गरीब शेतकर्याची कर्तबगार मुलगी (Daghter Of A Po...

गरीब शेतकर्याची कर्तबगार मुलगी (Daghter Of A Poor Farmer Became Collector)

सोलापूरच्या खेड्यातील एका गरीब शेतकर्‍याची मुलगी ते तामिळनाडूतील सालेम जिल्ह्याची पहिली महिला जिल्हाधिकारी… आयएएस रोहिणी भाजीभाकरे यांचा हा प्रवास स्फूर्तिदायक आहे.
रोहिणी भाजीभाकरे यांचा जन्म सोलापूरमधील उपळाई या लहानशा खेड्यात झाला. त्यांचे वडील रामदास पांडुरंग भाजीभाकरे, हे या गावात दोन एकरपेक्षाही लहान जमिनीत ज्वारीची शेती करत. सोलापूरच्या खेड्यातील एका गरीब शेतकर्‍याची मुलगी ते तामिळनाडूतील सालेम जिल्ह्याची पहिली महिला जिल्हाधिकारी… आयएएस रोहिणी भाजीभाकरे यांचा हा प्रवास स्फूर्तिदायक आहे.

खरं तर, रोहिणी यांच्या आएएस होण्याचं बीज वडिलांच्या याच लहानशा शेतीत रोवलं गेलं. याविषयी रोहिणी सांगतात, “शेती करताना बाबांना जमिनीसंबंधी अनेक अडचणी येत. मात्र या समस्या सोडवण्यासाठी बरेच प्रयत्न करूनही त्यांना कधीच संबंधित अधिकार्‍यांना भेटता येत नव्हतं. बाबा आम्हाला सांगायचे की, शासकीय कार्यालयात कुणीतरी ‘जिल्हा अधिकारी’ म्हणून असतो, जो मनात आणलं तर सारं काही ठीक करू शकतो. म्हणूनच आपल्या कुटुंबातून कुणीतरी आयएएस ऑफिसर व्हावं, असं त्यांना वाटायचं. आपल्या हक्काचं कुणी आयएएस झालं, तर आपल्यासारख्या असंख्य लोकांची खूप मदत होईल, अशी भावना त्यामागे होती.” वडिलांची ही इच्छा पाच भावंडांच्या कुटुंबातील चौथं अपत्य असलेल्या रोहिणी यांनी पूर्ण केली.
कोचिंगशिवाय झाल्या उत्तीर्ण
रोहिणी यांचं शिक्षण शासकीय शाळा-महाविद्यालयातून झालं. शाळेत त्या नेहमीच अव्वल येत. पुढे त्यांनी पुण्यातील शासकीय इंजिनिअरिंग कॉलेजमधून बीई कॉम्प्युटर सायन्स केलं. खरं तर, या शिक्षणाच्या जोरावर त्यांना सहजच चांगल्या पगाराची नोकरी मिळाली असती, मात्र त्यांना वडिलांचं स्वप्न खुणावत होतं. कोणतंही पदवी शिक्षण घेऊन त्यांना स्पर्धात्मक परीक्षा देता आली असती, मात्र एक बॅक-अप प्लान म्हणून त्यांनी कॉम्प्युटर सायन्स केलं. अर्थातच, त्यानंतर नोकरी न स्वीकारता त्यांनी स्पर्धात्मक परीक्षेची (युपीएससी) तयारी सुरू केली. विशेष म्हणजे, यासाठी त्यांनी कोणत्याही कोचिंग क्लासची मदत घेतली नाही. आणि असं असूनही त्या पहिल्याच प्रयत्नात स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाल्या.
परीक्षेत यश मिळवल्यानंतर त्यांचं प्रशिक्षण सुरू झालं. या दरम्यान बाबांनी दिलेला मोलाचा सल्ला त्या अजूनही विसरलेल्या नाहीत. त्या सांगतात, “आयएएससाठी प्रशिक्षण सुरू होतं, तेव्हा बाबा मला म्हणाले होते, आता तुझ्या टेबलावर बर्‍याच फाईल्स येतील. त्या फाईल्सकडे केवळ कागद म्हणून पाहू नकोस. तुझ्या एका स्वाक्षरीने एक तर लाखो लोकांचं भलं होईल किंवा त्यांचं आयुष्य अधिकाधिक कठीण होईल, हे सदैव ध्यानात ठेव. लोकांसाठी काय चांगलं आहे, याचा नेहमीच विचार कर आणि त्या दृष्टीनेच कार्य कर. देशाची सेवा करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे आयएएस ऑफिसर होणं, हे तर बाबा लहानपणापासून सांगत होते.” रोहिणी यांचं कामकाज पाहता त्यांनी बाबांचा हा सल्ला किती गंभीरतेने घेतला आहे, याची प्रचिती येते.

