विराट-अनुष्काच्या मुलीला धमकीचे प्रकरण : दिल्ली...

विराट-अनुष्काच्या मुलीला धमकीचे प्रकरण : दिल्ली महिला आयोगाची कणखर भूमिका (DCW Seeks Delhi Police Report Over Rape Threats To Anushka-Virat’s Daughter)

टी-20 विश्वचषकात पाकिस्तान आणि त्यानंतर न्यूझीलंडकडून लागोपाठ झालेल्या पराभवाने क्रिकेट चाहत्यांची निराशा झाली आहे. खेळात हार-जित होणारच असा विचार न करता काही लोक या खेळाला वेगळ्या दिशेने घेऊन जात आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे खेळातील हार सहन न झालेल्या कोणी माथेफिरूंनी विराट-अनुष्काच्या चिमुरडीला बलात्काराची धमकी दिली आहे आणि या प्रकरणाची दखल घेत दिल्ली महिला आयोगाने पोलिसांना आतापर्यंत कोण आणि किती जणांना पकडले? असे खडसावून विचारले आहे.

दिल्ली महिला आयोगाच्या प्रमुख स्वाती मालीवाल यांनी सांगितले की, विराट-अनुष्काच्या अवघ्या १० महिन्यांच्या मुलीवर बलात्कार करण्याची धमकी देणारे ट्विट करण्यात आल्याचे त्यांच्या माहितीत आले आहे. त्यांनी याची गंभीरपणे दखल घेत, आयुक्तांना या प्रकरणाची दखल घेण्यास सांगून त्यावर कठोर कारवाई करण्याची विनंती केली आहे.

त्याचं झालं असं की, पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर काही लोक मोहम्मद शमीला ट्रोल करत होते आणि विराटने शमीचे समर्थन करताना म्हटले होते की, धर्माच्या आधारावर अशी चर्चा आणि भेदभाव करणे लज्जास्पद आहे, तो पूर्णपणे शमीच्या पाठीशी आहे. यानंतरच विराटला ट्रोल केले जाऊ लागले आणि त्याच्या मुलीबाबत अशा गोष्टी सांगितल्या जाऊ लागल्या. दिल्ली येथील महिला आयोगाने सदर प्रकरणाबाबत पोलिसांना विचारले आहे की, या प्रकरणात आतापर्यंत कोणाला अटक झाली आहे का? त्यांना आठ नोव्हेंबरपर्यंत या प्रकरणाचा सविस्तर अहवाल हवा आहे!