भेडिया चित्रपटाच्या अपयशामुळे वरुण धवनचे करीअर ...

भेडिया चित्रपटाच्या अपयशामुळे वरुण धवनचे करीअर धोक्यात, या चित्रपटातून दाखवला बाहेरचा रस्ता (Danger Bells for Varun Dhawan’s Career, He Has Been Thrown out of These Films After Failure of ‘Bhediya’)

बॉलिवूडचा प्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीची शानदार सुरुवात करणाऱ्या वरुण धवनसाठी ‘भेडिया’ हा चित्रपट धोक्याची घंटा ठरला आहे. ‘भेडिया’ चित्रपटाच्या अपयशानंतर वरुण धवनचे करीअर खूप अडचणीत आले आहे. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाच्या अपयशानंतर ‘भेडिया’चे निर्माते दिनेश विजन यांनी वरुणला आपल्या आगामी ‘इक्किस’ चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. एवढेच नाही तर याशिवाय अनेक चित्रपट वरुणच्या हातातून निसटताना दिसत आहेत.

वरुण धवनला लॉन्च करणाऱ्या करण जोहरच्या कंपनीचा ‘मिस्टर लेले’ चित्रपट बंद झाला आहे, त्यात वरुणला कास्ट करण्यात आले होते. यासोबतच त्यांच्या ‘शुद्धी’ या आणखी एका चित्रपटाचा ठावठिकाणा नाही. ‘जुग-जुग जियो’ हा चित्रपट वरुणसाठी चांगला चित्रपट ठरला, पण ‘भेडिया’ हा चित्रपट त्याच्या करीअरमध्ये अडथळा आणणारा ठरला आहे.

‘भेडिया’ चित्रपटाच्या अपयशानंतर या चित्रपटाच्या निर्मात्याने आपल्या आगामी ‘इक्किस’ चित्रपटातून वरुणला बाहेरचा रस्ता दाखवला. ‘स्त्री 2’ या चित्रपटासाठी वरुण धवनचे नाव समोर येत होते, मात्र या चित्रपटाच्या अपयशानंतर ते प्रकरणही शांत झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार वरुणला ‘इक्किस’ चित्रपटातून वगळून त्याच्या जागी अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदाला घेण्यात आले आहे.

‘इक्किस’ चित्रपटाची कथा परमवीर चक्र विजेते सेकंड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल यांच्या जीवनावर आधारित आहे, दिनेश व्हिजन या चित्रपटाची निर्मिती करत आहेत, तर श्रीराम राघवन या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. वरुण धवनने ‘बदलापूर’ चित्रपटात श्रीराम राघवनसोबत काम केले होते, त्यामुळे दोघेही पुन्हा एकदा एकत्र काम करण्यासाठी खूप उत्सुक होते, पण आता चित्रपटात वरुणच्या जागी अगस्त्य नंदाला घेण्यात आले आहे.

इतकेच नाही तर वरुण धवन करण जोहरच्या ‘मिस्टर लेले’ आणि ‘शुद्धी’ सारख्या चित्रपटांमध्येही काम करणार होता, ज्याची घोषणा फार पूर्वीच झाली होती, मात्र ‘भेडिया’ या चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवरचा परफॉर्मन्स पाहून हे दोन्ही चित्रपट न करण्याचा निर्णय करणने घेतला. चित्रपटांच्या शूटिंगबाबत कोणत्याही प्रकारचे अपडेट समोर आले नाहीत. करण जोहरने ‘मिस्टर लेले’ या चित्रपटाच्या ऐवजी ‘गोविंदा नाम मेरा’ हा चित्रपट बनवल्याचे सांगितले जात आहे, या चित्रपटात वरुणच्या जागी विक्की कौशलने काम केले आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान वरुण धवनने आपल्याला साऊथ चित्रपटांमध्ये काम करण्याची इच्छा असल्याचा खुलासा केला. तसेच त्याला हैदराबाद किंवा चेन्नईमध्ये राहायची इच्छा आहे. मला संधी मिळाल्यास साऊथच्या चित्रपटांमध्ये काम करायला नक्कीच आवडेल, असे तो म्हणाला.