचे मन जिंकले. अभिनेत्रीने जी साडी घातली होती, ती अबू जानी – संदीप खोसला यांनी डिझाइन केली होती आणि त्यात दीपिका इतकी सुंदर दिसत होती की सगळ्यांच्या नजरा फक्त तिच्यावरच खिळल्या होत्या.

दीपिकाच्या कामाबद्दल सांगायचे तर सध्या तिच्या हातात अनेक प्रोजेक्ट आहेत. शाहरुख खान सोबत ती ‘पठाण’ आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘द इंटर्न’ च्या हिंदी रिमेकमध्येही काम करताना दिसणार आहे.