मालिकांची धाडसी कर्णधार (Daredevil Producer Of ...

मालिकांची धाडसी कर्णधार (Daredevil Producer Of Marathi T.V. Serial)

एकाच वेळी तीन मालिका चालू असलेल्या निर्मितीसंस्थेची ती निर्माती आहे. निर्माता हा सर्व विभागाचा प्रमुख असतो. कर्णधाराच्या भूमिकेत मराठी तरुणीची भरारी लक्षणीय आहे.
सध्या सर्वाधिक चर्चेत असलेली मालिका म्हणजे ‘माझ्या नवर्‍याची बायको’. विवाहबाह्य संबंध ठेवणार्‍या एका तरुण नवर्‍याची होणारी फटफजिती, तो बायकोवर करत असलेली कुरघोडी या गोष्टी प्रेक्षक फारच एन्जॉय करीत आहेत. या मालिकेचे दोन निर्माते आहेत. तेजेन्द्र नेसवणकर आणि सुवर्णा रसिक राणे. ‘ट्रम्प कार्ड प्रॉडक्शन्स्’ असं त्यांच्या निर्मितीसंस्थेचं नाव असून ‘डॉक्टर डॉन’ ही मजेदार मालिकादेखील त्यांचीच निर्मिती आहे. याशिवाय ‘मोलकरीणबाई’ ही मालिकादेखील त्यांचीच निर्मिती आहे.
बर्‍याच सिनेमांच्या नामावळीत निर्माती म्हणून महिलांची नावं असतात, पण त्या नामधारी असतात. खरा व्यवहार त्यांचे पती सांभाळतात. मात्र सुवर्णा रसिक राणे, हे नाव ह्याला अपवाद आहे. ही महिला निर्माती या नात्याने निर्मितीच्या प्रत्येक विभागामध्ये जातीनं लक्ष घालते. अन् दररोज आपल्या मालिकांच्या सेटवर जातीनं उभी राहून चित्रीकरण ते मालिकेचा भाग टी.व्ही. चॅनलवर प्रक्षेपित होई पर्यंतच्या प्रक्रियेत डोळ्यात तेल लावून लक्ष ठेवते.

अथक कार्य
दिवसाच्या बारा तासांपेक्षा अधिक तास ती अथकपणे, त्रागा न करता निर्मितीच्या जबाबदार्‍या सांभाळते. याशिवाय पैशांची तजवीज ही मोठी जबाबदारी मालिकेच्या निर्मात्याकडे असते. पैशांशिवाय पान हलत नाही, असा हा उद्योग आहे. याही कामात सुवर्णा आपली सूत्रं व्यवस्थित हलविते.
मालिका किंवा सिनेमाचा निर्माता हा सतत तणावाखाली असतो. आर्थिक बाजू, नटमंडळींचे नखरे, तंत्रज्ञांचे अहंकार सांभाळायचे असतात. अशा कामात आपलं करिअर यशस्वीपणे घडविणार्‍या सुवर्णाचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. पडद्यामागे राहून तारेवरची कसरत करायला मोठं धाडस आणि कर्तबगारी लागते. जी सुवर्णामध्ये ओतप्रोत भरलेली आहे. अर्थात हा यशाचा कळस तिनं टप्प्या टप्प्यानं गाठला आहे.

आव्हानात्मक काम
आजचे आघाडीचे मालिका निर्माते विद्याधर पाठारे यांच्या ‘झोका’ या मालिकेपासून प्रॉडक्शन असिस्टंट म्हणून सुवर्णानं आपली कारकीर्द सुरू केली. अन् मग पुढील सर्व मालिकांमध्ये पडद्यामागच्या सर्व डिपार्टमेन्टमध्ये लक्ष घालून त्यातील बारकावे शिकून घेतले. अगदी बारीकसारीक कामं करण्यात तिनं कमीपणा न वाटू देता, ती केली. ‘झोका’ नंतर तिनं अंकुर, प्रपंच, जाऊबाई जोरात, झोका, वादळवाट, फॅमिली नं.1 (हिंदी) अशा अनेक मालिकांसाठी स्टील फोटोग्राफर, असिस्टंट डायरेक्टर, चीफ असिस्टंट, आर्ट डायरेक्टर, डायरेक्टर, एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर आणि शेड्युलिंग इनचार्ज म्हणून कामं केली. यामध्ये नटमंडळींचं शेड्युलिंग अर्थात त्यांना चित्रीकरणाच्या तारखा देणं, त्या पाळायला लावणं, वेळ देणं, ती बदलणं आणि वेळा पाळायला लावणं, हे काम अलीकडे फार जिकिरीचं झालेलं आहे. कारण दररोज शुटिंग असतं. कलाकार इकडे-तिकडे बिझी असतात. बाहेरगावी परदेशी असतात. अशा परिस्थितीत त्यांना वेळच्या वेळी चित्रीकरणास हजर करणं किंवा चित्रीकरण न थांबू देता, पर्यायी व्यवस्था करणं, ही शेड्युलिंगची महत्त्वाची जबाबदारी असते.
या संदर्भात सुवर्णा म्हणते,“आपल्याकडे आर्टिस्टची डेट नसताना ती मिळविणं, त्यांच्या डेटस् डोक्यात ठेवणं; अन् त्यानुसार त्यांना आणणं, हे काम आता मला सरावाचं झालं आहे. त्यामुळेच ‘माझ्या नवर्‍याची बायको’ चे शेड्युलिंग मी स्वतःच करते आहे.” या विभागाइतकंच एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणून काम करणंही आव्हानात्मक आहे, असं सांगून सुवर्णानं समाधानानं सांगितलं की, अनेक आव्हानं मी पेलली आहेत. ‘वादळवाट’ या गाजलेल्या मालिकेची इपी म्हणून सुवर्णानं 500 भाग केले आहेत.

मोलाची साथ
मालिका क्षेत्रात एवढा लांब प्रवास केल्यानंतर स्वतः निर्माती कशी झाली, यावर सुवर्णा म्हणते, “मी आणि पार्टनर तेजेंद्र नेसवणकर यांनी एक दिवशी विचार केला की, आपण आत्तापर्यंत लोकांसाठी काम करत आलो. आता स्वतःसाठी काम करूयात. त्यातून आमची निर्मितीसंस्था जन्मास आली. निर्मात्याची व त्या आधीच्या सर्व कामात मला माझे पती रसिक राणे तसेच माझे सासू-सासरे यांची मोलाची साथ लाभली. रसिक हे नाट्यक्षेत्रात सेट डिझायनर, प्रकाश योजनाकार म्हणून काम करतात. त्यांना या क्षेत्राची चांगली माहिती आहे. त्यांचं मोठं पाठबळ मला आहे. म्हणूनच जिथं कमी तिथं आम्ही, या न्यायाने मी निर्मितीचं शिवधनुष्य लीलया पेलते आहे. ”
मालिका किंवा सिनेक्षेत्रात येणार्‍या तरुण मुलींना पडद्यावर चमकण्याचं आकर्षण असतं. परंतु पडद्यामागे देखील मोठं करिअर आहे नि त्यात कीर्ती, पैसा मिळविता येतं, हे सुवर्णानं सिद्ध केलं आहे.
– रमेश मेश्राम