आलिया-रणबीरच्या छोट्याशा परीला पाहण्यासाठी हॉस्...

आलिया-रणबीरच्या छोट्याशा परीला पाहण्यासाठी हॉस्पिटलला पोहोचल्या दोन्ही आजी, सोशल मीडियावर व्यक्त केला आनंद (Dadi-Nani Reach Hospital To Meet Alia Bhatt-Ranbir Kapoor Baby Girl, Both Grand Mothers Share the Happy News On Social Media)

आलिया-रणबीरच्या छोट्या परीला भेटण्यासाठी दोन्ही आजी हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या अन्‌ त्यांनी सोशल मीडियावर आपला आनंद व्यक्त केला आहे.

सोशल मीडियावर सगळीकडे आलिया आणि रणबीरचे कौतुक केले जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून आलिया रणबीरच्या गोड बातमीने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले होते. आलिया आता एका मुलीची आई झाली आहे. तिची ही गोड बातमी व्हायरल झाल्यापासून दोन्ही सेलिब्रेटींवर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. बाळाच्या जन्मानंतर कपूर आणि भट्ट कुटुंबात तर जल्लोषाचे वातावरण आहे. दोन्ही कुटुंबातील सर्वजण आनंदून गेले आहेत. दोन्ही कुटुंबे अनेक महिन्यांपासून या छोट्या पाहुण्याची आतुरतेने वाट पाहत होती, त्यामुळे आनंदाने नाचणे निश्चित आहे.

आलिया भट्टची प्रसूती एचएन रिलायन्स रुग्णालयात झाली. प्रसूतीच्या वेळी रणबीर तिच्यासोबत हॉस्पिटलमध्येच होता. आलिया भट्टने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून मुलीच्या जन्माची घोषणा केली. तिच्या इन्स्टा स्टोरीवर एक पोस्ट शेअर करत तिने लिहिले, ‘आमच्या आयुष्यातील सर्वोत्तम बातमी. आमचे बाळ जन्माला आले आहे. ती एक मनमोहक मॅजिकल मुलगी आहे. हा आनंद व्यक्त करणे कठीण आहे. आज आम्ही भरभरून प्रेम मिळालेले मातापिता झालो आहोत. खूप खूप प्रेम. आलिया आणि रणबीर”

बाळाच्या आगमनाची बातमी आल्यापासून सोशल मीडियावर आलिया – रणबीरचे अभिनंदन केले जात आहे. बॉलिवूड सेलिब्रिटीही या जोडप्याचे अभिनंदन करत आहेत आणि त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

आलिया भट्टची आई सोनी राजदानच्या आनंदाला सीमा नाही. आजी झाल्यामुळे ती खूप खूश असून नातीला भेटण्यासाठी ती हॉस्पिटलमध्ये पोहोचली आहे. आजी झालेल्या सोनी राजदाननेही सोशल मीडियावर आपला आनंद व्यक्त केला आहे. आलियाची पोस्ट शेअर करत तिने लिहिले की, ‘आजचा दिवस खूप आनंदाचा आहे. इतका अद्‌भूत आशीर्वाद दिल्याबद्दल जीवनाचे आभार. प्रेम आणि शुभेच्छांसाठी तुम्हा सर्वांचे आभार.”

त्याचवेळी आजी नीतू कपूरही आपल्या छोट्या कपूर गर्लला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचली आहेत. आलियाची पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत तिने ‘आशीर्वाद’ असे लिहिले आणि हात जोडून सर्वांचे आभार मानले आहेत.

आजोबा महेश भट्ट यांनी त्यांच्या बाळाच्या जन्मापूर्वीच आपला आनंद व्यक्त केला होता. सकाळीच आलियाला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले तेव्हाच ते म्हणाले होते, ‘नवा सूर्य उगवण्याची वाट पाहत आहे. लवकरच दवाचा एक थेंब माझ्या आयुष्याच्या गवतावर पडणार आहे.’

रणबीरची बहीण आणि आलियाची वहिनी रिद्धिमा कपूर देखील आत्या झाली आहे. ती देखील खूप उत्साहित आहे. यावर प्रतिक्रिया देताना ती म्हणाली, मला खूप आनंद झाला आहे. मी आत्या झाले.”

आलिया भट्ट आणि रणबीरच्या मुलीचा जन्म झाल्यापासून त्यांचे चाहतेही उत्सुक आहेत. सोशल मीडियावर सर्वजण या जोडप्याचे अभिनंदन करत आहेत. बॉलिवूडमधूनही या जोडप्याचे अभिनंदन करण्याचा सिलसिला थांबत नाही.