दबंग सलमान खान सरदारजीच्या अवतारात, शेराने देखी...

दबंग सलमान खान सरदारजीच्या अवतारात, शेराने देखील घातली पगडी (Dabang Salman Khan In the Look of Sardar With Bodyguard Shera)

सलमान खानचा अंगरक्षक आहे शेरा. त्याला सलमानची सावली म्हटले जाते. या दोघांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो टाकून सलमानने म्हटलं, लॉयल्टी. (निष्ठा) तर शेराने लिहिलं – मरेपर्यंत मी तुमच्या सोबत राहीन. लव्ह यू मालिक.
या फोटोमध्ये दोघे सरदारजीच्या अवतारात दिसत आहेत. दोघांनीही सरदारजींची पगडी घातली आहे. सलमानच्या ‘अंतिम’ या आगामी चित्रपटातील हे लूक आहे. यामध्ये सलमान एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका करीत आहे.

गेल्या २० वर्षापासून शेरा सलमानच्या संरक्षणात आहे. त्यामुळे तो आता निव्वळ अंगरक्षक राहिला नसून त्याच्या घरातला माणूस झाला आहे. तरीपण शेरा सलमानला मालिक असंच संबोधतो. शेराचे खरे नाव गुरमित सिंह जॉली आहे. त्याच्याशी सलमानची इतकी घट्ट नाळ जुळली आहे की, त्याने आपला ‘बॉडीगार्ड’ हा चित्रपट शेराला अर्पण केला होता.

सलमानला जिथे कुठे जायचं असेल तिथे एक दिवस आधी जाऊन शेरा पाहणी करून येतो. त्यासाठी कैक वेळा तो पाच किलोमीटर पायी चालला आहे. शेरा हा काही साधा बॉडीगार्ड नाही. त्याची स्वतःची सुरक्षा रक्षकांची कंपनी आहे. त्याचं नाव त्याने टायगर असे ठेवले असून बॉलिवूडच्या कित्येक सिताऱ्यांना तो कंपनीमार्फत सुरक्षा पुरवतो. सलमानचा अंगरक्षक होण्याआधी शेरा हॉलिवूड सिताऱ्यांची सुरक्षा करीत असे.

सलमान खानचा ‘राधे’ हा नवा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होईल. स्वतः सलमानने इन्स्टाग्राम अकाऊंटवर ही माहिती दिली आहे. हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. सलमानच्या चाहत्यांना ही मोठी पर्वणी वाटते आहे.