घर सजवताना करू नका या चुका (Decor Your Home Wit...

घर सजवताना करू नका या चुका (Decor Your Home Without Blunders)

घर हा आपला जिव्हाळ्याचा विषय आहे. तेव्हा त्याची सजावट करताना अति उत्साहात आपण अगदी साध्यासाध्या चुका करतो अन् घराचं सौंदर्य घालवतो. या चुका कोणत्या ते पाहुया.

आपण केलेल्या एखाद्या कामाची प्रशंसा झाली की आपल्याला कसं हायसं वाटतं. केलेल्या कामाचं चीज झालं असं वाटतं. मग ते काम घरातील सजावटीचं असलं तरी पाहणार्‍यानं म्हटलं, वा! घर एकदम चकाचक दिसतंय, काय विशेष? की मेहनत सार्थकी लागल्यासारखी वाटते. याउलट काही वेळा घर सजवताना अति उत्साहात आपण काही चुका केल्या तर घराचं सौंदर्य वाढण्याऐवजी ते कमी होतं. किंवा त्यातील त्रुटी नजरेस दिसून येतात नि मग प्रशंसा तर दूरच, निरुत्साह वाट्याला येतो. असं होऊ नये याकरिता घर सजविताना काही गोष्टी आवर्जून लक्षात ठेवायला हव्या.

मॅचिंग रंगांचा वापर
घराला रंग काढायचा असल्यास, सगळ्या भिंतींना सरसकट एकच रंग देण्याचा जमाना आता जवळपास हद्दपार झाला आहे. त्यामुळे वेगवेगळ्या हलक्या रंगाचा वापर करा. गडद रंगांची विशेष आवड असेल तर कोणत्याही एका भिंतीवर तो रंग मारा. रंग अधिक उठावदार करण्यासाठी घरातील फर्निचर आणि पडद्यांवरील डिझाइनशी भिंतीवरील रंगाची संगती मिळतीजुळती घ्या.

भिंती फोटोंनी भरून टाकणं
काही व्यक्तींना घरातील भिंतीवर फोटो लावण्याची फार आवड असते. अर्थात कुटुंबासोबत घालविलेल्या काही आनंदी क्षणाच्या आठवणी त्यात असतात. परंतु फोटोंनी गच्च भरलेल्या भिंती गृहसजावटीच्या दृष्टीने मारक ठरतात. याऐवजी काही निवडक फोटोंचं कोलाज करून दिवाणखाना किंवा बेडरूममध्ये लावा.

वस्तूंचं प्रदर्शन करण्याची सवय
काही व्यक्तींना घरामध्ये जुन्या पद्धतीचं फर्निचर, जुन्या दुर्मीळ वस्तूंचा संग्रह करण्याची आवड असते. परंतु आपल्या घरी येणार्‍या पाहुण्यांना आपली ही आवड रुचेलच असं नाही. अनेक वर्षांपासून संग्रह करत गेलेल्या या वस्तूंची नीट आवराआवर करणे पुढे पुढे शक्य होत नाही. मग या वस्तू कोठेही अस्ताव्यस्त ठेवल्या जातात. यामुळे घराचं सौंदर्य लपलं जातं.
तुम्हाला दुर्मीळ वस्तू संग्रही ठेवण्याचा छंद असेल तर ते चांगलंच आहे. पण मग त्या वस्तूंची नीट बडदास्त ठेवता आली पाहिजे. दिवाणखान्याला म्युझियम बनविण्याऐवजी घरातील सजावटीशी सुसंगत वस्तूच तेथे ठेवा. काही अगदी जुन्या वस्तूंचं डिझाइन बदलून त्यांना नवीन रूप द्या. म्हणजे मग वस्तूंचं आणि घराचं नावीन्यही टिकून राहील.

चुकीच्या लँपशेडची निवड
आपण घराच्या सजावटीसाठी लँपशेड आणावयास जातो आणि त्याचं डिझाइन आणि स्टाइल पाहून लगेच प्रभावित होतो. मग दिवाणखान्याची साइज वगैरे लक्षात न घेताच लँपशेड घरी घेऊन येतो. असं होऊ नये यासाठी सजावटीची थीम आणि रूमच्या साइजचा विचार करून मगच लँंपशेडची निवड करा.

कृत्रिम कलात्मक फुलांचा वापर
खरी फुलं कोमेजून जातात म्हणून काही व्यक्ती घराच्या सजावटी करिता कृत्रिम कलात्मक फुलांचा वापर करतात. परंतु अशा प्रकारची फुलं हॉलिडे होम्स किंवा बीच हाऊसेसमध्येच शोभून दिसतात. यांचा घरी वापर केल्यास घरात सलूनसारखा अनुभव येतो. तेव्हा तुम्हाला फुलांची आवड आहे, तर थोडे पैसे खर्च करण्याची तयारी ठेवून खरोखरच्या फुलांनीच घराची सजावट करा.

चुकीच्या साइजचा गालिचा वापरणं
नक्षीदार गालिचामुळे घराला सुंदर आणि श्रीमंत असा थाट येतो. परंतु लहान घरात मोठा गालिचा वापरल्यास खोली अजून लहान दिसू शकते. तेव्हा बसण्याच्या जागेचा अंदाज घेऊन योग्य साइजच्या गालिचा (कार्पेट)ची निवड करावी. बसण्याच्या जागेव्यतिरिक्त इतर जागा मोकळी राहिली तर खोली मोकळी आणि मोठीही दिसते.
बघा, अगदी साध्या आणि सहज घडून येणार्‍या चुका आहेत. शिवाय विनाकयास दुरुस्त करता येण्याजोग्याही आहेत. मग गृहसजावटीच्या वेळेस लक्षात राहतील ना?