देबिना बॅनर्जी आणि गुरमीत चौधरीला पुन्हा झाले क...

देबिना बॅनर्जी आणि गुरमीत चौधरीला पुन्हा झाले कन्यारत्न (Debina Bannerjee and Gurmeet Choudhary become parents again, welcome a baby girl)

टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध जोडपे देबिना बॅनर्जी आणि गुरमीत चौधरी यांच्याशी संबंधित एक आनंदाची बातमी समोर आली आहे. गुरमीत आणि देबिना पुन्हा एकदा आई-बाबा झाले आहेत. आज सकाळी त्यांनी आपल्या दुसऱ्या मुलीचे या जगात स्वागत केले. गुरमीत आणि देबिनाने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी सांगितली. निर्धारित तारखेपूर्वीच बाळाचा जन्म झाल्याचेही सांगितले आहे.

सोशल मीडियावर पुन्हा आई-वडील झाल्याचा आनंद शेअर करताना गुरमीत आणि देबिना खूपच उत्साहित दिसत होते. यासोबतच त्यांनी चाहत्यांना आपल्या गोपनीयतेचा आदर करावा असे आवाहनही केले आहे.

गुरमीत आणि देबिना यांनी एक अतिशय सुंदर ब्लॅक अॅण्ड व्हाइट फोटो शेअर करत ही बातमी दिली, कॅप्शनमध्ये लिहिले की “आमच्या मुलीचे या जगात स्वागत आहे. आम्‍ही पुन्‍हा आई बाबा झाल्‍याचा खूप आनंद होत आहे, तसेच आम्‍ही लोकांकडून गोपनीयतेची अपेक्षा करत आहोत, कारण आमच्‍या बाळाचा जन्म तारखेपूर्वी झाला आहे. तुमच्या प्रेमाचा आणि आशीर्वादांचा वर्षाव करत राहा.” गुरमीत देबिनाच्या या पोस्टवर चाहत्यांसोबतच सेलिब्रेटीसुद्धा शुभेच्छा देत आहेत.

लग्नाच्या 11 वर्षांनंतर गुरमीत आणि देबिनाने मुलगी लियानाला जन्म दिला. त्या गर्भधारणेसाठी त्यांनी आयव्हीएफचा वापर केला होता. पहिल्या मुलीच्या जन्मानंतर देबिना पुन्हा लगेचच गरोदर राहिल्यामुळे त्यांना ट्रोल करण्यात येत होते. पण देबिना आपल्या दुसऱ्या प्रेग्नेंसीबद्दलही खूप उत्साहित होती.गरोदरपणात देबिना स्वतःची खूप काळजी घेत होती आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून वेळोवेळी चाहत्यांशी आपला गरोदरपणाचा अनुभव शेअर करत होती.