उन्हाळ्यात गारवा देणारी सजावट (Decor Ideas To K...
उन्हाळ्यात गारवा देणारी सजावट (Decor Ideas To Keep Your Home Cool In Summer)


उन्हाळा सुरू होताच घामाच्या धारा वाहू लागतात. सुरुवातीलाच अंगाची अशी लाही-लाही झाली, तर पुढे काय होईल? असा प्रश्न सतावू लागतो. घराच्या सावलीतही उन्हाचा त्रास होतोच. थंडाव्यासाठी सर्वांनाच घरात एसी लावणं शक्य नसतं, मात्र घराच्या रचनेत काही फेरफार करून गारवा मिळू शकतो.
घरामध्ये काही कालावधीनंतर नवीन बदल करायची इच्छा होते; पण प्रत्येक वेळी इंटिरीयर डिझायनर आणि त्या पुढचा महागडा खर्च करणं शक्य नसतं. मात्र, आपण स्वतः कमी पैशांत घराचा कायापालट करू शकतो.

सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने घरातदेखील उष्णता फार वाढलेली असते. घरातील वातावरण अधिक शुद्ध आणि थंड राहण्याच्या दृष्टीने काही सोपे उपाय केल्यास तुम्हाला थंडावाही मिळेल आणि घराला नवीन लूकही येईल.
= घरातील खिडकीवर बाहेरच्या बाजूने जाड कापड पाण्याने ओलं करून लावा. यामुळे घरात थंडावा राहण्यास मदत होते.
= दिवसभरात कमीत-कमी 1 तास तरी पंखे बंद ठेवा. ते सतत सुरू ठेवल्याने तापतात आणि गरम झाल्यामुळे त्याची हवाही गरमच लागते.

= रात्रीच्या वेळी काही प्रमाणात हवा थंड असते. यामुळे रात्रभर सगळ्या खिडक्या सताड उघड्या ठेवा आणि सकाळी सूर्योदयापूर्वी बंद करा. यामुळे काही प्रमाणात तरी घरात थंडावा राहील.
= या दिवसांत सर्वांचाच थंड पाणी पिण्याकडे अधिक कल असतो.
यासाठी फ्रीजमधील पाणी पिण्यास प्राधान्य दिलं जातं. मात्र हे पाणी आरोग्यासाठी चांगलं नसतं. यापेक्षा मातीच्या माठात पिण्याचं पाणी भरून ठेवल्यास, थंडगार पाणी मिळेल.
यात माठाला स्वच्छ ओला कपडा गुंडाळून ठेवल्यास, अधिक गार पाणी मिळेल.
= घरातील वातावरण थंड राहण्याच्या दृष्टीने घराच्या आजूबाजूला, तसंच बाल्कनी-खिडकीत काही फुलांच्या कुंड्या, वेली चढवल्यास घरातील वातावरण आल्हाददायक राहतं. ठरावीक काळाने या कुंडीतील झाडं बदला. तसंच कुंडीची जागाही बदलून खोलीचा लूक बदलता येऊ शकतो.

= खिडक्यांना पडदे लावा. सध्या ब्लेन्स, म्हणजेच प्लास्टिकच्या पट्ट्यांचे पडदे लावण्याची फॅशन आहे. यामुळे उजेड तर आत येतोच, शिवाय सूर्यकिरणांपासून घराचं संरक्षणही होतं. तसंच बाजारात पांढरे नेटचे पडदे उपलब्ध आहेत. हे पडदे घराची शोभा वाढवतात आणि उन्हापासून संरक्षणही करतात. असे महागडे पडदे वापरायचे नसतील, तर साधारण पिवळा, हिरवा, निळा अशा फिकट रंगांचे पडदे लावा. गडद रंगांचे पडदे लावू नये, यामुळे उष्णता शोषून घेतली जाते.
= पडद्यांमध्ये सध्या विविध प्रकार बाजारात आले आहेत. यामध्ये बांबूपासून बनवलेले, वाळ्याचे पडदे, कापडी असे प्रकार पाहायला मिळतात. आपल्या बजेटनुसार आणि संबंधित खोलीच्या रंगाला शोभतील अशा पडद्यांची निवड करा.

= सोफा कव्हर्स, कुशन कव्हर्स अगदी बेडवर घालायच्या बेडशिट्सचा सेटही फिक्या रंगाचा आणि
कॉटनचा असावा, यामुळे घाम येत नाही.
= तुमच्याकडे वापरात नसलेली एखादी सुती
साडी असेल, तर तिचाही उपयोग करता येईल. त्या साडीपासून उशांचे अभ्रे किंवा खिडक्यांचे पडदे, टेबल मॅट शिवता येतील. उन्हाळ्यात खास करून फिकट रंगांचे अभ्रे, सोफ्याचे कव्हर, पडदे यामध्ये आलेले विविध प्रकार वापरता येतील.

= खोलीतील रंगसंगती खास उन्हाळ्यात बदलायची असल्यास, पॅरट ग्रीन-व्हाईट, बेबी पिंक-व्हाईट, ऑफ व्हाईट असे कलर कॉम्बिनेशन करून भिंती रंगवल्यास घराला वेगळेपण येतं. याशिवाय झटपट बदल करायचे असल्यास वॉलपेपर, ही संकल्पना ट्राय करता येईल.
= दिवाणखान्यात मोठं कार्पेट असल्यास तात्पुरतं काढून तिथे पांढर्या किंवा फिकट रंगांची शोभेची
कार्पेट घाला.
= गरजेनुसार दरवाजातील मॅट, बेडशीट्स हेदेखील यलो-व्हाईट, क्रीम, व्हाईट-पिंक, व्हाईट-पॅरट ग्रीन, आकाशी अशा रंगसंगतीची निवडा.

= घरामध्ये सूर्यप्रकाश भरपूर येत असल्यास त्याचा योग्य वापर करून घरात सोलर लॅम्प्स बसवू शकता.
= घरातील प्रकाश योजना, आसनव्यवस्था यांची रचना गृहसजावटीत महत्त्वाची असते. घराला नवेपण देण्यात लाइटिंग महत्त्वाचा भाग ठरू शकते. लायटिंग, फर्निचर आणि इतर सामानाची योग्य आकर्षक पद्धतीने रचना केली, तर विनाखर्चात तुम्ही घर सुंदर बनवू शकता.