‘रंग माझा वेगळा’ मालिकेत लगीनघाई : दीपा-कार्तिक...

‘रंग माझा वेगळा’ मालिकेत लगीनघाई : दीपा-कार्तिकचे लग्न होणार थाटात (Deepa-kartik Wedding Will Be A Grand Celebration In ‘Rang Maza Vegla’ Marathi Serial)

गेले कित्येक दिवस ज्या दिवसाची प्रेक्षक आतुरतेने वाट पहात होते तो दिवस अखेर दीपा-कार्तिकच्या आयुष्यात आलाय. गैरसमज आणि त्यातून निर्माण झालेल्या दुराव्यामुळे दीपा-कार्तिकने आयुष्यातले महत्त्वाचे क्षण गमावले. कार्तिकी आणि दीपिका या दोन्ही मुलींच्या जन्माचा आनंदही दोघांना एकत्र साजरा करता आला नाही. दोन्ही लेकी दोन वेगळ्या घरांमध्ये लहानाच्या मोठ्या झाल्या. मात्र आता गैरसमजाचं मळभ दूर झालंय.

दीपा-कार्तिकच्या आयुष्यात पुन्हा सुखाचे क्षण येऊ पहात आहेत. आपापसातले हेवेदावे विसरुन दोघंही पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकणार आहेत. इनामदार कुटुंबात दीपा-कार्तिकच्या लग्नाची जय्यत तयारी सुरू झाली असून मेहंदी, हळद, संगीत आणि लग्न सगळं अगदी साग्रसंगीत पार पडणार आहे.

मालिकेतल्या या महत्त्वाच्या वळणाविषयी सांगताना कार्तिक म्हणजेच अभिनेता आशुतोष गोखले म्हणाला, ‘कार्तिकला सत्याचा उलगडा झालाय. त्यामुळे त्याने दीपाची सर्वांसमक्ष माफी मागून दोन्ही मुलींचा पिता म्हणून स्वीकार केलाय. पहिल्यांदा सर्वांच्या विरोधात जाऊन कार्तिकने दीपाशी लग्न केलं होतं. यावेळी मात्र सर्वांच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटाने हे लग्न पार पडणार आहे. खास बात म्हणजे दीपिका आणि कार्तिकीच्या पुढाकारानेच आमचं लग्न पार पडत आहे. या दोघीच आमची लगीनगाठ बांधणार आहेत. त्यामुळे हे लग्न खूपच स्पेशल आहे.