भाषेची आगळीच समस्या
प्रशिक्षणानंतर रोहिणी यांची पहिली नियुक्ती साहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून तामिळनाडूच्या सालेम जिल्ह्यातील मदुराईमध्ये झाली. एक तर रोहिणी यांची या प्रशासकीय सेवेबाबत खूप स्वप्नं-आशाआकांक्षा होत्या, त्यात पहिली नियुक्ती, तीही तामिळनाडूमध्ये. तिथे इतर अनेक समस्येसोबतच एक आगळीच, मात्र मोठी समस्या होती. याविषयी रोहिणी सांगतात, “तामिळनाडूमध्ये केवळ इंग्रजी किंवा हिंदी भाषा येऊन चालत नाही. तिथे कार्यभार सांभाळायचा म्हणजे तमिळ भाषा यायलाच हवी. तिथे कार्यभार सांभाळला तेव्हा मुख्य आव्हान हेच होतं. तमिळ भाषा आत्मसात करायला मला पाच ते सहा महिन्यांचा अवधी लागला. तोपर्यंत लोकांच्या समस्या समजून घेणं फार कठीण होत होतं. पण भाषा कळू लागली आणि लोकांशी संवाद साधणं सोपं झालं. त्यांच्या समस्या समजून घेणं, त्या दृष्टीने उपाययोजना करणं शक्य झालं.” आपलं कर्तव्य पार पाडण्यासाठी सारे प्रयत्न करण्याची त्यांची ही निष्ठा नक्की वाखाणण्याजोगी आहे.
2008 साली स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या रोहिणी यांची नियुक्ती पुढे तिरूमेलवेलीच्या उप-जिल्हाधिकारी या पदावर झाली. याच दरम्यान त्यांची ओळख आयपीएस अधिकारी विजयेंद्र बिदारी यांच्याशी झाली. ओळखीचं रूपांतर मैत्रीत आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. पुढे त्या दोघांनी लग्न केलं. त्यांना आता एक मुलगा आहे. आपल्या पतीविषयी रोहिणी सांगतात, “मी आयएएस आहे आणि विजयेंद्र आयपीएस अधिकारी. मात्र घरी आम्ही सामान्य दाम्पत्य असतो. घरातील सर्व कामं एकमेकांच्या सहकार्याने करतो. विजयेंद्रसोबत मी कामकाजाविषयी चर्चा करतेच, मात्र ते मला घरच्या कामांमध्येही मदत करतात. घरी यायला उशीर झाला, तरी तक्रार करत नाहीत. कामानिमित्त बाहेरगावी जावं लागलं, तर मुलाचा सांभाळ करतात. आम्हा दोघांना एकमेकांच्या कार्याची जाणीव आहे. त्यामुळे आम्ही ते समजून घेण्याचा प्रयत्न करतो. एकमेकांच्या कार्याचा आदर करतो.” आधी वडील आणि आता पती यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे, सहकार्यामुळेच हे यश शक्य झालं, हे सांगायला त्या विसरत नाहीत.

