नाकावरच्या रागावर औषध (Control Your Temper)

नाकावरच्या रागावर औषध (Control Your Temper)

रागीट लोक इतरांपेक्षा स्वतःचंच नुकसान जास्त करून घेत असतात. तेव्हा लहानसहान गोष्टींवर तुमचाही पारा चढत असेल, तर राग नियंत्रणात ठेवण्यासाठी हे उपाय जरूर करून पाहा.

राग येणं सामान्य आहे, मात्र हा राग सदान्कदा नाकावर असणं सामान्य नाही. लहानसहान गोष्टींवर रागावणार्‍यांपासून लोक चार हात दूर राहणंच पसंत करतात. कारण त्यांना कधी, कोणत्या गोष्टीवरून राग येईल आणि रागाच्या भरात ते काय बोलतील, काय करतील कशाचीही शाश्‍वती नसते. यामुळे वातावरण बिघडण्याचीच शक्यता जास्त असते. असं असलं तरी, रागीट लोक इतरांपेक्षा स्वतःचंच नुकसान जास्त करून घेत असतात. कसं… आणि ते टाळण्यासाठी रागावर कशा प्रकारे नियंत्रण ठेवता येईल, त्याविषयी-

कसं होतं नुकसान?
–    रागाचा सर्वाधिक फटका आपल्या आरोग्याला पोहोचतो. रागामुळे ताण वाढतो आणि तणावामुळे अनेक आरोग्याविषयी समस्या सुरू होतात.
–    रागामुळे तुमची प्रतिमाही खराब होऊ शकते. रागाच्या भरात तुम्ही काहीही कराल-बोलाल, होत आलेलं कामही बिघडवून टाकाल, अशी भीती लोकांच्या मनात असते. त्यामुळे ते तुमच्यावर विश्‍वास ठेवण्यास कचरतात.
–    रागामुळे आपले प्रियजन, मित्र-मैत्रिणी गमावण्याची पाळी येऊ शकते. रागाच्या भरात बोललेला एखादा अपशब्द प्रियजनांचं मन दुखवू शकतो. त्यामुळे ते दूर होऊ शकतात.
–    रागीट स्वभावामुळे लोक तुमच्यापासून दूर राहू लागले, तर तुमच्यावर एकटे राहण्याची पाळी येऊ शकते.

उपाय
–    रागाच्या भरात पटकन बोलणं, प्रतिक्रिया देणं टाळा. अशा वेळी अविचाराने अपशब्दच तोंडी येण्याची शक्यता अधिक असते. काहीही बोलण्यापूर्वी, हे बोलण्याची आणि तेही आत्ता बोलण्याची खरंच गरज आहे का, हा विचार करा. यामुळे तुम्हाला अनेक चुका टाळता येतील.
–    राग येत असेल, तर मनातल्या मनात दहापासून एकपर्यंत उलट अंक मोजणी करा. यामुळे तुमचं लक्ष विचलित होईल आणि राग शांत होईल.
–    नियमितपणे योग आणि मेडिटेशन करा. यामुळे रागावर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल. सात्त्विक आहारही राग कमी करण्यास उपयुक्त ठरू शकतो.
–    नेहमी हसतमुख राहा. यामुळे तुम्हाला स्वतःला चांगलं, आनंदी वाटेल आणि राग कमी होईल.
–    स्वतःला कामात व्यग्र ठेवा. यामुळे लवकर थकवा येईल आणि राग कमी होईल.
–    आपल्या छंदांसाठी आवर्जून वेळ काढा. आपलं आवडतं काम करताना तुम्ही खूश राहाल, ज्यामुळे राग कमी होईल.