मुंबई मॅरेथॉनचे काऊंटडाऊन सुरू : ५५ हजार पेक्षा...

मुंबई मॅरेथॉनचे काऊंटडाऊन सुरू : ५५ हजार पेक्षा अधिक स्पर्धक धावणार (Countdown Started For ‘Mumbai Marathon’ : Record Break 55,000 Runners Registered For The Road Race)

करोनाच्या प्रादुर्भावामुळे खंड पडलेल्या, यंदाच्या मॅरेथॉन स्पर्धेचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. टाटा मुंबई मॅरेथॉन येत्या १५ जानेवारीला होणार असून त्यामध्ये ५५ हजारांहून अधिक धावपटूंनी नोंदणी केली आहे. व्यावसायिक व हौशी धावपटू या मॅरेथॉनमध्ये रस्त्यावर धावतील. शिवाय जवळपास ५ हजार लोकांनी ॲपवर नोंदणी केली असल्याने त्यांचा आभासी सहभाग असणार आहे.

प्रोकॅम इंटरनॅशनल आयोजित ही मॅरेथॉन टाटा उद्योग समुहाने प्रायोजित केली आहे व टाटा सन्स आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस हे त्याचे भागीदार आहेत. जागतिक ॲथलेटिक्स, भारतीय ॲथलेटिक्स फेडरेशन तसेच केंद्र सरकारचे भारतीय क्रीडा प्राधिकरण आणि महाराष्ट्र सरकारचे क्रीडा मंत्रालय यांच्या सहकार्याने ही महादौड संपन्न होत आहे.

सदर स्पर्धेत विजेत्या पुरुष व स्त्री स्पर्धकाला ५ लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येईल. १०० मीटर धावणे प्रकारातील सर्वात तरुण विश्वविजेता धावपटू, जमैकाचा योहान ब्लेक याची या स्पर्धेच्या आंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड ॲम्बेसेडर म्हणून निवड करण्यात आली आहे. त्याची उपस्थिती तरुणवर्गाला आकृष्ट करील, असा आयोजकांना विश्वास वाटतो आहे. त्याचप्रमाणे माजी आशियाई चॅम्पियन गोपी आणि ४ वेळा विजेती ठरलेली, अर्जुन ॲवॉर्ड विजेती सुधा सिंग यामध्ये सहभागी होणार आहे. या दोघांवर आयोजकांची भिस्त आहे, असे मानले जाते.

सदर स्पर्धेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ज्येष्ठ नागरिक उत्साहाने सहभागी होत आहेत, असे हेल्प एज इंडियाचे प्रकाश बोरगांवकर यांनी सांगितले. त्यांचा उत्साह व प्रतिसाद बघून आम्ही त्यांना सिल्वर यंगस्‌ अशी उपाधी दिली आहे, असे सांगून ९१ वर्षांच्या आजीबाई देखील यामध्ये धावणार आहेत, अशी माहिती बोरगांवकर यांनी दिली.