तुमच्या मुलाला करोना झालाच तर काय कराल? (Corona...

तुमच्या मुलाला करोना झालाच तर काय कराल? (Coronavirus: Now Kids Are At High Risk, What To Do If Your Child Tests Positive)

भारतासह अनेक देशांमध्ये करोनाचा संसर्ग झपाट्याने पसरत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. कोरोना व्हायरसच्या पहिल्या लाटेदरम्यान लहान मुलं किंवा कुमारवयीन मुलांमध्ये कोव्हिड- १९ चं प्रमाण फारसं नव्हतं. पण दुसऱ्या लाटेदरम्यान मात्र १८ वर्षांपर्यंतच्या वयोगटातल्या रुग्णांची संख्या वाढलेली दिसते. अलीकडेच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मागील एका महिन्यात पाच राज्यात एकूण ७९,६८८ मुलांना करोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. संसर्ग झालेल्या मुलांमध्ये २ ते १६ वर्षापर्यंच्या मुलांचा समावेश आहे. त्यामुळेच मोठ्यांप्रमाणे लहान मुलांच्या बाबतीतही करोनासंबंधित सर्व नियमांचे पालन केले जाणे गरजेचे आहे. कोणताही निष्काळजीपणा जिवावर बेतू शकतो.

लहान मुलांमध्ये संसर्ग वाढण्याची कारणं काय?

वैद्यकीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे की – कमजोर रोगप्रतिकारकशक्ती, निष्काळजीपणा ही लहान मुलांमधील संसर्गाची कारणं असू शकतात.

  • या व्यतिरिक्त मुलांचं बाहेर जाऊन खेळणं, एकमेकांत मिसळणं, प्रवास करणं ही कारणंही आहेत. अस्वच्छता तसेच मास्क घालण्यासंबंधीचा निष्काळजीपणा ही कारणं जराही दुर्लक्षित करून चालणार नाहीत.

मुलांमधील करोनाची लक्षणे

मोठ्या व्यक्तींच्या तुलनेत लहान मुलांमध्ये करोनाची सौम्य लक्षणं आढळून आलेली आहेत. कधी कधी मुलांमध्ये मोठ्यांपेक्षा वेगळी लक्षणंही दिसू शकतात. जर तुम्हालाही मुलांमध्ये खाली दिलेल्या लक्षणांपैकी काही आढळून आले, तर सावध व्हा आणि लगेचच वैद्यकिय सल्ला घ्या.

– सर्दी खोकला

– ताप येणं वा थंडी वाजणं

– अंगावर पुरळ उठणं

– डोळे लाल होणं

– अंग वा सांधे दुखणं

– मळमळणं, पोटात दुखणं

– ओठ फाटणं, चेहरा आणि ओठ निळे पडणं

– चिडचिडेपणा

– थकवा, सुस्ती आणि सारखी झोप येणं

– दम लागणं, श्वास घेण्यास त्रास होणं

– घसा खवखवणं

– तोंडाची चव जाणं, वास न येणं

मुलांना करोनाची लागण झाली तर काय करावे?

मोठ्यांच्या तुलनेत लहान मुलं लवकर बरी होतात आणि त्यांना गंभीर आजार होण्याची रिस्कही कमी आहे. म्हणूनच मुलाची करोना चाचणी सकारात्मक आली तर लगेचच त्यास हॉस्पिटलमध्ये नेण्याची घाई करू नका. उलट घरीच त्याची चांगल्या प्रकारे काळजी घेता येऊ शकते. यासाठी –

  • मुलांना विलगीकरणात ठेवा.
  • त्यांची देखभाल करत असलेल्या पालकांनी स्वतःचीही काळजी घ्या.
  • मास्क वापरा. सतत साबण आणि पाण्याने हात स्वच्छ धुवा.
  • मुलांना ज्या खोलीत ठेवलंय, ती खोली सॅनिटाइज करत राहा.
  • मोठ्या मुलांना घरातही मास्क लावायला सांगा.
  • डॉक्टरांच्या संपर्कात राहा.
  • पाच दिवसांपेक्षा अधिक काळ ताप राहिल्यास तसेच श्वास घेण्यास त्रास होत असल्यास लगेच डॉक्टरांकडे घेऊन जा.
  • बहुतांशी मुलं २-३ दिवसात ताप उतरल्यानंतर बरी होत आहेत. तेव्हा जास्त पॅनिक होऊ नका.
  • मुलांकडूनही करोनाचा संसर्ग होऊ शकतो, हे लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे कोणताही निष्काळजीपणा करू नका.