सालेमच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी
बाळंतपणाच्या रजेनंतर रोहिणी तिरुनेल्वेलीमधील चरणमहादेवी इथे उप-जिल्हाधिकारी पदावर रुजू झाल्या. काही काळानंतर मदुराईमध्ये साहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून परतल्या. या कार्यकाळात त्यांच्या पाणलोट क्षेत्राचा विकास आणि स्वच्छता कार्यासंदर्भात केलेल्या कार्याचं बरंच कौतुक झालं होतं.
ऑगस्ट 2017मध्ये सालेमच्या जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला. 1790 सालानंतर सालेममध्ये 170 जिल्हाधिकारी होऊन गेले, मात्र 32 वर्षीय रोहिणी भाजीभाकरे यांना सालेमच्या इतिहासातील पहिल्या महिला जिल्हाधिकारी होण्याचा मान मिळाला आहे.
जिल्हाधिकारी होताच रोहिणी यांनी या क्षेत्रामध्ये अनेक बदल घडवून आणले. अचानक रुग्णालयात जाऊन रुग्णांची विचारपूस करणं, व्हाट्सअ‍ॅपच्या माध्यमातून सतत अधिकार्‍यांच्या संपर्कात राहणं, शाळेतील विद्यार्थ्यांशी बोलण्यापासून लोकांच्या तक्रारी ऐकून घेण्यापर्यंत बरंच काही स्वतः ग्रामीण भागामध्ये प्रत्यक्ष भेटी देऊन करतात. प्लॅस्टिक-फ्री सालेमच्या दिशेने एक पाऊल उचलत त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात प्लॅस्टिक आणि पॉलिथिनवर बंदी आणली आहे.

लोकहित हेच ध्येय
सालेम जिल्ह्यात स्वच्छ मोहिमेअंतर्गत त्यांनी गावकर्‍यांच्या सहकार्यातून गावातील खेड्यापाड्यात शौचालयं बांधली. यासंदर्भात जनजागृती केली, लोकांची मानसिकता बदलण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या प्रयत्नांमुळे सालेम हा जिल्हा राज्यातील पहिला हागणदारीमुक्त जिल्हा बनला आहे. जिल्हाधिकारी पदाची सारी कर्तव्य पार पाडत त्यांनी ही कर्तबगारी दाखवली आहे. याविषयी त्या म्हणतात, “गरीब शेतकर्‍याची मुलगी म्हणून किंवा शासकीय शाळा-कॉलेजमधील एक विद्यार्थिनी म्हणून, मला ज्या अडचणी आल्या, जे अनुभव आले, त्यांना आधार मानून मी हे कार्य करत आहे.” आपल्या अनुभवांच्या आधारे इतरांचं आयुष्य सुलभ व्हावं, म्हणून त्या कार्यरत आहेत.
अनेक पारितोषिकांनी सन्मानित
रोहिणी यांच्या या कार्याचा वेळोवेळी सन्मान झाला आहे. 2016मध्ये मदुराईमध्ये पाटबंधारे क्षेत्रात केलेल्या महत्त्वपूर्ण कार्याबाबत रोहिणी यांचा क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला होता. तसंच महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल ‘मनरेगा’ या राष्ट्रीय पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. तसंच ‘स्वच्छ भारत अभियान’अंतर्गत केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना ‘स्वच्छता चॅम्पियन्स’ या पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं आहे. शिवाय ‘द बेटर इंडिया’ या वेबसाइटने संपूर्ण भारतातून प्रशासकीय क्षेत्रातील ज्या अधिकार्‍यांनी देशाच्या हितासाठी आणि जनतेच्या भल्यासाठी नावीन्यपूर्ण व वेगळे उपक्रम राबवून वर्षभरात सर्वोत्कृष्ट कामगिरी केली, अशा अधिकार्‍यांच्या कामाचा आढावा घेऊन, त्यातून सर्वोत्कृष्ट दहा आयएएस अधिकार्‍यांची निवड केली. त्यातही रोहिणी भाजीभाकरे-बिदारी यांचा समावेश आहे.
– माझी सहेली टीम

बीजमाता राहीबाई पोपेरे (Padmashri Rahibai: Mother Of Desi Seeds)