ग्लुकोजच्या पातळीवर सातत्याने देखरेख ठेवल्यास म...

ग्लुकोजच्या पातळीवर सातत्याने देखरेख ठेवल्यास मधुमेह नियंत्रण होऊ शकते (Continuous Monitoring Of Glucose In Body May Keep Diabetes In Control)

मधुमेह ही सर्रास आढळून येणारी आरोग्यविषयक समस्या आहे. तेव्हा मधुमेहाच्या देखभाल / व्यवस्थापनाकडे वळताना त्यांचा आहार, व्यायामाची पद्धत, झोप यांसारख्या जीवनशैलीशी निगडित गोष्टी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे औषधे यांचा रक्तातील साखरेच्या पातळीवर परिणाम होत असतो, हे लक्षात घेतले पाहिजे. मधुमेह असलेल्या व्यक्तींच्या उपचारांची सुरुवात ही बहुतेकदा एका गोळीपासून होते. कालांतराने HbA1c ची नेमकी पातळी जपण्यासाठी तोंडावाटे घ्यावयाच्या डायबेटिक अँटिबायोटिक औषधांची (ओएडी) संख्या वाढू शकते.

काही रुग्णांच्या बाबतीत औषधे घेऊनही ग्लुकोजची पातळी वाढलेलीच राहत असल्याने ओएडीवरून इन्सुलिन इंजेक्शन्सकडे वळणे आवश्यक ठरू शकते. इन्सुलिन घेण्याविषयी रुग्णांच्या मनात आशंका असू शकते आणि हे उपचार सुरू करणे शक्य तितके पुढे ढकलण्याकडे त्यांचा कल असतो, मात्र रक्तातील ग्लुकोजची पातळी, विशेषत: जेवणानंतरची ग्लुकोजची पातळी नियंत्रणात राखण्यासाठी इन्सुलिन उपचारांचा समावेश केला जातो. इतकेच नव्हे तर पॉलिपील उपचारपद्धती वापरून म्हणजे काही औषधांची एकत्रितपणे मात्रा निश्चित करूनही काही वेळा रुग्णांना आपली अपेक्षित उद्दिष्ट्ये साध्य करता येत नाहीत, म्हणजे ग्लुकोजचे इष्टतम संयोजन शक्य होत नाही.

पुण्यातील चेल्लाराम हॉस्पिटल डायबेटिस केअर अँड मल्टिस्पेशालिटीचे एंडोक्रिनोलॉजिस्ट आणि सीईओ डॉ. उन्नीकृष्णन एजी म्हणाले, “मधुमेही आणि इन्सुलिन उपचार घेणाऱ्या किंवा विशिष्ट अँटि-डायबेटिस औषधे तोंडावाटे घेणाऱ्या रुग्णांच्या रक्तातील ग्लुकोजची पातळी खूप खाली घसरण्याचा किंवा खूप जास्त वाढण्याचा धोका असतो. ग्लुकोजची पातळी खूप वाढल्यास सर्वसाधारणपणे काही लक्षणे दिसत नाहीत, मात्र त्यामुळे शरीराची सातत्याने हानी होत राहते, म्हणूनच मधुमेहाच्या व्यवस्थापनामध्ये सातत्याने देखरेख हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो.“