सृजनशील संगीतकार, सुप्रसिद्ध गायक पं. हृदयनाथ म...

सृजनशील संगीतकार, सुप्रसिद्ध गायक पं. हृदयनाथ मंगेशकर यांचे ८५ व्या वर्षात पदार्पण (Creative Music Composer And Singer Pandit Hridaynath Mangeshkar Turns 85 Today)

सुप्रसिद्ध गायक आणि सृजनशील संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर, आज २६ ऑक्टोबर रोजी वयाच्या ८५ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. गेल्या अनेक दशकांपासून मराठी भावगीत, नाट्यसंगीत व मराठी-हिंदी चित्रपटांमधून पंडितजींच्या रचना संगीत शौकिनांना रिझवित आहेत.

महान शास्त्रीय संगीत गायक आमीर खाँसाहेबांचे शागिर्द असलेल्या हृदयनाथांनी लहान वयातच संगीत साधना सुरू केली. गायक म्हणून त्यांनी गायलेली गेले ते दिन गेले, लाजून पाहणे अन्‌ पाहून लाजणे, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भिती ; अशी त्यांची अनेक गाणी-भावगीते संगीत शौकिनांनी पसंत केलीत.

संगीतकार या नात्याने पंडितजींनी अनवट चालींच्या रचना बांधल्या. जीवलगा राहिले रे दूर घर माझे, ये रे घना, हसायचे कसे, मालवून टाक दीप, मी रात टाकली अशा त्यांच्या रचना कित्येक वर्षांपासून रसिकांच्या मनात रुंजि घालत आहेत.

पंडितजींनी मराठीतील अभिजात कविता संगीतबद्ध केल्या. कुसुमाग्रज, ग्रेस, आरती प्रभू, भा.रा. तांबे, सुरेश भट, शांता शेळके यांच्या कवितांना संगीतबद्ध त्यांनी केले. त्यांची कवितांची निवड विलक्षण आहे. ऊर्दुतील नामवंत शायरांचा व इतिहासाचा त्यांचा गाढा अभ्यास आहे. संत वाङमय हा त्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यातही संत ज्ञानेश्वर माऊलींवर त्यांचा विशेष जीव आहे. माऊलींच्या रचनांचे निरुपण ते अतिशय आपुलकीने करतात.

छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर ही त्यांची दैवते आहेत. त्यांच्यावरील श्रद्धेपोटी शिवकल्याण राजा, ने मजसी ने परत मातृभूमीला या अद्‌भूत संगीत रचना त्यांच्या हातून घडल्या आहेत.

संसार, जैत रे जैत, हा खेळ सावल्यांचा अशा अनेक मराठी चित्रपटांना तसेच मशाल, रुदाली अशा निवडक हिंदी चित्रपटांना त्यांनी संगीत दिले आहे. टेलिव्हिजनवरील संगीत कार्यक्रमांचे परीक्षक म्हणून त्यांनी केलेली कामगिरी परीक्षकांना वस्तुपाठ ठरावी अशी आहे.

या सृजनशील संगीतकाराचे त्यांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन!