आशा पारेख यांना फाळके पुरस्कार जाहीर (Dadasaheb...

आशा पारेख यांना फाळके पुरस्कार जाहीर (Dadasaheb Phalke Award To Be Conferred To Veteran Actress Asha Parekh)

ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना २०२० सालचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. भारतीय चित्रपट क्षेत्रात मानाचा सर्वोच्च पुरस्कार अशी ओळख असलेल्या या पुरस्काराची घोषणा माहिती आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी मंगळवारी केली. शुक्रवारी होणाऱ्या ६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्यात ७९ वर्षीय आशा पारेख यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल.

आशा भोसले, हेमा मालिनी, पुनम धिल्लों, उदित नारायण, टी.ए. नागभरण या पाच मान्यवरांच्या समितीने पारेख यांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे.

आशा पारेख फक्त अभिनेत्री नाही, तर शास्त्रीय नृत्यांगनाही आहेत. त्यांनी बालपणापासूनच नृत्य शिकायला सुरुवात केली होती. वयाच्या १०व्या वर्षी माँ या सिनेमात काम केलं होतं. सुरुवातीला काही सिनेमात त्यांनी बाल कलाकार म्हणून काम केलं होतं. नंतर अभ्यासासाठी अभिनय थांबवला.

आशा पारेख १६ वर्षांच्या होत्या तेव्हा ‘गुंज उठी शहनाई’ सिनेमात त्यांना नायिका म्हणून काम हवं होतं. पण तुझ्यात स्टार मटेरियल नाही, म्हणून त्यांना ते नाकारलं गेलं होतं. नंतर नासिर हुसेन यांचा ‘दिल देके देखो’ सिनेमा त्यांनी साइन केला. त्यांचे नायक होते शम्मी कपूर. सिनेमा हिट झाला. आशा पारेख एका रात्रीत स्टार झाल्या. त्यानंतर ९५ पेक्षा जास्त चित्रपटांत त्यांनी काम केले.  ‘दिल देके देखो’, ‘कटी पतंग’, ‘तिसरी मंजिल’, ‘बहारों के सपने’, ‘प्यार का मौसम’ ‘कारवाँ’ अशा अनेक चित्रपटांतील त्यांच्या भूमिका गाजल्या. कृष्ण-धवल चित्रपटांपासून रंगीत चित्रपटापर्यंतचा सुमारे पन्नास वर्षांचा दीर्घकाळ त्यांनी गाजवला.

यापूर्वी आशा पारेख यांना भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. ६०-७० च्या दशकात आशा पारेख या केवळ चित्रपटांमुळेच नाही तर त्यांच्या मानधनामुळेही चर्चेत असायच्या. तेव्हाच्या काळात आशा सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक होत्या.

आशा पारेख आता सिनेमात काम करत नाहीत. मुंबईबाहेर त्यांची नृत्य अकादमी आहे. शिवाय सांताक्रूझ इथे आशा पारेख हॉस्पिटलही आहे. त्या त्यातच लक्ष घालतात.

(फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)