मासिक पाळी दरम्यान कोव्हिड प्रतिबंधक लस घेणे सु...

मासिक पाळी दरम्यान कोव्हिड प्रतिबंधक लस घेणे सुरक्षित; तज्ज्ञांचे मत (COVID Vaccine During Periods Is Safe, It Does Not Pose Any Risk To Fertility, Assures Experts)

१ मे २०२१ पासून १८ वर्षांवरील सगळ्या लोकांचं करोना लसीकरण सुरू होतंय. पण त्याआधी गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सअप तसंच अन्य मेसेजिंगच्या अॅपवर मासिक पाळीबाबत अफवा पसरवली जात आहे. मासिक पाळीच्या पाच दिवस आधी आणि पाच दिवस नंतर लस घेऊ नका. कारण मासिक पाळीदरम्यान आपली रोगप्रतिकारक क्षमता कमी झालेली असते. मासिक पाळीदरम्यान लस घेतली तर कोरोना संसर्ग होण्याचा धोका सर्वाधिक आहे. त्यामुळे मासिक पाळी काळात लस घेऊ नका. असा मेसेज सगळीकडे व्हायरल होतोय, ज्यामुळे अनेकजण त्याबाबत प्रश्न विचारू लागलेत. अनेकांचा गोंधळ उडालाय. हा गोंधळ दूर करण्यासाठी तसेच पाळी सुरू असताना लस घ्यायची की नाही, यावर तज्ज्ञ मंडळींचं काय म्हणणं आहे ते जाणून घेऊया.

मासिक पाळीच्या चक्रामध्ये शरीरामध्ये अनेक बदल होतात हे सत्य असले तरीही या कालावधीमध्ये रोगप्रतिकारशक्ती कमी होते, यात कोणतेही तथ्य नाही, असे स्त्रीरोगतज्ज्ञांनी सांगितले आहे. मासिक पाळीमध्ये औषधे घेऊ नयेत वा लस घेऊ नये, असे कुठेही नमूद केलेले नाही. अशा प्रकारच्या व्हायरल मेसेजमध्ये कोणतेही तथ्य नाही, उलट या लसीकरणामुळे करोनापासून संरक्षण मिळण्यास मदत होईल, याकडे या तज्ज्ञ मंडळींनी लक्ष वेधले आहे.

भारत सरकारने देखील सर्व महिलांना अशा फेक बातम्यांवर विश्वास ठेवू नका. कोविड प्रतिबंधक लस ही पूर्णतः सुरक्षित आहे आणि १८ वर्षांवरील सर्व लोकांनी ती जरूर घ्यावी असे सांगितले आहे.

“मासिक पाळीत झालेल्या बदलाचा थेट कोव्हिड-19 शी संबंध लावता येणार नाही. कोरोना संसर्गाचा मासिक पाळीवर परिणाम होतो हे दाखवणारा पुरावा अजूनही उपलब्ध नाही.” असंही सर्व तज्ज्ञ मंडळींनी सांगितलं आहे. त्यामुळे अनेक वैद्यकीय तज्ज्ञांनी मासिक पाळी दरम्यान लस घेण्याने त्रास होतो या गोष्टीचा साफ इन्कार केला आहे.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, ” तुम्ही प्रेग्नेंसी प्लान करत नसाल तर मासिक पाळी दरम्यान वा त्याआधी किंवा नंतर तुम्ही लस घेऊ शकता. मासिक पाळीच्या कारणाने लसीकरण पुढे ढकलण्याची गरज नाही. १८ वर्षांपुढील सर्व महिलांनी लस घ्यायलाच पाहिजे. लशीने तुमच्या शरीराला अपाय होण्याची भीती नाही, तेव्हा तुम्ही जरूर लस घ्या,” असंच त्यांनी सांगितले आहे.